Search This Blog

Monday 11 June 2018

चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे आज मायभूमीत जंगी स्वागत जिल्हा प्रशासन व नागरिकांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे होणार कौतुक

चंद्रपूर दि.2 जून- उपजत कलागुणांच्या पाठीवर संधीची थाप मिळाली की आकाश ठेंगणे होते. याचे जिवंत उदाहरण तमाम महाराष्ट्रासाठी व देशासाठी देणारे चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील 10 एव्हरेस्टवीर उद्या मायभूमीत परतणार आहेत. काल मुंबईत राज्यपालचे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या मोहिमेचे कर्णधार चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतील भव्य सत्कारानंतर हे 10 ही विद्यार्थी उद्या दुपारी 3 वाजता चंद्रपूरमध्ये पोहोचत आहेत. महिन्याभराच्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर आपल्या जिल्ह्यात पोहोचणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह सामान्य नागरिकही उत्सुक आहेत.
उद्या दुपारी 3 वाजता विशेष वाहनाने शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे या मुलांचे आगमन होणार आहेत. त्यांच्यासोबत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर असून ते या विद्यार्थ्यांना घेऊन उद्या दुपारी 3 वाजता पोहोचत आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजली घोटेकरजिल्ह्यातील  नगर पालिकेचे अध्यक्ष, विविध स्वयंसेवी संस्था, याशिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत. वर्षभरापूर्वी एव्हरेस्ट बद्दल कुठलीही माहिती नसणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी खडतर प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. बोर्डा, देवाडा व जिवती या आश्रमशाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या निवडीपासून जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभाग गेल्या एक वर्षापासून या मोहिमेमध्ये सक्रिय झाला होते.  एवरेस्टकडे निघालेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये मनीषा धुर्वे, रमेश आडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, कवीदास काठमोडे यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर चंद्रपूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. तर यांच्यासोबतच या मोहिमेवर गेलेले शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, रमेश आडे, आकाश मडावी या विद्यार्थ्यांनी देखील एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पंचवीस लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले असून अन्य पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार असून उद्या मात्र त्यांचे मायभूमीत प्रथम आगमनानिमित्त स्वागत केले जाणार आहे. अतिशय सामान्य कुटुंबातल्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चंद्रपूरच्या घराघरांमध्ये चर्चा असून संपूर्ण राज्यात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. काल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षक विमलादेवी देऊस्कर, डॉ. अविनाश देऊस्कर, शेखर बाबू, परमेशसिंग, डॉ.रवी वाईकर याशिवाय या मोहिमेचे सुरवातीपासून नेतृत्व करणारे तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी तसेच सध्याचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांचे देखील स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मिशन शौर्य मधील यशस्वी विद्यार्थी हे चंद्रपूरचे कोहिनूर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी मुलांना ऑलिंपिक स्पर्धेसाठी घडविण्याचा मानस व्यक्त केला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पराक्रमाने चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही कमालीचे आनंद दिसून येत असून उद्या मोठ्या संख्येने सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी ही या मुलांच्या स्वागतासाठी विश्रामगृह ला पोहोचणार आहेत.
                                                            000

No comments:

Post a Comment