Search This Blog

Friday, 28 August 2020

भंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांचे आदेश

 


भंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांचे आदेश

मुंबई, दि.  27 ऑगस्ट ( प्रतिनिधी / वार्ताहर ) - भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष  मा.श्री. नाना पटोले यांनी आज दिले. यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. विश्वजित कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधिक्षक, भंडारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धानाची वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे.  गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन 2019 व 2020 मध्ये धान खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

गडचिरोली येथेही धान खरेदी पणन हंगाम सन 2018-2020 मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इ.गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधीत या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे,  अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष, मा. श्री. नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींची साखळी जेरबंद व्हावी, यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, असे निदेश दिले.

0000000


चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 28 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 28 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



Thursday, 27 August 2020

कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हा कारागृहातील उर्स यात्रा रद्द

 कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हा कारागृहातील उर्स यात्रा रद्द

चंद्रपूर, दि.27 ऑगस्ट: सद्यस्थितीत कोरोना महामारीचा सर्वत्र प्रसार होत असल्याने राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशान्वये कारागृहातील कैद्यांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दरवर्षी होणारा मोहरम महिन्याच्या नवमी व दशमीला  दि. 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट रोजी ऊर्सचे आयोजन होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कारागृह परिसरात येऊ नये,असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-1चे अधीक्षक वैभव आगे यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना तसेच अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. याकरिता यावर्षी मुस्लिम हिजरी सणानिमित्त मोहरम महिन्याच्या नवमी व दशमीला दि. 29 व 30 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात असलेल्या पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली  दर्ग्यावर ऊर्स यात्रा भरविण्यात येणार नसून सदरची यात्रा ही यावर्षी स्थगित करण्यात आलेली आहे.

00000

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799


 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 वर

आतापर्यत 1081 कोरोनातून बरे ;

696 बाधितांवर उपचार सुरू

24 तासात 132 बाधितांची नोंद ; दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि.27 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या 24 तासात कोवीड -19 संक्रमित 132 बाधित आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या 1799 झाली आहे. आतापर्यंत 1081 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 696 बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला श्वसनाचा व अस्थमाचा त्रास तसेच न्युमोनिया असल्याने दिनांक 24 ऑगस्टला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. 26 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजता अँन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला होता. पुढिल उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. बाधिताला कोरोनासह श्वसनाचा, अस्थमाचा त्रास तसेच उच्चरक्तदाब, न्युमोनिया असल्याने 26 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.

आज 27 ऑगस्टच्या पहाटे दिड वाजता 60 वर्षीय पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटर वन अकादमी येथून 25 ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्वसनाचा त्रास असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 27 ऑगस्टच्या पहाटे दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनिया तसेच श्वसनाचा व मधुमेहाचा आजार होता.आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 22 मृत्यू झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील 19 तर तीन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 55 बाधित पुढे आलेले आहेत. त्याचबरोबर बल्लारपूर 2, मुल  18, ब्रह्मपुरी 5, वरोरा व राजुरा येथील प्रत्येकी 8, सावली 20,  कोरपना 11, भद्रावती चार तर गोंडपिपरी येथील एक बाधीत ठरला असून असे एकुण 132 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, डॉ.आंबेडकर नगर, स्नेह नगर, रयतवारी, छत्रपती नगर, वडगाव रोड, जटपुरा वार्ड, तुकूम, आनंदनगर, गंजवार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, भानापेठ, बाबुपेठ, महेश नगर, दादमहाल वार्ड, पंचशिल वार्ड,पठानपुरा वार्ड, बेलेवाडी, संध्या नगर तर तालुक्यातील घुग्घुस, दुर्गापुर भागातील बाधित पुढे आले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील केळझर व चिंचाळा भागातून बाधित पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील संत रविदास चौक तर तालुक्यातील उदापूर गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील सिद्धार्थ वार्ड तर तालुक्यातील शेगाव, वनोजा, नागरी, शेंबळ, बोर्डा या गावातून बाधित पुढे आले आहेत.

राजुरा येथील आझाद चौक, रामनगर, कर्नल चौक येथील बाधित ठरले आहेत. सावली तालुक्यातील पालेबार्सा, पाथरी, सामदा, व्याहाड बु गावातील पॉझिटिव पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील वनसडी या गावातून तर गडचांदूर येथील बाधित ठरले आहेत.

भद्रावती येथील एकता नगर तर तालुक्यातील माजरी गावातील बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरी गावातून बाधित पुढे आला आहे.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 34 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 157 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 184 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 475 बाधित, 61 वर्षावरील 119 बाधित आहेत. तसेच 1799 बाधितांपैकी 1206 पुरुष तर 593 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1799 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1689 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 47 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 88 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 62 नागरिक, तालुकास्तरावर 379 नागरिक तर, जिल्हास्तरावर 647 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 738 नागरिक दाखल झाले आहेत. 93 हजार 378 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 360 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

00000

शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी सुरक्षा किटचा वापर करावा : डॉ. उदय पाटील

 


शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी सुरक्षा किटचा वापर करावा : डॉ. उदय पाटील

किटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : विषारी कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्याने विषबाधा होऊ शकते. तेव्हा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना संबंधित कीटकनाशकांच्या प्रभावांची व लक्षणांची माहिती असणे आवश्‍यक आहे. किटकनाशकांची फवारणी करतांना सर्व शेतकरी, भुधारक, शेतमालक व शेतमजुर यांनी  हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, ॲप्रॉन, बुट इत्यादी प्रतिबंधात्मक किटचा वापर कटाक्षाने करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

किटकनाशकाची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असतांना शेतमजुरांना संरक्षक किट पुरवून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्याची नैतिक व कायदेशिर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्याअनुषंगाने शेतमालकाने नैतिक व कायदेशिर जबाबदारी पुर्ण पाळावी. जेणेकरुन, संभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.

शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करतांना स्वत:ला, घरातील कुटूंबियांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रथमोपचाराचे साहित्य शेतात उपलब्ध ठेवावे. पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिणण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुध्द दिशेला तोंड करुन किटकनाशकाची फवारणी केल्यास किटकनाशकाचा फवारा मोठ्या प्रमाणात शरिरावर पडुन शरिरात विष भिणण्याची शक्यता असते.

पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. किटकनाशकांपैकी ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरीन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन इत्यादी) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्या वेळी आवश्यक ती खबरदारी न चुकता घेण्यात यावी.

किटकनाशकाची फवारणी करतांना शेतमालकाला स्वत:ला विषबाधा झाल्यास त्याने तात्काळ प्रथमोपचार घ्यावेत. तसेच, शेतमजुर अथवा अन्य व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार करावेत. प्रथमोपचारानंतर स्वत: अथवा संबंधित शेतमजुराला, व्यक्तीला तात्काळ जवळच्या शासकिय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावेत.

किटकनाशकाची फवारणी करतांना शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी फवारणी दरम्यान अथवा फवारणी पुर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजुराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशिर जबाबदारी शेतमालकाची आहे. शेतमालकाने किटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतमजुराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातुन किमान शारिरीक तपासणी करुन घ्यावी.

किटकनाशक फवारणी संदर्भात शेतकरी व शेतमजुरांचे प्रबोधन वृत्तपत्रे, दुरदर्शन, आकाशवाणी, शेतकरी मेळावे, घडीपत्रिका, भित्तीपत्रे, प्रशिक्षण शेतकरी मासिक, पिकावरील किडरोग व सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत किड सर्वेक्षण, किड नियंत्रक, कृषि विज्ञान केंद्रे, भ्रमणध्वनीवरील एसएमएस, दवंडी इत्यादी माध्यमाव्दारे सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहिम हाती घ्यावी.

जनजागरण मोहीम राबविण्याकरीता कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, किटकनाशक कंपनी असोसिएशन, किटकनाशक कंपन्या, शासकिय व खाजगी संबंधित संशोधन संस्था, किटकनाशक कंपन्यांचे डिलर्स व विक्रेते यांचे लोक प्रतिनिधींची मदत घेण्यात यावी.

शेतमालकाने, माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, तहसिलदार,पंचायत समितीचे कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे.

000000