Search This Blog

Sunday 29 August 2021

वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना 50 टक्के निधी देणार - पालकमंत्री वडेट्टीवार



 वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना 50 टक्के निधी देणार

                            - पालकमंत्री वडेट्टीवार

Ø जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याच्या सुचना

Ø वीज कनेक्शन कापण्याच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक

चंद्रपूर दि. 29 ऑगस्ट : ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यासंदर्भात जिल्हाभरातून अनेक तक्रारी येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू – काटे, तसेच अंधाराचा फायदा घेत वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ बैठक बोलावली असून ग्रामपंचायतींना थकीत वीज बिल भरणा करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन समितीतून 50 टक्के निधी देण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) कपिल कलोडे  प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर गावांमध्ये विजेसाठी पथदिवे बसविण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून 50 टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. तर उर्वरीत भरणा करण्यासाठी 50 टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ठिकाणी ग्रामीण भागातील पथदिवे दिवसभर सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात विजेची बिले येतात. ग्रामीण भागातील पथदिवे किती वाजता सुरू व्हावे व किती वाजता बंद, यासाठी टाइमर सेन्सर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत स्तरावर टायमर सेंसर लावून घ्यावे.

ग्रामपंचायतीने थकित वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे विद्युत विभागाकडून कनेक्शन कापण्यात आले. मात्र याबाबत पुरेसा वेळ न देता विजेचे कनेक्शन कापण्याबाबत पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. यापुढे ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापण्यापूर्वी जि.प.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दोन-तीन दिवसाआधी अवगत करावे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीमध्ये सेन्सर लावल्यास विजेची बचत तर होईलच सोबतच 50 टक्के वीज बिलात कपातसुद्धा होईल. तसेच पुनर्वसित गावे सोडल्यास कोणत्याही गावात नवीन विद्युत पोल उभारणीला परवानगी देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सोलर सिस्टीम लावण्याचे प्रयोजन करणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

त्यासोबतच ग्रामपंचायतीकडे थकित असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी स्त्रोत उपलब्ध असून त्यातून 50 टक्के प्रमाणात सदर ग्रामपंचायतीकडून थकित असलेल्या वीज बिलाचा भरणा करता येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी दिली.

00000

No comments:

Post a Comment