Search This Blog

Thursday, 15 October 2026

22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’

 

22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’

Ø जमिनीचे आरोग्य, संतुलित खत वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीवर भर

चंद्रपूर, दि. 15 : भारत सरकारने 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही हे अभियान सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबविले जाणार असून, त्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून सर्व विभागीय व जिल्हा कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, आत्मा आणि कृषी विद्यापीठे यांच्या समन्वयातून ही शेतकरी जनजागृती मोहीम राबविली जाईल.

अभियानाची प्रमुख उद्दिष्टे : 1) माती परीक्षणावर आधारित खते व इतर कृषी निविष्ठांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती, 2) तेलबिया, कडधान्ये व फलोत्पादनाद्वारे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन, 3) भात पिकानंतरच्या पडीक क्षेत्राचा कार्यक्षम वापर, 4) पीक अवशेष व्यवस्थापनाला प्रोत्साहन आणि पराटी/पेंढा जाळण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे, 5) सेंद्रिय/नैसर्गिक उत्पादनांच्या वापराबाबत प्रशिक्षण, 6) जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण आणि शेतावरील प्रात्यक्षिकांद्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, 7) जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व साठवणूक याबाबत जागृती, 8) शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन.

अभियान कालावधीतील उपक्रम : अभियान काळात क्षेत्रीय पातळीवर प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षणे, शेतकरी मेळावे आदी उपक्रम आयोजित केले जातील. यामध्ये 1)माती परीक्षणावर आधारित पोषण व्यवस्थापन व मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, 2) खतांचा संतुलित वापर व खत विक्री नियमावलीबाबत जागरूकता, 3) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, 4) नैसर्गिक शेती, 5) एकात्मिक कीड व्यवस्थापन व कीटकनाशकांचा संतुलित वापर, 6) प्रति थेंब अधिक पीक, 7) पीक विविधीकरण, 8) शाश्वत शेती पद्धती, 9) शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार करणे व अद्ययावत करणे, 10) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment