Search This Blog

Wednesday 26 September 2018

स्पर्धा परीक्षांच्या यशस्वीतेसाठी लोकराज्य उत्तम संदर्भ साहित्य:भैय्याजी येरमे स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रामध्ये लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम


चंद्रपूर दि.21  सप्टेंबर : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करताना राज्य शासनाची अधिकृत भूमिका मांडणाऱ्या व योजनांबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या लोकराज्यचे वाचन उत्तम संदर्भ साहित्य म्हणून आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत राज्यभरात सुरू असलेल्या लोकराज्य वाचन अभियानाअंतर्गत राणा कोचिंग क्लासेस या स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी राज्य शासनाच्या असणाऱ्या विविध योजना व उपाययोजनांबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला राणा कोचिंग क्लासेसचे संचालक इरशाद शेखजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, रामराव दोडके उपस्थित होते. 
            यावेळी बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना, राज्य शासनाची धोरणे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती, त्यांच्या यशाची सूत्रे व वेगवेगळ्या परीक्षांबाबतची माहिती लोकराज्याच्या पानापानांमध्ये असते. त्यामुळे  स्पर्धापरीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लोकराज्य या पुस्तकाला आपल्या दैनंदिन वाचनामध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे  सांगितले. याशिवाय राज्य शासनाच्या वाटचालीवर विश्लेषण करणार्‍या प्रत्येकाने या मासिकाच्या वाचनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन करताना अवघ्या शंभर रुपयांमध्ये  बहुमूल्य साठ पानांचे 12 रंगीत अंक राज्य शासन अल्पदरात प्रत्येकाला देत असून राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही उपाययोजना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच घरातल्या प्रत्येकाने लोकराज्य अंक वाचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            संचालक श्री.इर्शाद शेख यांनी यावेळी स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असणे गरजेचे असते. लोकराज्यच्या अंकामध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारी बाबतची सविस्तर माहिती असते. हा अंक तयार करताना विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा विचार केला जातो. त्यामुळे हा अंक स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित रामराव दोडके यांनी जिल्हा माहिती कार्यालय येथे या अंकासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
                                                                                                0000

No comments:

Post a Comment