Search This Blog

Thursday 1 April 2021

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे

-         जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाचे उद्दिष्टदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे जसे मतदान केंद्र ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक घेण्यात आली, याप्रसंगी जिल्हाधिकारी गुल्हाने बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.  

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणात जिल्ह्यात 22 लाख 42 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यापैकी 45 वर्षावरील नागरिक जे एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के म्हणजे 6 लाख 72 हजार 618 नागरिकांच्या लसिकरणाचे उद्दिष्ठ असून त्यासाठी 14 लाख 80 हजार डोजेसची आवश्यकता राहणार आहे. यासाठी एक-दोन दिवसात नागपूर येथून लससाठा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सद्या 81 लसीकरण केंद्र सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यावर लगेचच जिल्हा प्रशासनाद्वारे एकूण 200 लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला दिले.  यावेळी त्यांनी कोरोना रूग्णांकरिताच्या जिल्ह्यातील सर्व ऑक्सीजन बेडवर अखंडीत ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध आहे का, याबाबत खात्री करून घेण्याचे सांगितले तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत विविध बाबींचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. प्रतिक बोरकर, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गणेश धोटे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment