Search This Blog

Friday, 9 October 2026

बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी




 बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

Ø आष्टी रिठ व पळसगाव येथील बाधित शेतकऱ्यांशी संवाद

Ø एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राचे ग्राउंड ट्रुथिंग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 09 : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतपिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 9) बल्लारपूर तालुक्यातील आष्टी रिठ व पळसगाव या गावांना भेट दिली.

यावेळी त्यांनी भात व कापूस पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राचे ग्राउंड ट्रुथिंग (प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी) तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

बल्लारपूर तालुक्यात पावसाच्या खंडामुळे भात आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंत यांनी आष्टी रिठ व पळसगाव येथील विजय बालाजी भोयर, रामदास भोयर, मुकुंदा मडावी व मारुती मडावी यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून संवाद साधला.

पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम, उत्पादनात होणारी संभाव्य घट, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक व वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक असून, त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ग्राउंड ट्रुथिंगच्या कामात विलंब नको : दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने महसूल, कृषी व जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बल्लारपूर तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करून पिकांच्या नुकसानीचा अहवाल विनाविलंब सादर करावा. या अहवालाच्या आधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविणे शक्य होणार असल्याने ग्राउंड ट्रुथिंगच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विलास कुमरे, पळसगावच्या सरपंच संगिता सोयाम, वासुदेव मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केशर आंबा फळबाग लागवड क्षेत्राला भेट : विकसीत भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) व जिल्हा खनिज निधी अभिसरण अंतर्गत ग्राम पंचायत कोर्टीमक्ता येथील केशर आंबा फळबाग लागवड करण्यात आलेल्या क्षेत्राला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भेट दिली.

००००००

‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी



 ‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी

Ø ग्रामपंचायत, तलाव, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची पाहणी

चंद्रपूर, दि. 09 : ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी चंद्रपूर व पोंभुर्णा तालुक्यांतील विविध गावांना भेटी देऊन ग्रामपंचायत कार्यालये, अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळा तसेच तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा आणि विकासकामांचा सखोल आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात आंबेधानोरा, देवाडा खुर्द, सातारा, गिलबिली, आसेगाव आणि जुनोना या गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयांचे कामकाज, उपलब्ध पायाभूत सुविधा, अंगणवाडी केंद्रांची स्थिती, शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधा तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या शासकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.

पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीचे आवाहन : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी विविध तलावांची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांशी थेट संवाद; समस्या सोडविण्याचे निर्देश : भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या. गावातील सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करणे, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणे यावर त्यांनी भर दिला. पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी व उणिवा दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन सुधारणा करण्याचे निर्देशही दिले.

गावपातळीवरील प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न : ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत केवळ कार्यालयीन बैठका व कागदोपत्री आढाव्यापुरते मर्यादित न राहता अधिकारी प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन शासकीय सेवा, पायाभूत सुविधा, पाणी उपलब्धता आणि विकासकामांची स्थिती जाणून घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनीही जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील गावांना भेटी देऊन आपल्या विभागाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

००००००

15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन

 15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन

Ø जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

चंद्रपूर, 09 : आरोग्य संवर्धन आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हात धुण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन, जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायती तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीची माहिती देणे, हात स्वच्छ ठेवण्याचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगणे तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. हात स्वच्छ न ठेवल्यामुळे विविध आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळा व अंगणवाड्यांमध्ये विशेष उपक्रम : जागतिक हात धुवा दिनानिमित्त शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगणे, हात धुण्याचे प्रात्यक्षिक घेणे, जनजागृतीपर संदेश देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावरही नागरिकांच्या सहभागातून हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

०००००००

चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप




चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप

Ø अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 09 : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) चिमूर अंतर्गत येत असलेल्या 161 अंगणवाडी केंद्रातील सेविका आणि मदतनीसांच्या उपस्थितीत 9 व्या राष्ट्रीय पोषण माहचा समारोपीय कार्यक्रम स्थानिक शेतकरी भवनात पार पडला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चिमुरचे गट विकास अधिकारी सुभाष बांदुरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकाश भांदककर, मुख्यसेविका डॉ. अंजली ठेंगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने राष्ट्रीय पोषण माहचे उद्दिष्ट, बालकांचे आरोग्य, पौष्टिक आहाराचे महत्त्व, 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' व 'लेक लाडकी योजना' या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अंगणवाडी केंद्रासमोरील अडचणी आणि या कामात लोकसहभागाचे असणारे महत्त्व या विषयांचा समावेश होता.

पोषक आहार पाककृती स्पर्धा व राज्यस्तरासाठी निवड : यापूर्वी सर्कल स्तरावर पोषक आहार पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांची व इतर उत्कृष्ट पाककृतींची अंतिम स्पर्धा घेण्यात आली. यात 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मान्यवर व परिक्षकांनी या सर्व पाककृतींची बारकाईने पाहणी केली. यामधून निवडलेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी आता राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृती : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये पथनाट्य, नकला, समूहगीत गायन, वैयक्तिक गीत गायन, समूह नृत्य आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा होत्या. या स्पर्धात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून पोषण माह, 'बेटी बचाओ-बेटी पढाओ', आरोग्य व पोषण, आणि जंक फूडचे शरीरावर होणारे दुष्परिणाम या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयांवर समाजप्रबोधन करण्यात आले.

तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मनिषा देठे, पॅरामेडिकल स्टॉफ प्रतिभा मडावी, कल्पना फुलझेले यांनी चाइल्ड लाईन, वन स्टॉप सेंटर, बाल सरंक्षण व बाल संगोपन योजनेची माहिती दिली.

०००००

महसूल लोक अदालतीत 16 प्रकरणे निकाली



महसूल लोक अदालतीत 16 प्रकरणे निकाली

Ø अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील 50 प्रकरणांवर सुनावणी

चंद्रपूर, दि. 09 : महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद, पारदर्शक व सामंजस्यपूर्ण पद्धतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत’ घेण्यात आली. या लोक अदालतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयातील एकूण 50 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 16 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत 7 ऑक्टोबर रोजी ही महसूल लोक अदालत पार पडली. महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांना परस्पर संवादातून तोडगा काढण्याची संधी उपलब्ध करून देणे, अनावश्यक विलंब टाळणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या 50 प्रकरणांतील संबंधित पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच परस्पर सहमती व सामंजस्यातून वाद मिटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 16 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या महसूल लोक अदालतीसाठी चंद्रपूर बार असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने अधिवक्ता व पक्षकार उपस्थित होते. लोक अदालतीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अजय मेकलवार, ओंकार आमटे, संजय पुष्पलवार तसेच प्रकाश दुपारे यांनी परिश्रम घेतले.

पुढील महसूल लोक अदालत 4 डिसेंबर 2026 रेाजी होणार असून महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००