Search This Blog

Friday, 20 November 2026

रब्बी हंगामासाठी नऊ सिंचन प्रकल्पांतून 8162 हेक्टर क्षेत्राचे नियोजन


रब्बी हंगामासाठी नऊ सिंचन प्रकल्पांतून 8162 हेक्टर क्षेत्राचे नियोजन

Ø डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून पहिली पाणीपाळी

चंद्रपूर, दि. 20 : रब्बी हंगाम 2026-27 करिता चंद्रपूर पाटबंधारे विभागांतर्गत विविध सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा, सिंचन क्षमता व पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन सात मध्यम व दोन लघु अशा एकूण नऊ सिंचन प्रकल्पांतर्गत 8162 हेक्टर क्षेत्रासाठी पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वरोरा तालुक्यातील पोथरा नाला मध्यम प्रकल्पातून 1800 हेक्टर, लाल नाला मध्यम प्रकल्पातून 1151 हेक्टर, तर लभानसराड मध्यम प्रकल्पातून 747 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतून पहिली पाणीपाळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात, तर दुसरी पाणीपाळी पाण्याच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

वरोरा व भद्रावती तालुक्यातील चारगाव मध्यम प्रकल्पातून 914 हेक्टर, राजुरा व कोरपना तालुक्यातील अमलनाला मध्यम प्रकल्पातून 1090 हेक्टर, तर कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पातून 1029 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतून पहिली पाणीपाळी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देण्याचे नियोजन आहे. चारगाव प्रकल्पातून दुसरी पाणीपाळी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात, तर इतर प्रकल्पांतून पाण्याच्या उपलब्धतेनुसार देण्यात येईल.

राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पातून 1230 हेक्टर क्षेत्रासाठी पहिली पाणीपाळी डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, तर दुसरी पाणीपाळी पाण्याच्या उपलब्धतेनुसार देण्याचे नियोजन आहे. तसेच वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक लघु प्रकल्पातून 108 हेक्टर आणि भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द लघु प्रकल्पातून 90 हेक्टर क्षेत्रासाठी पहिली पाणीपाळी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात, तर दुसरी पाणीपाळी पाण्याच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन आवर्तन : प्रकल्पनिहाय नियोजित सिंचन क्षेत्र हे संबंधित प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा व सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर आधारित आहे. प्रत्यक्ष सिंचनासाठी पाणीपुरवठा हा प्रकल्पातील जलसाठा, पाण्याची उपलब्धता आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार करण्यात येईल. संबंधित सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व लाभधारकांनी नियोजित पाणीपाळ्यांची नोंद घेऊन त्यानुसार रब्बी पिकांचे नियोजन करावे. अधिक माहितीसाठी संबंधित पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment