Search This Blog

Monday, 1 November 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 5 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 5 कोरोनामुक्त

Ø ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 16

चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर :  जिल्ह्यात सोमवारी (दि.1) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 814 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 256  झाली  आहे. सध्या 16 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 35 हजार 358  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 45 हजार 247 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

रेती घाटांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

 


रेती घाटांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सन 2021-22 या वर्षाकरिता वाळू गटांच्या राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरिता अर्ज सादर करावयाचे आहे. त्याकरिता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांनी जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वाळू, रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार हा अहवाल जनतेच्या माहितीकरिता व अभिप्राय नोंदविण्याकरिता https:// Chanda.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी या अहवालातील रेतीघाटांच्या अनुषंगाने आपले अभिप्राय संकेत स्थळावर नोंदवावे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

 


जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाचे मुंबई येथे 28 जुलै 2019 रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवसाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले. राज्यात 9 मॉडेल ट्रीटमेंट सेंटर व 27 औषधोपचार केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरू करण्यात आले. त्यासोबतच कावीळ या रोगाचे निदान, उपचार तथा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहे.

या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यातील नागरिकांना कावीळ अ, ब, क,ड आणि ई च्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याअंतर्गत हिपॅटायटीस रुग्णांचे निदान करणे, संक्रमण थांबविणे, समुपदेशन करणे, रुग्णांचे निदान करून उपचार करणे याबाबींचा सेवा नियमितपणे सुरू करण्यात आल्या आहे.

अतिजोखमीच्या नागरिकांचे तथा रुग्णालयाशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटीस  ब आणि क साठी रक्त तपासणी करून जर निगेटिव्ह आल्यास त्यांचे लसीकरण करणे. वायरल हिपॅटायटीस हा संसर्गजन्य आजार असून या आजाराच्या उपचारासाठी महागडे औषध शासनाने विनामूल्य जनतेस उपलब्ध करून दिले असून औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या हस्ते रुग्णांना प्रत्यक्षपणे औषधांची पहिली मात्रा देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनंत हजारे, डॉ. प्रविण धडसे, सर्जन डॉ. विक्रांत गावंडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. दीप्ती श्रीरामे टाटा ट्रस्टचे आशिष बरबडे यांची उपस्थिती होती.

00000

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

 


पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय  प्रशिक्षण

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 11 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 9403078773, कार्यक्रम आयोजिका वनश्री रामटेके मो. 9766499599 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

00000

निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे


निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात  दि. 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरुन हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनी ऑर्डरद्वारा निवृत्तीवेतन घेतात. त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून दि.30 नोव्हेंबर पर्यंत कोषागारास पाठवावे. जे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत. त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत (पुरुष) पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच शासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्र पाठवावे. निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. हयात प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रीती खारतुडे यांनी कळविले आहे.

00000