Search This Blog

Thursday, 6 September 2018

विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश असलेला लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित


चंद्रपूर, दि.6 सप्टेंबर - लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. 
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, संपादक सुरेश वांदिले, विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके, वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहाय्यक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.
या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षी, शैक्षणिक क्रांतिचे जनक, गाव तेथे शाळा, सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
                                                0000

No comments:

Post a Comment