Search This Blog

Friday, 2 April 2021

पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा दौरा

 


पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा दौरा

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे दिनांक 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन. दु.12 वा. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1 वा. क्रिडा विभागाचे अधिकाऱ्यासमवेत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 3.15 वा. बल्लारपूर येथील नवीन क्रिडा स्टेडीयमला भेट व निरीक्षण. दु. 3.30 ते 4.30 चंद्रपूर सैनिक शाळा येथे भेट. सायं. 4.30 वा. नागपूरकडे प्रयाण.

000

सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने


 

सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित

  -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करासहीतच्या खालील दराप्रमाणे किंवा यापुर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.  

            एचआरसीटी चेस्ट तपासणीकरिता मशीनच्या क्षमतेनुसार निश्चित केलेले दर कंसात दर्शविल्याप्रमाणे आहेत. 16 स्लाईसपेक्षा कमीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सिटी 16-64 स्लाईस करिता रूपये दोन हजार पाचशे, मल्टी डिटेक्टर सिटी 64 स्लाईसपेक्षा जास्त करिता रूपये तीन हजार दरनिश्चित करण्यात आले आहेत. उपरोक्त कमाल रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी अहवाल, सीटी फिल्म, पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट सॅनिटायझोशन चार्जेस व जी.एस.टी. या सर्वांचा समावेश असेल.

            एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर उपरोक्तपैकी कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जन द्वारे तपासणी असल्याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या  प्रिस्क्रिप्शन शिवाय ही तपासणी करू नये.आयआरसीटी-चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रूग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा कार्पोरेट/खाजगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केद्राशी सांमजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत.

सर्व रूग्णालये, तपासणी केंद्रे यांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्या प्रकारानूसार) दर्शनी भागात लावणे तसेच, निश्चित दरानूसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.

तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त हे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

000

Thursday, 1 April 2021

दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8

 

दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8

 चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत.

नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील तसेच त्यांना रात्री 11 पर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.

            शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मीक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावी. अभ्यागतांकरिता ऑनलाईन आरक्षणासारख्या सोयीची सुरवात करावी. तसेच या ठिकाणी प्रवेशाकरिता मास्कचा वापर बंधनकारक राहील. तसेच प्रवेशस्थळी तापमान मोजण्याचे साधन, परिसरातील प्रत्येक ठिकाणी हात धुण्याकरिता साबन अथवा सॅनिटायजर्स ठेवावी.

यापुर्वीच्या नियमांसोबतच वरील निर्देशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

000

गत 24 तासात 120 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 120 कोरोनामुक्त

353 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

Ø  आतापर्यंत 25,390 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2291

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचे मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 390 झाली आहे. सध्या 2291 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 76 हजार 112 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 44 हजार 375 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यामध्ये वार्ड नं. 16, मूल, येथील 67 वर्षीय पुरूष, रामनगर, चंद्रपूर येथील 38 वर्षीय पुरूष व महाडोली वरोरा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 389, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 353 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 102, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपुर 11, भद्रावती 37, ब्रम्हपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही सात, मूल 13, सावली सहा, गोंडपिपरी एक, राजूरा 10, चिमूर 36, वरोरा 74, कोरपना 21, जीवती तीन व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे

-         जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाचे उद्दिष्टदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे जसे मतदान केंद्र ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक घेण्यात आली, याप्रसंगी जिल्हाधिकारी गुल्हाने बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.  

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणात जिल्ह्यात 22 लाख 42 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यापैकी 45 वर्षावरील नागरिक जे एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के म्हणजे 6 लाख 72 हजार 618 नागरिकांच्या लसिकरणाचे उद्दिष्ठ असून त्यासाठी 14 लाख 80 हजार डोजेसची आवश्यकता राहणार आहे. यासाठी एक-दोन दिवसात नागपूर येथून लससाठा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सद्या 81 लसीकरण केंद्र सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यावर लगेचच जिल्हा प्रशासनाद्वारे एकूण 200 लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला दिले.  यावेळी त्यांनी कोरोना रूग्णांकरिताच्या जिल्ह्यातील सर्व ऑक्सीजन बेडवर अखंडीत ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध आहे का, याबाबत खात्री करून घेण्याचे सांगितले तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत विविध बाबींचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. प्रतिक बोरकर, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गणेश धोटे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0000