Search This Blog

Sunday, 8 November 2026

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जिथे शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली ग्वाही


 

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जिथे शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली ग्वाही 


 नागपूर, दि.  ७: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 


 नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली.  त्यावेळी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. 


शेतकऱ्यांसमोर असलेले संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल या संदर्भात त्यांनी रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.  चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना मुख्यमंत्री बोलत होते. 


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी गावात आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीमध्ये घेण्यात येत असलेल्या पिकांबद्दल व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा  केली .

 हवामान बदलामुळे  काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे  या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल , नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे परंतु बांगलादेशाने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही त्याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.


शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी बालपांडे कुटुंबाची माहिती घेतली व शेतातील नुकसान झाल्यामुळे निश्चित मदत देण्याची ग्वाही दिली.

'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 







'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...'

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लोहारी सावंगा येथील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

लोहारी सावंगा( नागपूर), दि ७  : राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट उभे ठाकले असताना राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आर्थिक मदतीसह विविध योजनांचा आधार दुष्काळग्रस्तांना दिला जात आहे. आगामी काळातही अनेक योजना लागू करण्यात येणार असून या अस्मानी संकटाचा आम्हा सर्वांना एकजुटीने सामना करावा लागेल, असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर उपस्थित ग्रामस्थांपुढे बोलताना काढले. 


लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायतीच्या आवारातील सभामंडपात या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकूर, आशिष देशमुख, डॉ.  राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले, हे वर्ष आव्हानांचे आहे. पावसाने शेवटपर्यंत दडी दिली. त्यामुळे पिके करपली व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यात काही ठिकाणी चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार अतिशय भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. मध्यंतरी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे केले. लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला असल्याचे ते म्हणाले.


शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सरकारने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. शिवाय वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. याशिवाय, ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी काळातही काही योजना लागू करण्यात येणार आहेत. जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.


लोकांच्या आरोग्यासह विविध प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.शेतकरी संकटात असताना दिवाळीचे हे पर्व त्याला धीर देण्यात घालवावे, या उद्देशाने आम्ही गावात आलो आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, त्यांची ग्रामगीता आणि भजनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की , राष्ट्रसंतांच्या भजनांमध्ये फार मोठी शक्ती आहे. संकटाच्या काळात व्यक्ती कितीही खचली तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्याला उभारी मिळते. त्यांच्या ग्रामगीतेचा विचार गावांना सर्वच अंगांनी समृद्ध बनवतो. दुष्काळाच्या काळात आपण नेमके काय केले केले पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार अत्यंत प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. गुरुदेवांच्या या विचारांनी देखील आम्हा सर्वांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Saturday, 7 November 2026

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी


 प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी

Ø पात्र मतदारांनी गणना प्रपत्र व आवश्यक निवेदन सादर करावे – जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट होऊ न शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत ज्या मतदारांना गणना प्रपत्र वितरित करण्यात आले होते, मात्र विविध कारणांमुळे त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, ग्रामपंचायत कार्यालये, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी अशी करावी कार्यवाही

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या संबंधित मतदारांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावे.

ज्या मतदारांचे वास्तव्य पूर्वीच्या पत्त्यावरच आहे, त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-B मधील निवेदन सादर करावे. या निवेदनात यापूर्वी गणना प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे.

राज्यांतर्गत स्थलांतर केलेल्या मतदारांनी नवीन पत्ता व विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करून गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-C मधील निवेदन आणि नवीन पत्त्याचा पुरावा सादर करावा. अशा मतदारांना स्वतंत्रपणे नमुना क्रमांक 8 (Form-8) सादर करण्याची आवश्यकता नाही.

मतदारांना त्यांच्या पूर्वीच्या मतदार छायाचित्र ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक वापरून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ECINET ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येणार आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी 'Book a Call with BLO' ही सुविधादेखील उपलब्ध आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी ज्यांनी यापूर्वीच नमुना क्रमांक 6 (Form-6) सादर केला आहे, अशा मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.

पात्र मतदारांच्या नावांचा अंतिम यादीत समावेश

संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची नियमानुसार तपासणी व पडताळणी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव समाविष्ट नसल्यास आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र विहित पद्धतीने सादर करावे. जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र मतदारांनी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

00000000

पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक वुईके








 पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक वुईके

Ø आष्टी (काकडे) ता. भद्रावती येथे चारा लागवडीचा जिल्ह्यस्तरीय शुभारंभ

Ø शेतकऱ्यांना वैरण बियाणे व ठोंब्याचे मोफत वाटप

चंद्रपूर, दि. 07 : संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पशुधन जिवंत ठेवणे आवश्यक आहे.  त्यामुळे आतापासून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर लोकसहभागातून या परिस्थितीवर आपण निश्चित मात करू, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील तलावामध्ये शुक्रवारी मका चाऱ्याची लागवड करून जिल्हास्तरीय चारा लागवड उपक्रमाचा शुभारंभ करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी वरोराचे आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदी उपस्थित होते.

आष्टी (काकडे) या गावातून चारा लागवडीचा शुभारंभ होत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्ह्यातील पाच माजी मालगुजारी (मामा) आणि  लघु पाटबंधारे (लपा) तलावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून चारा लागवड करून बचत गटाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. चारा लागवडीच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात इतरही ठिकाणी चारा लागवड उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम आमच्या पशुधनासाठी आहे, असे गावातील प्रत्येकाला वाटले पाहिजे.

लोकसहभागातूनच चळवळ निर्माण होते. आज तुमच्या गावात चारा लागवडीचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री, आमदार,  कलेक्टर, सीईओ हे सर्व आले आहेत. चारा लागवड हा केवळ एक शब्द नाही. तर त्याचे महत्त्व फार मोठे आहे. लोकांनी त्याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनाचे, आपल्या गावाचे अनुकरण इतर गावांनी केले पाहिजे. महिलांनी पुढाकार घेतला तर निश्चितच परिवर्तन होते. आपला जिल्हा महाराष्ट्रात चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनात अग्रेसर असावा,  असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

यावेळी आमदार करण देवतळे म्हणाले,  माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये पाणी व चारा टंचाईचे नियोजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दुष्काळ परिस्थितीमध्ये चारा व पाणी टंचाईवर आपण निश्चितच मात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुहास रोडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते, डॉ.प्रमोद जल्लेवार यांनी, निकृष्ट चारा सकस करणे, मुरघास, अझोला प्रात्यक्षिकासह चारा साक्षरता अभियान व संवर्धन योजनेची माहिती दिली. यावेळी नागरिकांना मोफत वैरण बियाणे, ठोंब्याचे वाटप करण्यात आले. मका वैरण बियाण्याची पेरणी करून पालकमंत्र्यांच्या हस्ते चारा लागवडीचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी तर आभार डाॅ.सतीश अगडते यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, प्रभाग संघाच्या महिला व इतर नागरिक उपस्थित होते.

0000000

Friday, 6 November 2026

दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके



 

दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके

Ø पाणी पुरवठा योजनांची वीज कापल्यास सक्त कारवाई करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 06 : कमी पर्जन्यमान आणि पावसाचा खंड, यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असून संकटाच्या काळात राज्य सराकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. दुष्काळ निवारणासाठी शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहे. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

नियोजन भवन येथे दुष्काळ निवारण संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे आदी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण यंत्रणेने अलर्ट मोडवर राहून काम करावे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, वीज कनेक्शनशिवाय पाणी पुरवठा खंडीत झाला, अशी तक्रार येता कामा नये. पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापल्यास सक्त कारवाई करावी. उद्योगांचा सीएसआर निधी पाणी टंचाई निवारणासाठी वापरावा. पाणी कपात करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. उद्योगांसाठी देण्यात येणा-या पाण्यामध्ये आजपासूनच 10 टक्के कपात करावी.

जुन-जुलै महिन्यापर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी महानगर पालिकेनेसध्दा आतापासून योग्य नियोजन करावे. दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनांन्स कंपन्या शेतक-यांना कर्जवसुलीकरीता त्रास देत असेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई करावी. संभाव्य पाणी टंचाई, पशुधनासाठी चारा व्यवस्थापन आदींबाबत सुक्ष्म नियोजन करून दुष्काळी परिस्थतीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या. यावेळी खासदार आणि आमदारांनीसुध्दा दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी सुचना केल्या.

सादरीकरणात जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, दुष्काळामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र 3 लक्ष 72 हजार हेक्टर आहे. यासाठी शासनाकडे 316 कोटी 95 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभुमिवर पिडीत शेतक-यांना अग्रीम 5 हजारांची रक्कम वाटण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. चालू वर्षात 15 तालुक्यातील 56 हजार 988 शेतक-यांना 2 लक्ष 43 हजार 670 रुपयांची जमीन महसुलात सुट देण्यात आली आहे. शेतक-यांच्या चालू पीक कर्जाचे सुलभ हप्त्यांमध्ये पुनर्गठण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीशी निगडीत सर्व कर्जाच्या वसुलीस जिल्ह्यात स्थगिती देण्यात आली आहे.

तसेच कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सवलत लागू करण्यात आली आहे. टंचाई जाहीर झालेल्या सर्व तालुक्यातील शेतीच्या पंपाची वीज खंडीत करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. भुजल पातळी वाढविण्यासाठी जिल्ह्यात तात्काळ नवीन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पशुधनासाठी आवश्यक चारा छावण्यांचे नियोजन आणि चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

०००००००