सिपेट मार्फत वर्षभरात 2 हजार पैकी 1700 मुलांना महानगरांमध्ये नौकरी
चंद्रपूर दि.2 जून- कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लॉस्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे.
काल चंद्रपूर शहरात केंद्रीय केमिकल अँड पेट्रोकेमिकल मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या सिपेट या कॉलेजमार्फत ‘प्लेसमेंट’ करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाण पत्र देण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढाकाराने 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीपेटच्या अभ्यासक्रमाला चंद्रपूरमध्ये सुरुवात करण्यात आली. संपूर्ण भारतात 31 शहरांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि चंद्रपूर या दोन शहरांमध्ये सिपेटच्या मार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. सहा महिन्यांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. 2014 पासून आतापर्यंत चंद्रपूरच्या सिपेट या संस्थेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई येथे टाटा,पॉलिमर. एलजी, इंदोर कंपोझिट आदी प्लॉस्टिक कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. ही सर्व मुले प्लॉस्टीक प्रोसेसिंग मशीन ऑपरेटर म्हणून या कंपन्यांमध्ये रुजू झाली असून त्यांना प्रमाणपत्र भेटल्यानंतर लगेच नौकरी मिळाली आहे. या सर्वांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी काल स्थानिक एका हॉटेलमध्ये प्रमाणपत्र वितरणाचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, राहुल सराफ, खुशाल बोंडे आदी मान्यवरांसोबतच सिपेटचे प्रकल्प इनचार्ज प्रवीण बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुलांना प्रमाणपत्रासह भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना संबोधित करताना हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले. त्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. सिपेट हा त्यातीलच एक प्रयत्न होता आणि सिपेटचे यश बघता या संस्थेने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले. या संस्थेसाठी एक अद्यावत इमारत लवकरच ताडाली एमआयडीसीमध्ये उभारली जाणार असून याबाबत आपले मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी काही महत्त्वपूर्ण डिप्लोमा कोर्सेस सुरू होत असल्याबद्दलची ही घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी विख्यात प्लेसमेंट करणारी कंपनी मॅनपावर ग्रुप यांच्याही चंद्रपूर कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यांच्यामार्फत चंद्रपूरमधील बेरोजगारांना विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. या कार्यक्रमात आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी चंद्रपूरसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण ठरली असून नामदार अहिर यांच्या प्रयत्नांना संस्था उभारणीनंतर लगेच यश आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांनी देखील आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे बहारदार संचालन नासिर खान, प्राध्यापक राहुल उके यांनी केले. यावेळी नियुक्तीपत्र मिळालेल्या व वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीवर लागलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment