इंदिरा नगरातील 1 कोटीच्या रस्त्याला तातडीने सुरूवात करण्याचे आदेश
चंद्रपूर दि.27 जून : जगात जे अशक्य आहे, तो एवरेस्ट चढण्याचे काम चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले आहे. त्यामुळे या जिद्दीच्या ऑलम्पिकमध्ये मेडल मिळविणे सुद्धा कठीण नाही. चंद्रपूरच्या शिरपेचात ऑलिंपिकचे मेडल येत्या काळात आदिवासी विद्यार्थी आणतील त्यासाठी मिशन शक्ती आपण सुरू केले असून यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ, असे गौरवोदगार राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे काढले .
चंद्रपूरातील इंदिरानगर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व महाराणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळातर्फे आयोजित भव्य आदिवासी समाज प्रबोधन स्वाभिमान मेळाव्यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह या प्रभागाच्या नगरसेविका चंद्रकला सोयाम उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थी व एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. एव्हरेस्ट सर करणारी मुले आज राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्यासाठी गेले असल्यामुळे त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आला नाही. मात्र गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांनी विविध क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख केला. जिल्ह्यातील पाच मुले विमानाच्या उंचीवर असणाऱ्या एवरेस्ट शिखराला गाठू शकली आहेत. आज त्यांचा सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लवकरच त्यांचा सत्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील होईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या मुलांच्या स्वागतासाठी अभिनेते आमिर खान देखील उत्सुक असून ते देखील या स्वागतासाठी येतील असे सुतोवाच त्यांनी केले. आदिवासी बांधवांनमध्ये उपजत चिकाटी असून प्रामाणिकपणे यश प्राप्त करण्याची शक्ती आहे. आगामी काळात महाराष्ट्राचे नाव आणि सन्मान वाढवण्यासाठी या शक्तीचा वापर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल. मात्र ही सुरुवात असून ऑपरेशन शौर्य नंतर मी मिशन शक्तीला पण सुरुवात करणार असून यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑलिंपिक मधील पाच विशीष्ट खेळांसाठी विशेष प्रावीण्य दिले जाणार आहे. या माध्यमातून आगामी काळामध्ये देशासाठी मेडल मिळवणाऱ्यांमध्ये चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रोजगार युक्त व्हावा यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे . पोभुर्णा तालुक्यामध्ये 1000 आदिवासी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांची एक कंपनी तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार मिळणार आहे. याठिकाणी नगरसेविका चंद्रकला सोयाम यांनी त्यांच्या प्रभागातील एक कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी केली. नागरिकांचा यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. हा धागा पकडून त्यांनी महापौर अंजली घोटेकर यांना व्यासपीठावर निर्देश दिले की, तातडीने हा एक कोटी रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात यावा, येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही व्हावी , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment