Search This Blog

Thursday 7 January 2021

आज कोरोना लसीकरणाचा सराव



आज कोरोना लसीकरणाचा सराव

अडचणींच्या नोंदी घेऊन प्रत्यक्ष लसीकरणासाठीच्या उपायोजना आखाव्या- जिल्हाधिकारी

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : कोरोना लसीकरणाच्या सराव प्रात्याक्षिकातून येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्या व त्याअनुषंगाने प्रत्यक्ष लसीकरण मोहिम राबविण्याच्या उपायोजना आखाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आरोग्य विभागाला दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा शिघ्र कृती दल (जिल्हा टास्क फोर्स) समितीची बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वीस कलमी सभागृहात घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम, निवासी वैद्यकीय अधिकारी हेमचंद कन्नाके, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड विषाणूवरील बहुप्रतिक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आणि  राज्यशासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी उद्या 8 जानेवारीला जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा सराव प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय,  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर क्रमांक 2, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूर व उपजिल्हा रुग्णालय वरोरा  या केंद्रांचा समावेश आहे. एका केंद्रावर 25 व्यक्तींवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात येईल. सकाळी 9 वाजता चारही लसीकरण केंद्रावर सदर प्रात्यक्षिक होणार असून आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी यावेळी दिली.

          पहिल्या टप्यात देण्यात येणाऱ्या 16 हजार 259 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी सरावासाठी निवडण्यात आलेल्या 100 लाभार्थ्यांची यावेळी कोविन ॲपमध्ये नोंदणी करण्यात येईल. त्यांना लसीकरणासाठी कुठे उपस्थित राहायचे याबाबत संदेश पाठविण्यात येईल. त्यानंतर उपस्थित झालेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करुन देखरेखीसाठी एका खोलीत विश्रांती घ्यायला सांगण्यात येईल.

            बैठकीला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, उल्हास नरड, डॉ. प्रकाश साठे, गणेश धोटे, कांचन वरठी संदिप उईके व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment