Search This Blog

Sunday, 4 April 2021

शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद

 शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच पाचवी ते नववी पर्यंत व अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते‌. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त शालेय वर्गापाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत व सर्व माध्यमांचे वरीष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, अभिमत विद्यालये, कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत असलेले वर्ग तात्पुरते स्वरुपात दि. 5 एप्रिल 30 एप्रिल 2021 या कालावधीकरीता बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी दिले आहेत.

            आदेशात नमुद केलेनुसार वरील शैक्षणिक वर्ग केवळ ऑनलाईन सुरु ठेवण्यास परवानगी राहील. शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित आवश्यकतेनुसार महाविद्यालयात उपस्थित राहतील. शिक्षक तसेच प्राध्यापक महाविद्यालयात येऊन ऑनलाईन वर्ग घेतील तसेच बारावी बोर्ड किंवा महाविद्यालयीन परीक्षेकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील.

राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे

पालन करणे सर्वसंबधीतांना बंधनकारक राहील. सदर आदेशाची कोणतेही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000

वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ - ना. सुनिल केदार


 

वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ

-         ना. सुनिल केदार

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : सानेन जातीच्या शेळ्यांचे नेदरलँड, न्युझिलंड, इजराईल इत्यादी देशामध्ये संगोपन केले जात असुन ही शेळी दिवसाला 12 लिटर पर्यंत दुध उत्पादित करते. या शेळीच्या दुधाला विविध दुध उत्पादने तयार करण्याकरिता मोठी मागणी असुन त्यास चांगला भाव मिळत असल्याने सानेन जातीच्या शेळ्या व कृत्रीम रेतनाकरिता त्याच्या विर्यमात्रा तसेच मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या ब्राझीलीयन गीर गाय जातीच्या विर्यकांड्या महाराष्ट्रात आयात करण्याची शासनाची योजना अंमलात आणून दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात येईल असे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्री सुनिल केदार यांनी नियोजन भवन येथे काल आढावा बैठक घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. सुभाष धोटे, आ.किशोर जोरगेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भि.डो. राजपुत,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. अविनाश  सोमनाथे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्री. गडवे तसेच जिल्ह्यातील  पशुसंवर्धन व दुग्धविकास  विभागाचे अधिकारी उपस्थित होते

ना. केदार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील मागणीनुसार गावठी गायीच्या कृत्रीम रेतणातून कालवडच जन्माला यावी यासाठी देशी प्रजातीचे सेक्स सॉर्टेट सिमेन लवकरच माफक दरात लवकरच पशुपालकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील दुध संकलन वाढविण्याकरिता जिल्ह्यातील दुध संकलन केंद्र वाढविण्याचे निर्देश मंत्री सुनिल केदार यांनी दिले.  तसेच जिल्ह्यात कुक्कुट पालन व्यवसाय पुर्ण क्षमतेने होत नसल्याचे खंत व्यक्त करून कुक्कुट पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी पथदर्शी कुक्कुटपालन प्रकल्प उभा करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून  किमान 10 एकर जागेची मागणी करावी, असे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील नव्याने स्थापित झालेल्या 4 फिरते पशुचिकित्सालय व त्याचे फलनिष्पत्तीबाबत  राज्यभरात कंत्राटी पध्दतीने पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेशक ही  पदे भरण्याबाबत शासनाने मान्यता प्रदान केले असून आगामी  काळात रिक्त पदे भरण्याबाबतची  कार्यवाही  पुर्ण  होणार असल्याचे त्यांनी आ. धोटे यांच्या एका प्रश्नाच्या संदर्भात सांगितले. 

            जिल्ह्यातील  कृत्रिम रेतन व लसीकरण कार्य दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने फार कमी असून सर्व  तांत्रिक  कामे  वाढविण्याकरिता  सर्वतोपरी  प्रयत्न  करण्याचे निर्देश ना. केदार यांनी यावेळी  दिले. यावेळी त्यांनी गायी म्हशीचे कृत्रीम रेतन, दुग्ध उत्पादन, लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव, बर्ड फ्ल्यु आजार, कुक्कुटपालन व्यवसाय, शेळीपालन इ. बाबींचा आढावा घेतला.

            बैठकीत आ. सुभाष धोटे व आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्ह्यातील दुध उत्पादन व पशुसंवर्धनाबाबत जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामाकाजाचा तपशील सादर केला.

            बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा

 

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा

आमसभेतील ठरावाप्रमाणे पांदन रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : सिंदेवाही विभागात मनरेगा अंतर्गत सेल्फवर 175 कामे असताना अद्याप एकही काम सुरू नाही ही बाब योग्य नसून वरील सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे तसेच आमसभेच्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे पांदण रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी विश्रामगृह भवनात घेतला. यावेळी नगराध्यक्षा आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, गट विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, नायब तहसीलदार श्री. धात्रक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

2016-17 पासून विभागातील घरकुलाचे कामे प्रलंबित असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, पाणीपुरवठा, तांडा वस्ती सुधार योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास, धडक सिंचन विहीर योजना इत्यादी बाबत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले.

राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार

राज्य शासनातर्फे सिंदेवाई तालुक्यातील मेंढा येथील दिनेश नामदेव शिंदे यांना कै. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-2019 तसेच पांढरवाणी येथील गुरुदास अर्जुन मसराम यांना कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2019  प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

बैठकीला विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

क्रिडा संकुलला निधी कमी पडू देणार नाही - क्रिडा मंत्री सुनील केदार

 


क्रिडा संकुलला निधी कमी पडू देणार नाही

- क्रिडा मंत्री सुनील केदार

 

चंद्रपूर दि. ४:  जिल्ह्यातील क्रिडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.        

क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी बल्लारपूर येथील क्रिडा संकुलाची काल पाहणी केली. यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार, आ.सुभाष धोटे, क्रिडा उपसंचालक अविनाश पुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा क्रिडा अधिकारी विनोद ठिकरे, माजी क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते

क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी बल्लारपूर क्रिडा संकुलला सोलर पॅनल तसेच संरक्षण भिंत इत्याची कामाची  दुरस्ती करण्याबाबत क्रिडा विभागाला निर्देश दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर क्रिडा संकुलाचा उपयोग क्रिडा प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असे मत व्यक्त केले. 

सैनिक शाळेतील शहीद विरांचे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

            क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी काल चंद्रपूर येथील सैनिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सैनिकी शाळा ही  देशातील आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी  शाळांपैकी अतिशय उत्तम असून त्यामध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी ग्रंथालय, शॉपिंग कॉम्पेक्स, जलतरण तलाव, वसतीगृह, फायर स्टेशन, हॉकी, फूटबॉल तसेच शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी  पुतळे  देखील उभे राहत आहेत. शहीद विरांचे हे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

00000

Saturday, 3 April 2021

गत 24 तासात 191 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 191 कोरोनामुक्त 

335 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 25,760 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2550

चंद्रपूर, दि. 03 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 335 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 742 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 760 झाली आहे. सध्या 2550 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 79 हजार 590 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 47 हजार 503 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  आज मृत झालेल्यामध्ये तुकुम, चंद्रपूर येथील 61 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 432 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 392, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 335 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 124, चंद्रपूर तालुका 27,  बल्लारपूर 18, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी 44, सिंदेवाही 16, मूल सहा, सावली एक, पोंभूर्णा एक, राजूरा तीन, चिमूर 38, वरोरा 26, कोरपना 23 व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0