Search This Blog

Friday, 22 November 2024

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय ते डॉ. हेडगेवार आश्रय छात्रवासापर्यंत रस्ता बंद

 

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय ते डॉ. हेडगेवार आश्रय छात्रवासापर्यंत रस्ता बंद

Ø दोन्ही बाजूचे रस्ते नो पार्किंग व नोकर झोन म्हणून घोषित

चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे. मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर शहरातील न्यायालयापासून ते डॉ. हेडगेवार आश्रय छात्रवासापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही बाजूचे रस्ते नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मतमोजणी दरम्यान दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 4 वाजतापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर शहरातील न्यायालयाच्या मेन गेट पासून ते डॉ. हेडगेवार यांचे आश्रय छात्रावासपर्यंत सर्व वाहनांना सदर रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. तसेच सदरचे दोन्ही रस्ते हे नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आल्यामुळे या मार्गावर कोणत्याही नागरिकांनी आपले वाहन पार्किंग करू नये व हातठेले सुद्धा लावू नये.

मतमोजणीकरिता येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनाकरिता खालीलप्रमाणे पार्किंग स्थळे घोषित करण्यात आली आहे.

1.     प्रशासकीय भवन पार्किंग (दुचाकी वाहनांकरिता)

2.     रेल्वे स्टेशन (चारचाकी वाहनांकरिता)

वरील आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

००००००

मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज ! कर्मचा-यांचे प्रशिक्षण






 

मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज ! कर्मचा-यांचे प्रशिक्षण

Ø चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 28 तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या

चंद्रपूर, दि. 22 :  येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत.

            विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या : 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे.  71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि  7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत.  

            या ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे,  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

कर्मचा-यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

००००००

Thursday, 21 November 2024

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

 

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

Ø जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केले आदेश निर्गमित

चंद्रपूर, दि. 21 :  येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन  होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी निर्गमित केले आहे.

             त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परीसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची  प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत  खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

1. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने /आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील. 2. मतमेाजणी   केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून, मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकरी व कर्मचारी यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.

3. भारत निवडणुक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधीत असेल. मतमोजणीचे दिवशी  मतमोजणी  केंद्राच्या  बाहेरील 100 परीसरात  2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास जमा होण्यास प्रतिबंध असेल.  उमेदवार व  पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क  साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल, परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही  इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सभोवताल 1 कि.मी.चे क्षेत्रात/  परीसरात ड्रोन वा ड्रोन सदृश्य  वस्तु उडविण्यास 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6  वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत  प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

या ठिकाणी होणार मतमोजणी : 70- राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे,    71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, 72 - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, 73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे,  74- चिमूर  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

 

००००००

निवृत्ती वेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

 

निवृत्ती वेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

चंद्रपूर, दि. 21 :   चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे. सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.  तसेच जे निवृत्ती वेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे.

 असा सादर करता येईल हयातीचा दाखला : आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा.

1. https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2. GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3 तुमचा आधार क्रमांक टाका. 4. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा.

तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. हयात दाखल्यावर  बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा.  हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024  पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासुनचे निवृत्तीवेतन बॅंकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 20 November 2024

सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 64.48 टक्के मतदान








 

सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 64.48 टक्के मतदान

Ø अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता

चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.20) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आहे.

70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 7 हजार 344 पुरुष मतदार, 1 लक्ष 6 हजार 12 स्त्री मतदार व 2 इतर मतदार अशा एकूण 2 लक्ष 13 हजार 358 मतदारांनी (65.59 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 296 पुरुष मतदार, 98 हजार 4 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 300 मतदारांनी (53.57 टक्के) मतदान केले.

72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 98 हजार 179 पुरुष मतदार, 99 हजार 989 स्त्री मतदार व 3 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 98 हजार 171 मतदारांनी (63.44 टक्के) मतदान केले.

73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 97 हजार 592 पुरुष मतदार, 1 लक्ष 3 हजार 573 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 1 हजार 165 मतदारांनी (72.97 टक्के) मतदान केले.

74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 431 पुरुष मतदार, 1 लक्ष 7 हजार 697 स्त्री अशा एकूण 2 लक्ष 10 हजार 128 मतदारांनी (74.82 टक्के) मतदान केले.

तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात 84 हजार 825 पुरुष मतदार, 84 हजार 991 स्त्री मतदार व 1 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 69 हजार 817 मतदारांनी (60.21 टक्के) सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लक्ष 92 हजार 667 पुरुष मतदारांनी, 6 लक्ष 266 स्त्री मतदारांनी आणि 6 इतर मतदारांनी अशा एकूण 11 लक्ष 92 हजार 939 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. जिल्ह्याची मतदानाची सरासरी टक्केवारी 64.48 आहे.

०००००