Search This Blog

Saturday, 4 March 2023

चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर ते पडोली चौक राज्य मार्गावरील उपाययोजनाकरीता 521.62 लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी

 

चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर ते पडोली चौक राज्य मार्गावरील उपाययोजनाकरीता 521.62 लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

चंद्रपूर दि.४ : वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील छोटा नागपूर ते पडोली चौक राज्य महामार्ग ९३० येथे रस्ता वाहतूक सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना करण्याकरिता ५२१.६२ लक्ष रक्कमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

या महामार्गाला जवळपासचे अनेक गाव जोडल्या गेलेले आहे त्यामुळे हा अत्यंत वर्दळीचा राज्य महामार्ग असून या  महामार्गावर अनेक अपघात झालेले आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वाहतूक सुरक्षा विषयी चिंता व्यक्त केली होती.

यासंदर्भात पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी वाहतूक सुरक्षा उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी महाराष्ट्र शासन परिवहन विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.   उप परिवहन आयुक्त रस्ता सुरक्षा कक्ष परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र यांनी या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

५२१.६२ लक्ष रक्कमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याबद्दल छोटा नागपूर व पडोली चौक या मार्गावरील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

००००००

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार





अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकिय अधिष्ठाता यांना फोन करत, अपघातग्रस्तांना केले रुग्णालयाकडे रवाना

            चंद्रपूर, दि. ४ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. ना. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे प्राण वाचले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथील चांदा क्लबच्या मैदानावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मूलकडे मार्गस्थ झालेत. सावलीतील पेंढरी (मक्ता) येथे आयोजित मत्स महोत्सवात ना. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राहण्यासाठी मार्गस्थ असताना चंद्रपूर- मुल मार्गावर अपघात झाल्याचे ना. मुनगंटीवार यांना दिसले. चंद्रपूर - मूल मार्गावर कार आणि दुचाकीचा हा अपघात नुकताच झाला होता. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना ताफा थांबविण्याची सूचना केली.

ताफा थांबताच ना. मुनगंटीवार स्वत: वाहनातून खाली उतरले व त्यांनी अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमी गंभीर असल्याचे लक्षात येताच ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना फोनवरून जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. ना. मुनगंटीवार देवदूतासारखे धाऊन आल्याने जखमींना गहिवरून आले. तातडीने मदत मिळाल्याने जखमींच्या परिवाराने ना. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

००००००

Friday, 3 March 2023

राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन

 



राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन

Ø जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेचा आढावा

            चंद्रपूर, दि. 3 : राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (14 वर्षे आतील मुले/मुली) आणि राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा (19 वर्षे आतील मुले / मुली) अनुक्रमे बल्लारपूर आणि मूल येथे होणार आहे. 10 ते 12 मार्च 2023 या कालावधीत बल्लारपूर क्रीडा संकूल येथे शालेय मैदानी स्पर्धांचे तर 28 ते 30 मार्च 2023 रोजी शालेय कुस्ती स्पर्धांचे मूल येथे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा क्रीडा परिषदेचा आढावा घेतला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सा.बा. चे उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, प्रशांत वसुले, मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, मूलच्या तालुका क्रीडा अधिकारी उमाकांता रंगारी , छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते राजेश नायडू आणि कुंदन नायडू उपस्थित होते.

            दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांसाठी खेडाळूंची निवास व्यवस्था, भोजन, परिवहन, पंच, क्रीडांगण, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांचे दर्जेदार व उत्तम आयोजन करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी दिल्या.

००००००

युवाशक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा -डॉ. विजय आईंचवार



 युवाशक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा -डॉ. विजय आईंचवार

Ø जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 3: देशात युवावर्ग मोठ्या प्रमाणावर असून  युवापिढी ही या देशाची खरी ताकद आहे. युवा शक्तीमध्ये भरपूर ताकद, सहनशीलता, सृजनशीलता व समजण्याची शक्ती असून या शक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व चांगला नागरिक घडविण्यासाठी व्हावा, असे मत गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय आईंचवार यांनी व्यक्त केले.

जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर व खेळ मंत्रालय भारत सरकारद्वारा जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी शफिक अहमद, गोंडवाना विद्यापीठाच्या जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजया गेडाम, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अंजुम कुरेशी, आयुर्वेद चिकित्सक डॉ. मनिषा घुगल, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार आदी उपस्थित होते.

डॉ. आईचंवार म्हणाले, नेहरू युवा केंद्रामध्ये साधारणतः 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजची युवापिढी ही देशाचे भविष्य आहे. युवाशक्तीचा देशाच्या विकासासाठी कशाप्रकारे वापर केला जाईल, या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण देण्यासाठी, व त्याचा अभ्यास करण्यासाठी ही युवा संसद आहे. या युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक भूमिका स्वीकारावी. विद्यार्थ्यांनी स्वतःबद्दलचा आत्मविश्वास, ध्येयपूर्तीसाठी आत्मनिर्भरता व स्वतःबद्दल आत्मसन्मान व स्वाभिमान या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यासोबतच सुसंवाद, कार्य करतांना सामूहिकरित्या कार्य करण्याची आवड व समन्वयाची भावना असावी तसेच देशाचा चांगला नागरिक घडण्याच्या दृष्टीने कृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सेवानिवृत्त अतिरीक्त जिल्हाधिकारी शफीक अहमद म्हणाले, जी-20 शिखर परिषदेचे हे 18 वर्ष आहे. नागपूरमध्ये जी-20 ची तयारी मोठया उत्साहात सुरु आहे. यामध्ये एकुण 19 देश व युरोपियन संघाचा समावेश आहे. या शिखर परीषदेत देशातंर्गत अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्य, कृषी, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण, हवामान बदल आदी विषयावर चर्चा व समस्या निराकरण करण्यात येणार आहे.

प्रस्ताविकेत समशेर सुभेदार म्हणाले, नेहरू युवा केंद्र संघटन, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकारच्या अखत्यारित येणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचा एकमेव उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वळविण्याचा आहे. युवा संसद म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना त्याचे मत मांडण्यासाठी मंच प्रदान करणे असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने ही युवा संसद आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे संचलन मकसूद खान तर आभार नेहरू युवा केंद्राचे नजीर कुरेशी यांनी मानले. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक तथा विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन


रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन

Ø रस्त्यावर बालके आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 03 : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल सुमोटो रीट याचिका 06/2021 नुसार रस्त्यावर राहणारे मुलांचे पुनर्वसन करण्याबाबत न्यायालयाने राज्यांना निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलाचा शोध घेण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेच्या आधी रस्त्यावर राहणारे मुले सापडण्याचे संभावित स्थळ याला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले. जसे प्रकाश नगर, चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन, महाकाली मंदिर, बस स्थानक, दानववाडी, दाताळा पुलाजवळ, पागल बाबा नगर, नेहरूनगर, नेरी कोंडी, चंद्रपूर हा परिसर घोषित करून या मोहिमेअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी जिल्हा चाइल्ड लाईन चंद्रपूर, कनिष्ठ संरक्षण अधिकारी सर्व यांनी सदर क्षेत्रामध्ये शोध घेतला असता रस्त्यावर राहणारे बालके सापडले. या मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करून त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी परत सर्व्हे करून चंद्रपूर जिल्ह्यात वरील श्रेणीतील बालके आढळल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता महिला व बालविकास विभागाला सूचना दिल्या आहेत.

एक ते तीन श्रेणीनुसार रस्त्यावर राहणारे बालके आढळल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा चाईल्डलाईनचे हेल्पलाइन टोल फ्री क्र. 1098 वर कॉल करून माहिती द्यावी. जेणेकरून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे रस्त्यावर राहणाऱ्या बालकांना बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर हजर करून पुनर्वसन करण्याकरीता शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.ज्या खाजगी संस्था रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनकरीता काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, आकाशवाणी केंद्राच्या मागे, साईबाबा वार्ड, बांबू संशोधन केंद्र जवळ, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.

००००००