Search This Blog

Wednesday, 7 September 2022

पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातंर्गत कीडरोगांची निरीक्षणे

 

पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातंर्गत कीडरोगांची निरीक्षणे

            चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर :  कापूस, भात, सोयाबीन व तूर पिकांवर सद्य:स्थितीमध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे क्रॉपसॅप निरिक्षणावरून दिसून आले आहे. कापूस पिकामध्ये तुडतुडे व गुलाबी बोंडअळी वरोरा तालुक्यातील येन्सा, आष्टी, एकार्जुना, केकापूर, चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, धानोरा, अंतुर्ली, देवाडा, वेंडली व येरूर, बल्लारपूर तालुक्यातील दहेली, भद्रावती तालुक्यातील खंडाळा रीठ, पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा, कोरपना तालुक्यातील बीबी, थुतरा तर गोंडपिपरी तालुक्यातील व्यंकटपूर या गांवामध्ये मोठ्या प्रमाणात किडरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

भात पिकावर पिवळा खोडकिडा, गादमाशी व निळे भुंगेरी या रोगाचा प्रादुर्भाव नागभीड तालुक्यातील तळोधी, देवपायली व सोनूली चक तर  ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगाव (ख.) गोडपिंपरी तालुक्यातील चक नांदगाव तर भद्रावती तालुक्यातील मेंढोली या तालुक्यात मोठया प्रमाणात आढळुन येत आहे. सोयाबीन पिकांवर उंट अळी व खोडमाशीचा प्रादुर्भाव राजुरा तालुक्यातील पाचगाव, गोवारी, चिमूर तालुक्यातील चिंचाळा व मानूसमारी तर तूर पिकांवर मररोग हा चंद्रपूर तालुक्यातील महा कुर्ला या भागात आढळुन येत आहे. या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होवू नये यासाठी शेतकरी बंधुनी आवश्यक उपायोजना करणे आवश्यक आहे.

या कराव्यात उपाययोजना:

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा वर्टीसीलीअम जलकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसीटामाप्रीड 20 टक्के, 60 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के 260 मिली प्रति एकर पाऊस नसतांना फवारणी करावी. शेंदरी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत. डोमकळी आढळल्यास नियमित दर आठवडयांनी अळीसहीत वेचून नष्ट करावे.

 सोयाबीन पिकात अळया खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध  “टि” आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता असून त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत. नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के ईसी 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भात पिकात पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50 टक्के प्रवाही 15 ते 16 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस नसतांना फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे व वाढत्या आद्रतेमुळे तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकिरी तुडतुडे दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम अनिसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावीत. तुर पिकात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता असून त्याच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी.

                 आपत्कालीन परिस्थितीत कीडरोगाबाबत किटकनाशके उपलब्ध करून देण्याचे नियोजन हे क्रॉपसॅप योजनेअंतर्गत केले जाते. कीडरोगाचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाययोजना या संदर्भात ग्रामस्तरीय ग्रामकृषि विकास समितीमध्ये चर्चा करुन उपाययोजना करण्यास सुचविण्यात येणार आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठण्यापुर्वीच उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याने किटकनाशकांचा वापर कमी करण्यात येणार आहे. तसेच जैविक कीटकनाशकांचा वापर वाढवून रासायनीक  किटकनाशकाचा खर्च कमी करण्यात येणार आहे.

 क्रॉपसॅप योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

 चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकीबाबत कोणास दावा करावयाचा असल्यास त्यांनी न्यायालयाचे आदेश व अन्य कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. पाटील यांना एक महिन्याचे आत सादर करुन वाहनाचा ताबा घ्यावा. अन्यथा, सदर वाहनाचा ई-लिलाव करुन लिलावाद्वारे प्राप्त रक्कम शासन जमा करण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांची यादी या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिक्षक संजय पाटील यांनी कळविले आहे.

00000

Tuesday, 6 September 2022

घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

 

घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

Ø मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता शब्द

Ø प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपये

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये देण्यात येईल, असा शब्द पिडीत कुटुंबाना दिला होता. दिलेला शब्द त्यांनी पाळला असून घुग्गुस येथे भुस्खलनाच्या दुर्घटनेप्रकरणी बाधित झालेल्या 160 कुटुंबांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 16 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे सदर रक्कम जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून बाधित कुटुंबाना तातडीने त्याचे वाटप करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले. या घटनेची मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पिडीत कुटुंबासाठी मंजूर करून आणला. भुस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेले 16 लाख रुपये मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखेतून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर शाखेतील खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. शासनाकडे पाठविलेल्या यादीनुसार आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून पिडीत कुटुंबांना मंजूर अर्थसहाय्याचे वाटप तात्काळ करण्यात यावे, अशा सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

००००००

21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

 





21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून 25 लक्ष रुपयांची घोषणा

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याच्‍याच एक भाग म्‍हणजे 21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन  वने व सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद असून नागरिकांना सुख, समाधान, यश, भरभराटी लाभो, अशा शुभेच्‍छा सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

चंद्रपुर तालुक्यातील आरवट या गावी वित्त आयोगाच्‍या निधीतून मंजूर शुध्‍द पाणी देणा-या आरो मशीनचे उदघाटन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी  25 लक्ष रूपयांच्‍या निधीतून विविध विकासकामांची घोषणा केली. मंचावर  देवराव भोंगळे, सरपंच सुलभा भोंगळे, उपसरपंच अलका कवठे, नामदेव डाहूले, ब्रिजभूषण पाझारे, राहूल पावडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, विकास जुमनाके, माजी सरपंच वंदना पिंपळशेंडे, रणजित डवरे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सचिव रंजना मुळे, बबन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

शिक्षणाच्‍या माध्‍यमातून महापुरूषांच्‍या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्‍हटले आहे. महात्‍मा फुलेंनी ‘विद्ये विना मती गेली’ असे तर महात्‍मा गांधी यांनी पुस्‍तक जगातला सर्वात चांगला मित्र आहे, असे म्‍हटले आहे. आरवट या गावात शिक्षणाची उत्तम सुविधा निर्माण होण्‍याकरीता जिल्‍हा परिषद शाळेच्‍या माध्‍यमातून कार्य करण्‍यात येईल. गावातील विकासकामांमध्‍ये लहान मुलांसाठी खेळणी, बंदिस्‍त नाली तसेच इतर कामांना पहिल्‍या टप्‍प्‍यात माझ्या स्‍थानिक विकास निधीतून 25 लक्ष रूपये मंजूर करून  कामे तात्‍काळ सुरू करण्‍यात येतील. तसेच शेती, शिक्षण, जलसंधारण, आरोग्‍य, रोजगार या क्षेत्रामध्‍ये सुध्दा कामे करण्‍यात येईल. आरवट येथील भजन मंडळाला नवीन साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. राज्यामध्ये नवीन सरकार येताच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी श्री. मुनगंटीवार यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

०००००००

जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार



 

जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø  यशवंत डॉक्टरांचा सत्कार

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर हा  कोळसा खाणींचा जिल्‍हा आहे. या खाणीतूनच आपण जगाला हिरे देत असतो. याची प्रचिती नुकतीच आली. शा‍रिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा समजल्या जाणा-या ‘आयर्नमॅन 2022’ स्‍पर्धेत चंद्रपूरच्‍या डॉक्‍टरांनी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे विजयी पताका फडकविली. डॉक्टरांचे हे यश चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करणारे आहे, असे प्रतिपादन वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आय.एम.ए. सभागृहामध्‍ये आयोजित यशवंत डॉक्टरांच्या सत्‍कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी आय.एम.ए. चे अध्‍यक्ष डॉ. अमोल पोद्दार, देवराव भोंगळे, सचिव डॉ. नगीना नायडु, प्रोजेक्‍टर डायरेक्‍टर डॉ. रवि अल्‍लुरवार, कोषाध्‍यक्ष डॉ. अमित देवईकर, आय.एम.ए. महिला विंगच्या अध्‍यक्षा डॉ. कल्‍याणी दीक्षित यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणाले, अर्जुनाला जसे केवळ पोपटाचा डोळा दिसत होता तसेच आपण आयुष्‍यामध्‍ये एकाग्रता ठेवून यश संपादन केले पाहिजे. जिद्द, निष्ठा, परिश्रम आणि चिकाटी यातून साकारलेले यश चिरंतन काळ टिकणारे असते. असेही ते म्हणाले.

जर्मनीतील ड्युसबर्ग येथे आयर्नमॅन 70.03 स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. यात 1.91 किलोमीटर पोहणे, 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे असे प्रकार होते. हे तिन्‍ही प्रकार 8.30 तासांच्‍या कालावधीत पूर्ण करीत चंद्रपूरच्‍या इंडियन मेडीकल असोसिएशनशी संलग्‍नीत डॉक्‍टरांनी पुस्‍कारावर आपले नाव कोरले आहे. यामध्‍ये डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. कल्‍पना गुलवाडे, डॉ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्‍ता आस्‍वार, डॉ. गुरूराज कुलकर्णी, डॉ. नबा शिवजी, डॉ. रिजवान अली शिवजी, डॉ. अभय राठोड व पोलिस कर्मचारी श्रीपाद बल्‍की यांचा समावेश असून सर्व यशवंत डॉक्टरांचा यावेळी श्री. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

००००००