Search This Blog

Friday, 9 September 2022

25 डिसेंबर रोजी विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण

 

25 डिसेंबर रोजी विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण

Ø  भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव बॉटनिकल गार्डनला देणार

Ø  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला अपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा

चंद्रपूर, दि. 9 सप्टेंबर : जिल्‍हयातील अपूर्ण अवस्‍थेत असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करून यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे निराकरण करावे. प्रामुख्‍याने चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी म्‍हणजे २५ डिसेंबरला लोकार्पित करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे, असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दिनांक २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित असून यादृष्‍टीने आवश्‍यक तयारी पूर्ण करावी.ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात.

देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनला देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील.

या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे, यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातून येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करावी.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे आदी प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झाला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करावी. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्‍तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

00000

Thursday, 8 September 2022

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Ø सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी

Ø प्रशासनाचे व्हावे सुशासन...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

चंद्रपूर/मुंबई, दि. 8 सप्टेंबर : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी नियमावली तयार करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समितीची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समितीचे अध्यक्ष निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शी पध्दतीने मिळाव्यात  तसेच शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुशासन नियमावलीमध्ये त्याचा अतर्भाव करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी  सुशासन नियमावली उपयुक्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रशासन गतिमान करतानाच माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान यासाठी समितीने उपाययोजना सुचविताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सारख्या भागात पूर येतो, लहरी हवामानामुळे अतिवृष्टी, दुष्काळ यासरख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते, मात्र अशा नैसर्गिक आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी  या समितीने त्याचा सुशासन नियमावलीमध्ये समावेश करावा, अशी सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

आदिवासी भागात कुपोषणासारखी समस्या कायमच भेडसावत असते अशा वेळी ज्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावर देखील समितीने उपाययोजना सुचवाव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येत असून पायाभूत सुविधांच्या कामांची गुणवत्ता यासाठी संनियंत्रण करणारी यंत्रणा समितीने सुचवावी. फायलींचा जलदगतीने निपटारा याविषयावर देखील समितीने अभ्यास करतानाच दप्तर दिरंगाई कायद्याची अमंलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नियमावलीमध्ये त्याचा समावेश करावा, असे सांगत लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल, नागरिकांना कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांची भटकंती थांबावी, क्षेत्रीयस्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा मंत्रालयापर्यंत त्यांना यायची गरज भासू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विभागीय स्तरावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या सूचना यावेळी श्री. शिंदे यांनी दिल्या.

शासनाविषयी लोकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी सुशासन नियमावली महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्य सचिवांनी यावेळी प्रस्ताविक केले. यावेळी समिती अध्यक्ष श्री. सुरेश कुमार व सदस्यांनी समितीने केलेल्या कार्याबाबतची माहिती दिली.

00000

अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

 


अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Ø तपासणीकरीता रुग्णांचे नमूने प्रयोगशाळेत

चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात उलटी, हगवणचे रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणावरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आजपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांचे प्रकृती स्थिर आहे.

याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत गावामध्ये आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी गावामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन गावातील परिस्थितीची पाहणी केली, तसेच मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाच्या चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.  रुग्णांची आरोग्य तपासणी गावातील अंगणवाडी केंद्रात लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात करण्यात येत आहे व नागरिकांना औषधोपचार देण्यात येत आहे.

7 सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीमध्ये एकूण 21 रुग्ण तर 8 सप्टेंबर रोजी एकूण 11 हगवण व उलटीची लक्षणे असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व शिबिरामध्ये औषधोपचार करण्यात आला. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या नियंत्रणात असून गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 5 पाणी नमुने, 1 ब्लिचिंग पावडर नमुना तसेच 8 रुग्णांचे सौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येत असून नागरीकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत गावातील एकूण 120 कुटुंबाच्या घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून जीवनड्रॉप बॉटलचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरामध्ये व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारामध्ये तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, किंवा नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

00000

शासकीय रुग्णालय येथे कायदेविषयक शिबिर

 

शासकीय रुग्णालय येथे कायदेविषयक शिबिर

चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर:  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शासकीय रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 6 सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, मानसोपचार तज्ञ डॉ. किरण देशपांडे, डॉ. दिलीप मडावी, डॉ. रफिक मावानी, डॉ. बनकर, डॉ. पानघंटीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य मिळू शकते तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मनोरुग्ण व मानसिक अपंग व्यक्ती करीता) योजना 2015 याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व एच.आय.व्ही.ग्रस्त रुग्णांना झालेला असाध्य रोग समाजामध्ये पसरू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी मानसिक आरोग्य तसेच संसर्गजन्य रोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तर डॉ. दिलीप मडावी यांनी एच.आय.व्ही. अर्थात एड्स या रोगाबाबत असलेली उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. धनंजय तावाडे यांनी तर आभार अॅड. महेंद्र असरेट यांनी मानले.

00000


जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक शिबिर

 जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक शिबिर

चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह वर्ग -1 चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक व तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी नेहा पंचारिया, माधुरी गोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी सर्व न्यायालयीन बंदींना प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती मिळू शकते याबाबत मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नेहा पंचारिया यांनी न्यायालयीन बंदीचे अधिकार व जामीनाबाबत असलेल्या तरतुदी संदर्भात मार्गदर्शन केले. तर माधुरी गोटे यांनी प्लि बार्गेनिंग अर्थात विनंती सौदा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधीक्षक व तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप यांनी तर कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा कारागृहाचे ललित मुंडे यांनी मानले.

00000