Search This Blog

Thursday, 11 November 2021

प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक



प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक

Ø जिल्हा प्रशासनाची वाहतूकदार संघटनांशी चर्चा

Ø तालुकानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त

चंद्रपूर दि.11 नोव्हेंबर: परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या धर्तीवर जिल्ह्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी विविध संघटनांशी चर्चा केली. प्रवाशांच्या हितासाठी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे प्रशासनाला आश्वासित केले.

या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे,वाहतूक विभागाचे रंजीत घोडमारे, परिवहन कार्यालयाचे आनंद मेश्राम, पोलीस निरीक्षक विशेष शाखा रवींद्र शिंदे तसेच स्कूल बस प्रतिनिधी जोशना गुंडे, महेश गौरकर, खाजगी बसचालक संघटनांची प्रतिनिधी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बस संपाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यातून वेगवेगळ्या मार्गांवर साधारणता 253 वाहतुकीच्या बसेस काळीपिवळी खाजगी बसेस कार्यरत होत्या. प्रवाशांची प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर सध्या उपलब्ध खासगी बसेस व अन्य वाहनांच्या तुलनेत या रस्त्यावर ज्या रस्त्यावर व दुर्गम भागांमध्ये प्रवाशांची अडचण होत आहे व तुलनेने कमी खासगी वाहने कार्यरत आहेत तिथे वाहतूक विभाग परिवहन विभाग यांनी समन्वय आणि वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश या बैठकीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले .

संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चंद्रपूर येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली  आहे. संपाच्या कालावधीत प्रवाशांच्या असणाऱ्या अडचणी, शंकाचे निरसन करण्यासाठी 07172-272555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात

आज पार पडलेल्या बैठकीमध्ये  मार्गाचे नाव, प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल्स सेवा व वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर-चिमूर मार्गावर दर अर्ध्या तासाने सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामायण बालाजी व रजा ट्रॅव्हल्स प्रवाशांना सेवा देतील. चंद्रपुर-ब्रह्मपुरी मार्गावर  प्रत्येक 1 तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामायण ट्रॅव्हल्स,  चंद्रपूर-नागपूर मार्गावर डीएनआर, बीटीपी, बागडी, गणराज, महाकाली, रामायण व योगीराज ट्रॅव्हल्स तर चंद्रपूर-मुल-गडचिरोली मार्गावर कोमल,दुर्गा ट्रॅव्हल्स प्रत्येक 1 तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत  सेवा देईल. वरोरा-चिमूर मार्गावर दर अर्ध्या तासाने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चिमूर क्रांती ट्रॅव्हल्स तर दर अर्ध्या तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी येथे खाजगी गाड्यांची व्यवस्था त्या त्या मार्गावर करण्यात आली आहे. राजुरा-गडचांदूर-कोरपना येथे काळी-पिवळी खाजगी वाहने उपलब्ध आहेत. चंद्रपूर-जिवती व चंद्रपूर-घुगुस-वणी या मार्गावर खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

तालुकानिहाय नियुक्त समन्वय अधिकारी :

भद्रावती-वरोरा येथे विजय साळुंखे, मुल-सिंदेवाही-नागभीड व ब्रह्मपुरी येथे विलास ठेंगणे, गोंडपिपरी-बल्लारपूर येथे निलेश भगुरे, राजुरा गडचांदूर येथे गोविंद पवार, कोरपना-जिवती येथे विशाल कसंबे हे मोटार वाहन निरीक्षक तर  चंद्रपूर येथे नरेंद्रकुमार उमाडे, घुगुस येथे विष्णू कुंभलकर या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या सेवा समन्वय अधिकारी म्हणून करण्यात आल्या आहेत. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Wednesday, 10 November 2021

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

 प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Ø प्रवाशांना 07172-272555 या क्रमांकावर करता येईल संपर्क

Ø एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाचा पूढाकार

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने  चंद्रपूर येथे नियंत्रण कक्षाची  स्थापना केली  आहे. संपाच्या कालावधीत प्रवाशांच्या असणाऱ्या अडचणी ,शंकाचे निरसन करण्यासाठी 07172-272555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या व  अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्याही त्या कक्षात करण्यात आल्या आहेत.त्या पूढीलप्रमाणे आहेत.

10 व 12 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य लिपिक प्रवीण अंदेकिवार, 11 नोव्हेंबर रोजी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विवेक तास्के, , 13 व 15 नोव्हेंबर रोजी कनिष्ठ लिपिक महेश कनवाडे, 14 व 16 नोव्हेंबर रोजी मुख्य लिपिक राजकुमार केळवतकर हे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी या कक्षात कार्यरत  राहतील.प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज तातडीचे निर्देश देवून हा कक्ष कार्यान्वीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार नियंत्रण कक्ष सेवेचा प्रवाशांनी उपयोग करावा,असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000


बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 3 बाधित


बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 3 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 12

चंद्रपूर, दि. 10 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 तर राजूरा येथे 2 रुग्ण आढळले असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी,  चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 823 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 269 झाली आहे. सध्या 12 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 41 हजार 297 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 51 हजार 86 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

मतदार नोंदणीसाठी 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 मतदार नोंदणीसाठी 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

चंद्रपूर दि.10 मतदार नोंदणीसाठी  जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन येत्या 16 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.

मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास किंवा नोंदीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदविण्यासाठी त्यांना विहीत अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येतील. याकरीता ग्रामपंचायत कार्यालयात आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फार्मचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसचे लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकीत करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येणार आहे.

याच दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे ग्रामसभेत उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहेत. तरी मतदार यादीत नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन करावे


शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन करावे

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर: सद्यस्थितीमध्ये रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयांपासून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेंगा पोखरणाऱ्या अळयांमध्ये खालील प्रकारच्या अळयांचा समावेश:

            शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मिमी. लांब विविध रंग छटेत दिसून येते. जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तीच्या पाठीवर तुटका करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

पिसारी पतंग-या पतंगाची अळी 12.5 मिमी. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते.

शेंगे माशी- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक किड व्यवस्थापन:

            या तिन्ही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळया खाऊन फस्त करतात.

पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि.(1x10पिओबी/मिली) 500 एल ई./ हे किंवा बॉसिलस थुरिनजिएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानी) इमामेक्टीन बेझोएट 5 टक्के 3 एस.जी. ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुण झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात. असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000