चंद्रपूर, दि.24 सप्टेंबर- कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनिय योगदान मागे ठेवत. ज्येष्ठ काँग्रेस नेते देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे आज अनंतात विलीन झाले. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिनबा गेट शांतीवन येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चारवेळा चंद्रपूरचे खासदार राहीलेल्या या लोकनेत्याला हजारोच्या समुदायानी साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सतत झटणा-या या अजात शत्रूच्या व्यक्तिमत्वाच्या अंत्ययात्रेमध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सकाळपासून साईमंदिर सिव्हील लाईन स्थित घरामध्ये चंद्रपूरकरांची रिघ लागली होती. वटवृक्ष झालेल्या शैक्षणिक संस्था आणि हजारोच्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने बदल घडवून आणणा-या या हसतमुख व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी सर्व वयोगटातील अनेक पिढयांनी सिव्हील लाईन परिसरात गर्दी केली होती. दुपारी 12 नंतर सजवलेल्या रथातून शहराच्या मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली.
23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.23 मिनीटांनी नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांनी 1980 ते 1984, 1984 ते 1988, 1989 ते 1991, 1991 ते 1996 असे सलग चारवेळा लोकसभेमध्ये चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. डॉ.मनमोहनसिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री म्हणून शांताराम पोटदुखे यांनी काम बघितले. त्याच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, स्नुषा रमा गोळवलकर, मुलगी भारती चवरे, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी रात्री मुंबईला निघण्याचा दौरा रद्द केला. रात्री त्यांनी निवासस्थानी जावून भेट दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी देखील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी देखील 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी खासदार नानाभाऊ पडोळे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी मंत्री रंजीत देशमुख, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भाच्या विकासासाठी धडपडणारा नेता हरपला
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. पोटदुखे यांनी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयांचे एक मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे.
शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने
आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले – ना.मुनगंटीवार यांची शोक संवेदना
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले असल्याची शोकसंवेदना राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
शांतारामजींनी चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हे जिल्हे शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे आणि शांतारामजींचे नाते राजकारणापलीकडचे होते . मी लोकसभेच्या दोन निवडणुका त्यांच्या विरोधात लढविल्या. त्यांच्याच सरदार पटेल महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. जेव्हाही मी नवी दिल्लीत गेलो तेव्हा त्यांनी मला कधीही इतरत्र थांबू दिले नाही .आपल्या निवासस्थानावावर थांबायला लावले , आपल्या गाडीतून मला संसद भवनात नेले. मी त्यांना नेहमी काका म्हणायचो , माझ्या वडिलांचे ते उत्तम मित्र होते. नेहमीच त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून नेहमीच कौतुकाची आशीर्वादाची थाप त्यांनी कायम माझ्या पाठीवर ठेवली. त्यांच्या निधनाने राजकिय , सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment