Search This Blog

Friday 6 August 2021

विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

 






विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

Ø वन अकादमी कोव्हीड सेंटर, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, ऑक्सीजन प्लाँट, जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान संभाव्य तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी शहरातील वन अकादमी येथील कोव्हीड केअर सेंटर, निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू युनीट आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.

वन अकादमी येथील व्हेंटीलेटर कक्षाची पाहणी करतांना मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ, तसेच ऑक्सीजन पुरवठाचा येथे काय स्त्रोत होता, बाहेरच्या राज्यातून लिक्विड ऑक्सीजन आणण्याची गरज निर्माण झाली होती काय, दुस-या लाटेत सर्वाधित रुग्णसंख्या कितीपर्यंत पोहचली होती, याबाबत त्यांनी विचारणा केली. बांधकाम सुरू असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट कधीपर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असे विचारले असता, सदर प्लाँट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होणार असल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले. तिस-या लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

यानंतर विभागीय आयुक्तांनी स्त्री रुग्णालयाची तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सीजन प्लाँटची पाहणी केली. येथे उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सीजन सिलिंडरची क्षमता किती, सदर टँक किती लिटर भरायचा, याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात पीएम केअर आणि सीएसआर अंतर्गत उपलब्ध झालेल्या व्हेंटीलेटरबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी विभागीय आयुक्तांना माहिती दिली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment