Search This Blog

Tuesday, 2 February 2021

रोजंदारी कामगारांच्या वेतनाकरिता पाठपुरावा सुरू

 रोजंदारी कामगारांच्या वेतनाकरिता पाठपुरावा सुरू

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रोजंदारी तत्वावर कार्यरत वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचारी यांनी कोविड योद्धांचे भीक मांगो आदोलन केले. या आंदोलनाच्या वृत्तानुसार सदर रोजंदारी कामगारांच्या वेतनाकरिता संस्थेतर्फे वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून सदर प्रकरण हे शासन आदेशाकरिता शासन स्तरावर प्रलंबित असल्याचा खुलासा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केला आहे.

0000

नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  केंद्रीय महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरूस्कारासाठी पात्र इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रीत करण्यात येत आहेत.

नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुकांनी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर नमुद मार्गदर्शिकेनुसार आवश्यक पात्रता, नामांकन सादर करणेबाबत माहिती, आवश्यक कागदपत्रे, नामांकन सादर करण्याची पध्दत, वयाची अट, अनुभव याचे वाचन करुन  www.narishaktipuraskarwcdgovin/ किंवा  www.wcd.nic.in या वेबसाईटवर केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.

 

0000

मिशन बिगीन अगेन आदेशास 28 फेब्रुवारी पावेतो मुदतवाढ

 मिशन बिगीन अगेन आदेशास 28 फेब्रुवारी पावेतो मुदतवाढ

 चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश व सुचना यांना दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पावेतो मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

            कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता मिशन बिगीन अगेन बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

0000

Monday, 1 February 2021

पांदन रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 



पांदन रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करा

 – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 1 :  जिल्ह्यात पांदन रस्त्यांची कामे मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे. सामान्य नागरिकांना पांदन रस्त्याअभावी त्रास होऊ नये, तसेच मजुरांना मागणीप्रमाणे कामे मिळावी म्हणून नियोजनपुर्वक पांदन रस्त्यांच्या व मनरेगाच्या कामात वाढ करून ती कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.

            पालकमंत्री पांदन रस्ते योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री  बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) मंगेश आरेवार, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, दीपक मल्होत्रा, विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.

मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत संत्रा लागवडीसाठी चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठ यांचेशी बोलणे करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

            जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सध्या 56 हजार 760 ग्रामपंचायतीची व 4 हजार 258 यंत्रणेची कामे मंजूर असून आज रोजी 1292 कामे ग्रामपंचायतीची  आणि 93 कामे यंत्रणांची सूरू आहेत.  सध्या एकूण 1 लाख 48 हजार 626 जॉबकार्ड धारक कार्यरत आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालु आर्थिक वर्षात आतापर्यंत मासिक मनुष्य दिन निर्मितीची टक्केवारी 98.28 टक्के असल्याची माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली.

            यावेळी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0 0 0

गत 24 तासात 13 कोरोनामुक्त


गत 24 तासात 13 कोरोनामुक्त ; सहा पॉझिटिव्ह


Ø  आतापर्यंत 22,567 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 121

 

चंद्रपूर, दि. 1 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सहा कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 80 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 567 झाली आहे. सध्या 121 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 586 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 75 हजार 704 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील एक, चंद्रपुर तालुक्यातील एक, बल्लारपुर एक, ब्रम्हपुरी दोन व येथील चिमूर एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000