Search This Blog

Saturday 7 August 2021

जिल्ह्यात रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन

 


जिल्ह्यात रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन

Ø जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांना महोत्सवाचा लाभ घेण्याचे

कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 7 ऑगस्ट:  मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यात रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने तसेच रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव कृषी भवन परिसर, वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळ, नागपूर रोड ,चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.

सदर जिल्हास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत तर तालुकास्तरावर आमदार, सभापती तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

रानभाज्यांमध्ये कंदभाज्या जसे की, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, कडू इत्यादी भाज्या तर हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोधा इत्यादी, फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा,चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी  तर फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ व उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व, पाककृती इत्यादी विषयी माहिती शहरी भागातील नागरिकांना तसेच ग्राहकांना होण्याच्या दृष्टिकोनातून रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

रानभाज्यांबाबत जिल्हा व तालुक्यात महोत्सवातील उत्कृष्ट माहिती, भाज्यांचे संकलन, भाजीची पाककृती केलेल्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा. तसेच महोत्सवाच्या अधिक माहितीकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, चंद्रपूर व संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment