Search This Blog

Friday, 28 August 2020

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा वापर करावा : जिल्हाधिकारी



 कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा वापर करावा : जिल्हाधिकारी

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1117 कोरोनातून बरे

24 तासात 97 बाधितांची नोंद ; एका बाधिताचा मृत्यू

Ø  बाधितांची संख्या पोहोचली 1896 वर

Ø  उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 756

चंद्रपूर,दि. 28 ऑगस्ट : कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा अर्थात एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, डब्ल्यू म्हणजे वॉश युवर हँन्ड, सी म्हणजे कंट्रोल ऑफ क्राऊड या मुलमंत्राचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. या मुलमंत्राचा अंगीकार केल्यास जिल्ह्यात कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांनी गर्दी होणार नाही असे कुठलेही समारंभ आयोजित करू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे.

31 ऑगस्टपर्यंत 1 हजार 200 आयसोलेटेड बेडची आवश्यकता लागणार आहे. त्यापैकी 900 बेड तयार असून अधिकच्या 450 बेडची सुविधा सैनिक स्कूल येथे केलेली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधितांना दाखल करून घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

सोशल मीडियावर एका बाधितामागे दीड लाख रुपये मिळतात असा संदेश फिरत आहे. या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून हा संदेश चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. खाजगी रुग्णालयामार्फत एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये 24 तासात आणखी 97 बाधितांची भर पडली आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 896 वर पोहोचली आहे. आतापर्यंत  1 हजार 117 बाधितांना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर 756 बाधितांवर उपचार सुरू आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 68 वर्षीय कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा आजार असल्याने बाधिताला 27 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान 27 ऑगस्टलाच सायंकाळी बाधिताचा मृत्यू झाला. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया व श्वसनाचा आजार होता. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,  आतापर्यंत जिल्ह्यात 23 मृत्यू झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील 20 तर तीन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर 40, ब्रह्मपुरी 4, भद्रावती 5, राजुरा 7, सावली व चिमूर येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी 3, मुल 9, बल्लारपूर 12, पोंभुर्णा 2, कोरपना 7, वरोरा 3, उत्तर प्रदेश येथून आलेला एक तर वणी यवतमाळ येथील दोन बाधिताचा समावेश असून  एकूण 97 बाधित पुढे आले आहेत.

000000

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

 

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता दि. 1 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन डिजीटल मार्केटिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधी आयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी, गुगल अॅडव्हर्ड, गूगल

अॅनालिटिक्स, सोशल मिडीया मार्केटिंग, युटुब, घरी बसून पैसे कमविण्याची संधी उद्योग उभारणी प्रक्रीया, इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी त्वरीत दि. 31 ऑगस्ट

पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे,  मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा

 

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक / युवतींकरीता दि. 5 सप्टेंबर रोजी 1 दिवसीय कालावधीचे ऑनलाईन सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये व्यवसाय उद्योजकांशी चर्चा लघु उद्योग, व्यवसाय शासकीय व्याख्या व नोंदणी पद्धती, आयात निर्यात उद्योग संधी, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, लघुउद्योगांसाठी व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व अनुदान, सिडबी तर्फे योजना व अनुदान, लघुउद्योग प्रोडक्ट मार्केटिंग इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक युवतींनी त्वरीत दि. 04 सप्टेंबर पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे, मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.

0000000

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

 

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट: वाळू,रेती निर्गती सुधारीत धोरण 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरिता तसेच रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीची माहिती तात्काळ महसूल विभागास प्राप्त होणे व रोक लावण्याची कार्यवाही करण्याकरीता टोल फ्री 1800 233 6890 या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तरतुद केलेली आहे. जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा खनिकर्म कार्यालय, उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येईल.

शासन निर्णयातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरीता टोल फ्री क्रमांक 1800 233 6890 वर प्राप्त तक्रारीची भरारी पथकाव्दारे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टिने टोल फ्री क्रमांक हा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यान्वीत असून प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद घेऊन संबंधीतास पाठविण्यात येईल. टोल फ्री क्रमांकवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निनावी तक्रारीच्या नोंदी विहीत नमुन्यातील नोंदवहीमध्ये घेण्यात येईल. प्राप्त तक्रारीची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे तसेच संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावरील गस्तीपथकास यांना विनाविलंब ईमेल, दुरध्वनी वर पाठविण्यात येईल.

टोल फ्रि क्रमांक सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या बाहेर फलक लावून प्रसिध्द करण्यात येईल. प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने करावयाचे कार्यवाहीबाबत परिवहन विभाग, पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारीच्या निपटाऱ्याबाबत आवश्यक नोंदी ठेवून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे दरमहा मासीक अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे सादर करतील.

00000

29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध विभागांचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 29 ऑगस्ट शनिवार व 30 ऑगस्ट रविवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.

शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे आगमन व  कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही नगरपरिषदेच्या विकास कामासाठी मास्टरप्लॅन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 145 गावातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केले त्याबाबत मास्टर प्लॅन करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक नियोजन भवन येथे घेणार आहेत.

दुपारी दीड वाजता महानगरपालिका चंद्रपूर शहरालगतच्या 15 गावांच्या पूरनियंत्रण रेषा बाबत बैठक घेणार आहेत. दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीच्या खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्य नियुक्ती करणेबाबत बैठक असणार आहे. दुपारी 3 ते 4 वाजेचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 4 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाय अॅश व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत ते अभ्यांगतासोबत थेट संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील व रात्री 9 वाजता रामफुल निवास पोटेगाव रोड, गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गडचिरोली येथे असणार आहेत. दुपारी 2 वाजता गडचिरोली वरून ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी 3 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपूरी वरून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदासपेठ येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

00000