Search This Blog

Wednesday 4 August 2021

पुरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे - धर्मादाय आयुक्त प्र.तरारे

 पुरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे

-धर्मादाय आयुक्त प्र.तरारे

चंद्रपूर दि.4 ऑगस्ट: महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे खूप मोठी जीवितहानी व कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. याकरिता गरजुंना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

महापुर, दरड कोसळल्याने तसेच लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार इत्यादी आवश्यक मदत करण्याची तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. करीता गरजूंना आवश्यक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे. असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र.तरारे यांनी केले आहे.

सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्था (ट्रस्ट)यांनी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. यासाठी धर्मादाय संस्थानी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजूंना शक्य ती मदत करावी.

 मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील:

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट मुंबई-400001,

बचत खाते क्रमांक: 10972433751,

शाखा कोड-00300,आयएफएस कोड- SBIN0000300

आर्थिक स्वरूपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी या बँक खात्यामध्ये चेक किंवा डी.डी स्वरूपात शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत जमा करावी. असे कळविण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment