Search This Blog

Tuesday, 25 March 2025

कारागृहातील बंदीवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

 





कारागृहातील बंदीवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 25 मार्च : सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबईतर्फे 'जीवन गाणे गातच जावे', हा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधिक्षक अनुप कुमरे तर प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले, कारागृहाचे वरिष्ठ निरीक्षक नागेश कांबळे, सतीश सोनवणे, कमलाकर मिरासे, ॲङ चैताली बोरकुटे – कटलावार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कारागृह अधिक्षक श्री. कुमरे म्हणाले, बंदिवानांना कारागृहात आनंदी वातावरणात जगण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातीलही कलागुणांना विकसीत करणे, चांगले वर्तन ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदींचा समावेश आहे. सहायक आयुक्त श्री. येरमे म्हणाले, आनंद हा आपल्यातून निर्माण झाला पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय, याची पारख करून आपण ते स्वीकारावे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्यास नक्कीच मदत मिळते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. येसनकर यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

यावेळी बंदीवासांसाठी योग नृत्य परिवारातर्फे सुरेश घोडके आणि समूह यांनी अधिवासांना योगा शिकवला.  गुन्हेगाराची सायकॉलॉजी या विषयावर धनंजय तावडे यांनी मार्गदर्शन केले. गुन्हेगारीचे दुष्परिणाम व गुन्हे सोडल्यावरचे जीवन या विषयावर ऍडव्होकेट चैताली बोरकुटे-कटलावार यांनी मार्गदर्शन केले. कला श्री आर्ट फाउंडेशनच्या मुलींनी व शिक्षिका स्नेहा पारवेकर यांनी कथक व देशभक्तीपर नृत्य सादर केले. त्यानंतर बंदीवासांसाठी संस्कृती देशभक्ती प्रबोधनपर स्वरसुगम संगीत ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. त्यात देशभक्तीपर थोर महापुरुषांवर व संस्कृती हा विषय घेऊन अतिशय दर्जेदार गीते सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजराज चिकटवार, वैशाख रामटेके, रोहित रामटेके, प्रदीप यमनूरवार व सुशील सहारे यांनी सहकार्य केले.

००००००

28 मार्च रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

         28 मार्च रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि.25 मार्च : जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त  विद्यामाने  28 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जनशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय, पदविका, पदवी इत्यादि बेरोजगार उमेदवारांना विविध  क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध  देणे तसेच राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्यातून 900 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे.

यात एस.बी.बाय. लाईफ इन्शुरन्सचे फिल्ड वर्कर, विदर्भ क्लिक वन सोल्युशन यांचे फिटर, वेल्डर इलेक्ट्रिशियन, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा. लि. नागपूर यांच्या मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल  मॅकेनिकल, वैभव  इंटरप्रायझेस, नागपूर यांचे आय.टी.आय विद्यार्थ्याकरीता मॅकनिकल, नवभारत फर्टिलायझर छ. संभाजीनगर यांचे ॲग्रीकल्चर ऑफीसर, सेल्स रिप्रेसेन्टेटिव्ह, संसुर सृष्टी प्रा. लि. चंद्रपूर यांचे सेल्स मॅन, मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर यांचे  लूम ऑपरेटर, हेल्पर, अंकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन, क्वालिटी सुपररवायझर, क्लिनर, सदर कंपन्याचे विविध पदे असल्याचे उद्योजकाकडून कळविण्यात आलेआहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन) प्रती उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मेळाव्याकरीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर 07172-252295 या दूरध्वनीवर संपर्क करावा. जिल्हातील जास्तीत जास्त  उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

००००००

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेकरीता 31 मार्च पर्यंत नोंदणी

                   पंतप्रधान इंटर्नशिप योजनेकरीता 31 मार्च पर्यंत नोंदणी

चंद्रपूर, दि. 25 मार्च : पंतप्रधान रोजगार आणि  कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेची उमेदवारांनी  नोंदणी करण्याचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत आहे. नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in.  या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत  देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक 66 हजार रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असून कंपनी त्यांच्या सीएसआर निधीतून 500 रुपये व केंद्र सरकार 4500 रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या शिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 21  ते 24 वर्ष असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

०००००

11 एप्रिल रोजी पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव

 11 एप्रिल रोजी पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव

चंद्रपूर, दि. 25 मार्च : पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत पोटगी केसमध्ये जप्‍त केलेल्या साहित्याचा लिलाव 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

प्रतिभा विरुध्द मनोज मोरे या पोटगी केसमध्ये 1. हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल 2. एक कुलर 3. एक एलजी कंपनीचा टिव्ही 4. दोन पिकोफॉल मशीन हिमालय कंपनीचे 5. विवो वाय 16 कंपनीचा मोबाईल हे सर्व साहित्य जप्त करून साहित्याची किंमत 28 हजार रुपये अधिकृत करण्यात आली आहे. 11 एप्रिल रोजी पो.स्टेशन पडोली येथे सकाळी  11 वाजता  जाहीर लिलाव होणार आहे.

त्याकरीता उपरोक्त साहित्य खरेदी करणार निवेदाधारकांनी अनामत रक्कम 2800 रुपये भरणा करून आपले नाव  लवकरात लवकर नोंदवावे, लिलावासंबंधी सर्व अधिकार ठाणेदार पो.स्टेशन पडोली यांना राहणार आहे.

०००००

Monday, 24 March 2025

जिल्ह्यात 208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित

 




जिल्ह्यात
208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित

Ø जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 100 दिवस क्षयरुग्ण मोहिमेचा समारोप

चंद्रपूर, दि. 24 मार्च : क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग दूरीकरण मोहीम 7 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी या मोहिमेचा समारोप करण्यात आला.

प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भास्कर सोनारकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. वैभव आगलावे आदी उपस्थित होते.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 15 ते 31 मार्च पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. गावपातळीवरील लोकांच्या सहकार्याशिवाय टीबी मुक्त ग्रामपंचायत करणे शक्य झाले नसते.

100 दिवस मोहिमेदरम्यान 4 लक्ष 81 हजार 455 अतिजोखिमेच्या व्यक्तींचे क्षयरोगाबाबत पडताळणी करण्यात आली. 3241 निक्षय शिबीर घेण्यात आले व 10886 लोकांची नॅट तपासणी करण्यात आली. 25059 व्यक्तींचे छातीचे एक्स- रे करण्यात आले असून 1114 नविन क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आला.

जनजागृती रॅलीचे आयोजन : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र, येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार : शहरी भागात उकृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेर्डले, डॉ. प्रविण पंत, डॉ. अमरीप बुक्काबार यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मंगेश भरडकर यांनी संक्षयित क्षयरुग्णांची माहिती दिल्याबद्ल तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, मॉउंट कारमेल कॉन्व्हेट हायस्कूल, राजीव रतन हॉस्पीटल, घुग्घस, डॉ. कोमल मुनेश्वर,  अमित जयस्वाल, नदीम कुरेशी या सर्वांनी गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस : क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता शहरी व ग्रामीण भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पर्धेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व अश्विनी चांदेकर यांनी केले. आभार डॉ. माधुरी टेंभे यांनी मानले.

0000000