Search This Blog

Monday, 5 September 2022

जि.प. तर्फे 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान





 जि.प. तर्फे 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर एक माध्यमिक अशा एकूण 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर तर प्रमख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे (पंचायत), राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ना.ग. थूटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, डायटचे प्राचार्य श्री. चाफले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. मातकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुडकर, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता रायपुरे, उपमुख्य लेखा अधिकारी श्री. पेंदाम, विश्वजीत शहा, विलास वनकर, अमोर रोडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, गावातील सर्वात विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. शिक्षक चांगला तर तो समाज चांगला असे समीकरणच आहे. कोणताही पाल्य हा पालकांसोबत कमी तर शिक्षकांसोबत जास्त वेळ असतो. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. शिक्षकांना ज्ञानार्जनाव्यतिरिक्त शासनाची जवळपास 150 कामे अधीकची करावी लागतात. ही अतिशयोक्ती आहे. शैक्षणिक बाबतीत चंद्रपूर जिल्हा हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी शिक्षकांनी तसेच अधिका-यांनी प्रयत्न करावे. तसेच संस्कारी विद्यार्थी शिक्षकांच्या हातून घडावे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती गौरकार म्हणाल्या, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जवळपास पाच हजार शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी किमान एक विद्यार्थी घडविला तरी जिल्ह्यात पाच हजार विद्यार्थी दरवर्षी  घडू शकतात. ग्रामीण भागातील शिक्षकांची पालक म्हणूनही जबाबदारी असते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सुरू केलेल्या मिशन गरुडझेपमध्ये सर्व शिक्षकांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे म्हणाले, जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून 31 अर्ज प्राप्त झाले. शासन निर्णयानुसार एका तालुक्यातून एक असे एकूण 15 प्राथमिक तर माध्यमिक विभागातून 1 अशा एकूण 16 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शासन निर्णयात असलेल्या निकषांची अतिशय काटेकोरपणे तपासणी करून जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीद्वारे 16 नावे निश्चित केली गेली. तसेच या यादीला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्याम वाखर्डे, प्राचार्य चाफले यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त 16 शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन कुटुंबासह सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी जि.प. ज्युबली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन एकता पितुरकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, विविध अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक:

संजय कान्हुजी (सोनेगाव वन, ता. चिमूर), राहुल कळंबे (कोटगाव, ता.नागभिड), विनोद लांडगे (पेंढरी (कोके) ता. सिंदेवाही), वामन चौधरी (साखरी, ता.सावली), काकासाहेब नागरे (वडगाव, ता.कोरपना), मेघा शेंडे (देऊळवाडा, ता.भद्रावती), प्रितिबाला जगताप (बामणी (दु.) ता.बल्लारपूर), करुणा गावंडे (आर्वी, ता.राजुरा), नामदेव अस्वले (चिंचाळा, ता.चंद्रपूर), सुशीला पुरेड्डीवार (आक्सापूर, ता.गोंडपिपरी), सुचिता जिरकुंटवार (चेकखापरी, ता.पोंभूर्णा), उमाजी कोडापे (पल्लेझरी, ता.जिवती), दिलीप बावनकर (एकारा, ता.ब्रह्मपुरी), सुंदर मंगर (कवडपेठ, ता.मुल), संजू जांभुळे (खेमजई, ता.वरोरा) व विनोद कोवे (गुंजेवाही, ता.सिंदेवाही) या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

 

मुख्यमंत्र्यांकडून जिवती तालुक्यातील पालडोह जिल्हा परिषद शाळेचे कौतुक

 


मुख्यमंत्र्यांकडून जिवती तालुक्यातील पालडोह जिल्हा परिषद शाळेचे कौतुक

Ø शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी साधला संवाद

चंद्रपूर दि. 5 सप्टें:  चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात पालडोह जिल्हा परिषदेची शाळा आहे. जिल्हा परिषदेची ही शाळा सुट्टीविना वर्षातील 365 दिवस अविरतपणे सुरु असते. त्या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजेंद्र परतेकी यांच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाविषयीच्या नवनवीन संकल्पना, अथक परीश्रम व समर्पक भावनेने काम करीत असतात, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्यातील शिक्षकांशी संवाद या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

यावेळी, जिल्हाधिकारी कार्यालयातून शिक्षण विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. चव्हाण तसेच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. 

००००००

13 सप्टेंबरपासून जिवती व कोरपना तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम

 13 सप्टेंबरपासून जिवती व कोरपना तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम

चंद्रपूर दि. 5 सप्टें :  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोरपना व जिवती तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत कृष्ठरोग व सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरीकांमध्ये कृष्ठरोग व क्षयरोग आजाराबाबत माहिती, लक्षणे व उपचार याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे व या रोगाचा होणारा प्रसार कमी करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कृष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे दिसून येताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन किंवा गृहभेट देण्यासाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून तपासणी करून उपचार करून घ्यावे, असे आवाहन कोरपना व जिवती तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले आहे. या शोध मोहिमेत कृष्ठरोग व क्षयरोग आजाराबद्दल माहिती, तपासणी, आरोग्य पथकाद्वारे करण्यात येणार असून या पथकामध्ये आशासेविका, पुरुष   स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे थुंकी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा, जिवती, पाटण तसेच ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर व कोरपना येथे तपासणीकरीता पाठविण्यात येणार आहे.  तरी, नागरीकांना या शोध मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले आहे.

०००००

Sunday, 4 September 2022

यापूर्वी लाभ मिळालेल्यांना सुद्धा ई - केवायसी बंधनकारक

 


यापूर्वी लाभ मिळालेल्यांना सुद्धा ई - केवायसी बंधनकारक

अन्यथा पीएम किसान सन्मान निधीपासून राहावे लागेल वंचित

Ø ऑनलाइन केवायसी करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर.

चंद्रपूर, दि. 4 सप्टेंबर : पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वच लाभार्थ्यांना ऑनलाईन केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांना सन्मान निधीचे हप्ते मिळाले असतील, त्यांनी सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा करणे गरजेचे आहे. अन्यथा पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. ऑनलाइन केवायसी करण्याची मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतक-यांनी त्वरीत ऑनलाईन केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

यापूर्वी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाल्यामुळे ई-केवायसी करण्याची गरज नाही, असा गैरसमज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनासुद्धा ई-केवायसी पुन्हा करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी त्वरित करून घ्यावी. सदर योजना ओटीपी वर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेब पोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.

ऑनलाईन केवायसी करीता राबविण्यात येणारी प्रक्रिया :

ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा.

बायोमेट्रीक मोड ( महा ई सेवा केंद्रातून ) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा.

वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday, 2 September 2022

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसी करीता 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 


पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसी करीता 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर :  पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतक-यांनी त्वरीत ऑनलाईन केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. ऑनलाईन केवायसी केले नाही तर सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजना ओटीपीवर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेबपोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.

ऑनलाईन केवायसीकरीता राबविण्यात येणारी प्रक्रिया :

ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा.

बायोमेट्रीक मोड (महा ई सेवा केंद्रातून) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा.

वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

००००००