Search This Blog

Wednesday 4 August 2021

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेतंर्गत पशुआरोग्य सेवा देण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक

 मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेतंर्गत पशुआरोग्य सेवा देण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक

Ø पशुचिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी 1962 टोल फ्री क्रंमाक कार्यान्वीत

चंद्रपूर दि. 4 ऑगस्ट: पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंधत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी ई. प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकिय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुपालकाला पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्याकरिता, पशुधनाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी व त्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता शासनामार्फत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम टप्प्यात राजुरा, सिंदेवाही, भद्रावती व मुल असे एकूण 4 फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करण्यात आले असून याअंतर्गत पशुधनाच्या प्रसूती संबंधी सेवा, प्रथमोपचार सेवा, तातडीच्या चिकित्सक सेवा, शस्त्रकिया सेवा तसेच इतर कोणत्याही चिकित्सक आपात्कालीन परिस्थितीत पुरविण्यात येणाऱ्या सेवा पशुपालकांना देण्यात येईल.

फिरत्या पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सुसज्ज चिकित्सा प्रणाली असणारी वाहने उपलब्ध असून सदर योजना अधिक बळकट करण्याच्या हेतूने व एका फोन क्रमांकावर चिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1962 कार्यान्वित करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, सिंदेवाही, भद्रावती व मूल या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या फिरते पशुचिकित्सा पथकाची सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता  1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पशुधनाचे तात्काळ उपचार करून घ्यावेत. तरी पशुपालक तसेच शेतकरी बंधूंनी आपल्या पशुधनाच्या उपचाराकरिता जास्तीत जास्त प्रमाणात या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment