Search This Blog

Monday, 11 June 2018

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते भिवकुंड नाल्यातील साखळी सिमेंट बंधाऱ्याचे उदघाटन


चंद्रपूर दि. 8 जून : चंद्रपूर शहरानजीकच्या भिवकुंड नाल्यावर साखळी बंधारे उभारण्याची शृंखला सुरू होत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंचय होणार आहे. राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सायंकाळी नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत साखळी बंधाऱ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.
      यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सिंचन प्रकल्प बाबतची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरत असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे काम जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक सिंचन क्षमता कशी वाढवता येईल ,याबाबत प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील 16 पैकी 8 उपसासिंचन योजना पुनर्जीवीत करण्यात आपल्याला यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . शिवणी चोर उपसा सिंचनाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेत्यांनी सांगितले. हा प्रकल्प बंद पडला असताना आमदार असतानापासून सभागृहा आपण लढा दिला होता. याठिकाणी लवकरच पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याबाबतचा मानस असून जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी सिंचनाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी त्यांनी भिवकुंड नाल्याच्या परिसरात लवकरच विसापूर येथे सैनिकी शाळा उभी राहत असून ही शाळा महाराष्ट्राचे वैभव ठरणार असल्याचे सांगितले. या शाळेमध्ये वाघा बॉर्डर सारखा कार्यक्रम घेतल्या जाईल. या कार्यक्रमाची महाराष्ट्रभर कीर्ती पसरेल अशा पद्धतीचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या सैनिकी शाळेचे बांधकाम पुढच्या 12 महिन्यांमध्ये पूर्णत्वास जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विक्रमी वेळेमध्ये बांधून तयार होणारी ही सैनिकी शाळा बघायला लोक येतील ,
अशी आशा  त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अभिनव कार्यक्रमाची माहिती जनतेला दिली. अवघा चंद्रपूर जिल्हा पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केला म्हणून आनंदी असताना आपण आता एव्हरेस्ट नंतर मिशन शक्ती सुरू केले असून 2024 च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी देशासाठी पदक आणावे अशा पद्धतीची क्रीडाक्षेत्रात  रचना करत असल्याचे सूतोवाच त्यांनी  केले. जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्र असो वा अन्य कोणतेही क्षेत्र जिल्हा कधीच मागे राहू नये,यासाठी आपली धडपड असल्याचे  सांगितले .जिल्ह्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम दर्जाचे तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून उत्तमात उत्तम आरोग्य सेवा जनतेला मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. कॅन्सर हॉस्पिटल लवकरच सुरू होत आहे .
मात्र अनेक आरोग्याच्या संदर्भात वर्धा येथील सावंगी मेघे हॉस्पिटलशी करार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .या माध्यमातून ज्या सुविधा चंद्रपूरमध्ये नसतील त्या सुविधा तूर्तास वर्ध्याच्या सावंगी मेघे हॉस्पिटल मधून चंद्रपूरच्या जनतेला मिळेल ,अशी शाश्वती त्यांनी दिली. कृषी क्षेत्र बाबतही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रयोग सुरू असून विदर्भ व परिसरात घेतल्या जाणाऱ्या पीकासंदर्भात  संशोधन करणारी एक संस्था अजयपुर जवळ उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या या नदी पुनर्जीवन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाल्यांमधील जलक्षमता वाढण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले .या कार्यक्रमाला बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा ,बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडेउपसभापती इंदिराताई पिपरेपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वेमूलकोंडा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन शितल पाझारे यांनी केले.
00000000

No comments:

Post a Comment