Search This Blog

Monday, 11 June 2018

रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड

चंद्रपूर, दि.2 जून- पृथ्वीवर शांत, स्वस्थ जीवन जगायचे असेल तर जंगलाचे प्रमाण एकूण भूभागाच्या 33 टक्के असायला हवे. महाराष्ट्रात सध्या 20 टक्के जमीन वनाखाली आहे. म्हणजेच आणखी तेरा टक्के जमीन वनाखाली यायला हवी. त्याचाच एक भाग म्हणून 2017 ते 2019या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र वनाखालील जमीन व शासकीय यंत्रणाकडील मर्यादित जमीन वापरून 33 टक्के जमीन वृक्षाच्छादित करणे शक्य नाही.  हे उदिष्ट साध्य करताना त्यातून रोजगार निर्मिती, उपजीविका साधने, निर्माण होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेतजमिनीचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाकडून 12 एप्रिल 2018 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्याचे शेत जमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सदर शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणा, इंदिरा आवास अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 खालील लाभार्थी आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्ज साहाय्य योजना 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामांच्या, शर्तींचे अधिनतेने प्राधान्य देण्यात येणार आहे.
ज्यांच्याकडे जॉबकार्ड आहे तसेच  ज्यांचे नावे शेत जमीन आहे असा उपरोक्त नमूद प्रवर्गातील व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. इच्छक लाभार्थ्यांनी विनंतीपत्र व संमतीपत्र संबंधित ग्रामपंचायतकडे सादर करावयाचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यपद्धतीप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामसभा लाभार्थ्याची निवड करेल.
या योजनेंतर्गत साग, चंदन, खाया, बांबू, निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू, फणस, ताड, शिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, महारुख, मंजीयम, मेलिया डूबिया इत्यादी प्रजातीकरिता100 रोपांचे अंदाजपत्रक  नमुना-1 व  जलद गतीने वाढणाऱ्या निलगिरी, सुबाभूळ इत्यादी प्रजातीकरिता  2500 रोपांचे अंदाजपत्रक नमूना क्र. 2 घेता येऊ शकतील.
सर्व इच्छक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन 50 कोटी वृक्ष लागवड व पर्यावरण संरक्षणाचे ईश्वरीय कामात योगदान देण्याचे तसेच याबाबत काही अडचणी असल्यास नजीकच्या वन विभाग कार्यालयास भेट देण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण,  चंद्रपूर यांनी केले आहे.
                                                            0000

महाराष्ट्रातील प्लॉस्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारा जिल्हा चंद्रपूरची लवकरच ओळख : नामदार हंसराज अहिर


सिपेट मार्फत वर्षभरात 2 हजार पैकी 1700 मुलांना महानगरांमध्ये नौकरी

चंद्रपूर दि.2 जून- कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लॉस्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे.
            काल चंद्रपूर शहरात  केंद्रीय केमिकल अँड पेट्रोकेमिकल मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या सिपेट या कॉलेजमार्फत प्लेसमेंट’  करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाण पत्र देण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढाकाराने 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीपेटच्या अभ्यासक्रमाला चंद्रपूरमध्ये सुरुवात करण्यात आली. संपूर्ण भारतात 31 शहरांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि चंद्रपूर या दोन शहरांमध्ये सिपेटच्या मार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. सहा महिन्यांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. 2014 पासून आतापर्यंत चंद्रपूरच्या सिपेट या संस्थेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई येथे टाटा,पॉलिमर. एलजी, इंदोर कंपोझिट आदी प्लॉस्टिक कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. ही सर्व मुले प्लॉस्टीक प्रोसेसिंग मशीन ऑपरेटर म्हणून या कंपन्यांमध्ये रुजू झाली असून त्यांना प्रमाणपत्र भेटल्यानंतर लगेच नौकरी मिळाली आहे. या सर्वांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी काल स्थानिक एका हॉटेलमध्ये प्रमाणपत्र वितरणाचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, राहुल सराफ, खुशाल बोंडे आदी  मान्यवरांसोबतच सिपेटचे प्रकल्प  इनचार्ज प्रवीण बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुलांना प्रमाणपत्रासह भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
           यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना संबोधित करताना हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले. त्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. सिपेट हा त्यातीलच एक प्रयत्न होता आणि  सिपेटचे यश बघता या संस्थेने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले. या संस्थेसाठी एक अद्यावत इमारत लवकरच ताडाली एमआयडीसीमध्ये उभारली जाणार असून याबाबत आपले मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी काही महत्त्वपूर्ण डिप्लोमा कोर्सेस सुरू होत असल्याबद्दलची ही घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी विख्यात प्लेसमेंट करणारी कंपनी मॅनपावर ग्रुप यांच्याही चंद्रपूर कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यांच्यामार्फत चंद्रपूरमधील बेरोजगारांना विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. या कार्यक्रमात आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी चंद्रपूरसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण ठरली असून नामदार अहिर यांच्या प्रयत्नांना संस्था उभारणीनंतर लगेच यश आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांनी देखील आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे बहारदार संचालन नासिर खान, प्राध्यापक राहुल उके यांनी केले. यावेळी नियुक्तीपत्र मिळालेल्या व वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीवर लागलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
                                                            0000

चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे आज मायभूमीत जंगी स्वागत जिल्हा प्रशासन व नागरिकांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे होणार कौतुक

चंद्रपूर दि.2 जून- उपजत कलागुणांच्या पाठीवर संधीची थाप मिळाली की आकाश ठेंगणे होते. याचे जिवंत उदाहरण तमाम महाराष्ट्रासाठी व देशासाठी देणारे चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील 10 एव्हरेस्टवीर उद्या मायभूमीत परतणार आहेत. काल मुंबईत राज्यपालचे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या मोहिमेचे कर्णधार चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतील भव्य सत्कारानंतर हे 10 ही विद्यार्थी उद्या दुपारी 3 वाजता चंद्रपूरमध्ये पोहोचत आहेत. महिन्याभराच्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर आपल्या जिल्ह्यात पोहोचणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह सामान्य नागरिकही उत्सुक आहेत.
उद्या दुपारी 3 वाजता विशेष वाहनाने शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे या मुलांचे आगमन होणार आहेत. त्यांच्यासोबत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर असून ते या विद्यार्थ्यांना घेऊन उद्या दुपारी 3 वाजता पोहोचत आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजली घोटेकरजिल्ह्यातील  नगर पालिकेचे अध्यक्ष, विविध स्वयंसेवी संस्था, याशिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत. वर्षभरापूर्वी एव्हरेस्ट बद्दल कुठलीही माहिती नसणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी खडतर प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. बोर्डा, देवाडा व जिवती या आश्रमशाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या निवडीपासून जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभाग गेल्या एक वर्षापासून या मोहिमेमध्ये सक्रिय झाला होते.  एवरेस्टकडे निघालेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये मनीषा धुर्वे, रमेश आडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, कवीदास काठमोडे यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर चंद्रपूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. तर यांच्यासोबतच या मोहिमेवर गेलेले शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, रमेश आडे, आकाश मडावी या विद्यार्थ्यांनी देखील एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पंचवीस लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले असून अन्य पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार असून उद्या मात्र त्यांचे मायभूमीत प्रथम आगमनानिमित्त स्वागत केले जाणार आहे. अतिशय सामान्य कुटुंबातल्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चंद्रपूरच्या घराघरांमध्ये चर्चा असून संपूर्ण राज्यात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. काल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षक विमलादेवी देऊस्कर, डॉ. अविनाश देऊस्कर, शेखर बाबू, परमेशसिंग, डॉ.रवी वाईकर याशिवाय या मोहिमेचे सुरवातीपासून नेतृत्व करणारे तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी तसेच सध्याचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांचे देखील स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मिशन शौर्य मधील यशस्वी विद्यार्थी हे चंद्रपूरचे कोहिनूर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी मुलांना ऑलिंपिक स्पर्धेसाठी घडविण्याचा मानस व्यक्त केला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पराक्रमाने चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही कमालीचे आनंद दिसून येत असून उद्या मोठ्या संख्येने सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी ही या मुलांच्या स्वागतासाठी विश्रामगृह ला पोहोचणार आहेत.
                                                            000

चंद्रपूरात टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्रीमंडळाचा महत्‍वपूर्ण निर्णय.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय परिसरात राज्‍य  शासनाचा वैद्यकिय शिक्षण विभाग, जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने आज घेतला. राज्‍याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल अर्थात कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने चंद्रपूर येथे 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍यात यावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्‍या वर्षभरापासुन टाटा ट्रस्‍टकडे पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांसमवेत अनेक बैठकी सुध्‍दा त्‍यांनी घेतल्‍या. टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर येथे सदर रूग्‍णालय उभारण्‍यासंदर्भात होकार मिळाल्‍यानंतर आज झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा विषय चर्चेला आला असता याबाबतच्‍या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाने मान्‍यता प्रदान केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाची लोकसंख्‍या सुमारे 23 लक्ष असुन त्‍यात दरवर्षी 0.6 टक्‍क्‍याने वाढ होत आहे. सदर जिल्‍हयात प्रदुषणाची तिव्रता अधिक आहे. त्‍यामुळे कर्करोगाने ग्रस्‍त रूग्‍णांचे प्रमाण सुध्‍दा जिल्‍हयात मोठया प्रमाणावर आहे. चंद्रपूर व नजिकच्‍या जिल्‍हयातील कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना सर्वंकष व अत्‍याधुनिक कर्करोग उपचाराच्‍या सोयीसुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी राज्‍य शासनासह, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्‍ये अग्रगण्‍य व नामांकित असलेल्‍या टाटा ट्रस्‍ट तसेच जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा प्रस्‍ताव विभागाने सादर केला व या प्रस्‍तावाला आज मंजूरी देण्‍यात आली.

सदर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍यासाठी व त्‍याचे संचलन करण्‍यासाठी विशेष कृती समितीची तसेच चांदा कर्करोग केअर प्रतिष्‍ठान या नावाची एक संस्‍था स्‍थापना करण्‍यात येणार आहे. सदर रूग्‍ण्‍णालय उभारणीसाठी या प्रकल्‍पामध्‍ये भागीदार असणा-या तीनही संस्‍थांचे आर्थिक दायित्‍व असणार आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर या संस्‍थेची उभारणी करण्‍यात येणा-या परिसरातील विभागाच्‍या अखत्‍यारित 50 एकर जमिनीपैकी सुमारे 10 एकर जागा सदर प्रकल्‍पासाठी निर्माण करण्‍यात येणा-या संस्‍थेस 30 वर्षासाठी नाममात्र दराने भुईभाडयाने देण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. या कर्करोग रूग्‍णालयातील रूग्‍णसेवा शासकीय वैद्यकिय रूग्‍णालयातील विभागात उपलब्‍ध करून देण्‍यात येतील त्‍याचप्रमाणे शासकीय वैद्यकिय रूग्‍णालय चंद्रपूर येथील रूग्‍णांनाही कर्करोग उपचारांच्‍या सुविधा आवश्‍यक असल्‍यास सदर कर्करोग रूग्‍णालयात त्‍यांना उपचार सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात येतील. या रूग्‍णालयासाठी सुमारे 113 कोटी रूपयांचे सहाय्य चंद्रपूर जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान यांच्‍याकडून मिळणार असुन त्‍यापैकी 76 कोटी रूपये कर्करोग रूग्‍णालय उभारणी व 37 कोटी रूपये सदर रूग्‍णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी यांच्‍या निवासस्‍थान बांधकामासाठी प्राप्‍त होणार आहे. तसेच सदर रूग्‍णालय कार्यान्‍वीत झाल्‍यानंतर व्‍यवहार्य दृष्‍टीने चालविण्‍याइतपत सक्षम होईपर्यंत प्रथम 7 वर्ष प्रतीवर्षी सुमारे 20 कोटी रूपयांचे अनुदान राज्‍य शासनातर्फे याविषयी स्‍थापन करण्‍यात येणा-या कंपनीला उपलब्‍ध करून देण्‍याबाबत राज्‍य शासनाच्‍या आर्थिक दायित्‍वास सुध्‍दा मान्‍यता प्रदान करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या सर्वांगिण विकासासाच्‍या दृष्‍टीने विविध महत्‍वपूर्ण निर्णय घेणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरात उभारण्‍यात येणारे सदर कर्करोग रूग्‍णालय त्‍यांच्‍या विकासकामांच्‍या दिर्घ मालिकेतील मैलाचा दगड ठरणार आहे. सदर कर्करोग रूग्‍णालय एका वर्षात बांधून पूर्ण करत जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍यात येणार असुन या माध्‍यमातुन जिल्‍हयातील नागरिकांना आरोग्‍याची मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे. 

जिल्हयात अतिसार नियंत्रण पंधरवडा -- प्रा.आ.केंद्र, दुर्गापूर येथून शुभारंभ

चंद्रपूर,दि. 1 जून- चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत ओ. आर. टी. कॉर्नर चे प्रा.आ.केंद्र,दुर्गापूर येथे  जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ.संदिप गेडाम यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.सदर कार्यक्रमाप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी मेश्राम,वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित जयस्वाल,वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष वाकडे, यावेळी उपस्थित होते.
               यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. व अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी,ओआरएस व झिंक गोळया यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्याक्षिके,आशा कर्मचाऱ्याद्वारे ओआरएस व झिंक गोंळयाचे घरोघरी वाटप करण्यात येणार आहे.अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन,आरोग्य संस्थामध्ये ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करुन अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार करण्याबाबत मार्गदर्शन केले.
               अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात 28 मे ते  9 जून 2018 या कालावधीत जिल्हयातील सर्व ग्रामीण,शहरी भागात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे.देशात 5 वर्षापर्यतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते.तरी सदर अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचा लाभ जिल्हयातील गरजू जनतेने घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जितेंद्र पापळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गोपाल भगत,वैधकीय अधिकारी,डॉ.अंजली आंबटकर,यांनी केले आहे.

00000000