Search This Blog

Wednesday, 4 December 2024

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन    

चंद्रपूर, दि.  4  : 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान अनोळखी पुरुष, अंदाजे वय 40 वर्ष हा  छोटी पडोली  रेल्वे स्टेशन ते विवेकांनद नगर रेल्वे स्टेशनच्या मध्ये अनेाळखी पुरुषाचे प्रत आढळले, अशी माहिती स्टेशन मास्टर प्रमोद शहाणे यांनी दिली. यावरुन पोलिस स्टेशन पडोली येथे  मर्ग दाखन करण्यात आलेला आहे. सदर अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नाव, पत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही. सदर मृतक अनोळखी इसमाची ओळख पटविणे आवश्यक आहे. 

मृतकाचे वर्णन : अनोळखी पुरुष, वय -अंदाजे 40 वर्ष, रंग -सावळा, बांधा - मजबुत , उंची – 5 फुट 3 इंच, अंगात फीकट आकाशी रंगाची टी शर्ट ,काळया रंगाचा  बरमुडा, चेहरा गोल, दाडी - मिशी व डोक्याचे केस काळे. सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पडोली पोलिसांनी केले आहे.

०००००

हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

 हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 4 : शहरातील विठ्ठल मंदीर वार्ड येथील रहिवासी चंद्रकांत उर्फे पप्पु वामनराव मानमोडे (वय 35 वर्षे)  हा 23 सप्टेंबर 2024 रोजी काही न सांगता आपले घरून सकाळी 5 वाजता निघून गेला. सदर इसम आजपावेतो घरी परत न आल्याने त्याचा मारडी, जळगाव, आर्वी येथे नातेवाईकाकडे फोनद्वारे विचारणा केली असता तो गावाकडे आला नाही, अशी माहिती मिळाली. तसेच चंद्रपूर शहरात रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गांधी चौक, जटपुरा गेट, महाकाली मंदीर परीसरात, इतर वार्डात व मित्रांकडेसुध्दा शोध घेतला असता मिळून न आल्याने चंद्रकांतच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनला नोंद घेऊन त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदर व्यक्ति कोणालाही आढळल्यास शहर पोलिस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हरविलेल्या व्यक्तिचे वर्णन :  बांधा – मजबूत,   उंची – 5 फुट  6 इंच, रंग -गोरा, केस -काळे, डोळे -टपोरे, चेहरा -गोल, नाक -सरळ, अंगात टी शर्ट, क्रिम रंगाचा काळया रंगाचा जिन्स पॅन्ट  घातलेला असून उजव्या खांदयावर गोंदन आहे.

दुस-या प्रकरणात शहरातील समाधी वॉर्ड येथील रहिवासी लक्ष्मी सागर पवार (वय 19) ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी कोणाला  काही न सांगता परस्पर घरून निघुन गेली आहे. वार्डात व नातेवाईक यांच्याकडे  विचारपुस केली असता तिचा शोध लागला नाही. तसेच चंद्रपूर शहर, जटपुरा गेट, गांधी चौक,  रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मुख्य रेल्वे स्टेशन, रामाळा तलाव येथे  शोध घेतला असता पत्नी मिळून न आल्याने तिचे पती सागर शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनला मिसींग रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन :  बांधा- सळपातळ,   उंची -  4 फुट  5इंच, रंग -सावळा, केस -काळे बॉबकट, डोळे -टपोरे काळे,   चेहरा -गोल, अंगात पिंक रंगाचा नाईट ड्रेस, अंगात सोन्याचे मंगळसुत्र, उजव्या हाताच्या मध्यमा बोटामध्ये सोन्याची अंगठी व कंरगळी मध्ये चांदीची अंगठी  आहे. पायात पैजन तिला मराठी कन्नड, हिन्दी, इंग्रजी अशा भाषा बोलता येतात.

००००००

शबरी आदिवासी घरकुल योजनेची आता शहरी भागात देखील अंमलबजावणी

 शबरी आदिवासी घरकुल योजनेची आता शहरी भागात देखील अंमलबजावणी

चंद्रपूर, दि. 4 : आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यांत राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरी भागातसुध्दा या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकूल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. ग्रामविकास विभागाच्या 10 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष- इंदिरा आवास योजना कक्षाचे रुपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये करण्यात आले आहे. त्यानुषंगाने या कक्षाद्वारे ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकूल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षाद्वारे करण्यात येत आहे.

परंतु शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी ही संबंधित महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत यांचेमार्फत करण्यासाठी नगरविकास विभागास आदिवासी विकास विभागाद्वारा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने सहमती दर्शविली असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यांत राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकूल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. जातीय दगंलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती, अॅट्रोसिटी अॅक्टनुसार पिडित व्यक्ती, विधवा किंवा परित्यक्त्या महिला, आदिम जमातीची व्यक्ती यांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

      शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2024 अन्वये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्राकरिता 350, बल्लारपूर नगर परिषद क्षेत्राकरिता 200, मूल नगर परिषद क्षेत्राकरिता 200 तर पोंभूर्णा नगर पंचायत क्षेत्राकरिता 100 असा एकूण 850 शहरी घरकुलांचा लक्षांक चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्राप्त आहे. पात्र व गरजू आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करून शबरी शहरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

 लाभार्थी पात्रता : 1) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2) स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे. 3) महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा. 4) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी. 5) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 6) वय वर्षे 18 पूर्ण असावे. 7) स्वतःच्या नावाने बैंक खाते असावे. 8) घरकुलाच्या बांधकामासाठी किमान 269.00 चौरस फुट जागा उपलब्ध असावी. 9) वार्षिक उत्पन्न मर्यादा रूपये 3.00 लाख पर्यंत असावी.

 आवश्यक कागदपत्रे : 1) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो 2) रहिवासी प्रमाणपत्र (15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक) 3) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) 4) घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा. 5) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा) 6) शिधापत्रिका (रेशन कार्ड) 7) आधार कार्ड 8) एक रद्द केलेला धनादेश (कँसल्ड चेक) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्रमांक, IFSC कोड स्पष्ट दिसत असलेले) 9) गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांनी मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावती सादर करावी. सोबत कर मुल्यांकन प्रत सादर करावी.

 अर्ज करावयाची पद्धत : विहित अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, महानगर पालिका चंद्रपूर व संबंधित नगर परिषद / नगर पंचायत येथे नि:शुल्क उपलब्ध आहे. अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह वरील कार्यालयात सादर करावा व त्याची पोच घ्यावी.

 अनुदान रक्कम : घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही रूपये 2.50 लाख एवढी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालील प्रमाणे 4 टप्प्यांत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येईल.

1) घरकुल मंजूरी 40 हजार रुपये, 2) प्लिंथ लेव्हल 80 हजार रुपये, 3) लिंटल लेव्हल 80 हजार रुपये आणि 4) घरकुल पूर्ण 50 हजार रुपये

०००००००

Friday, 29 November 2024

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 29 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, दि. 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.  जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००

परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू

 

परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू

चंद्रपूर, दि.  29 :   महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2024 जिल्ह्यातील विविध केंद्रावर 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8  ते सायं 6 वाजेपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात येत आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमीत करण्यात आले.

1 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरीक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. तसेच सदर वेळेत व परिसरात नियमित व रोजचे वाहतुकीव्यतिरिक्त  इतर कोणत्याही हालचालींना  प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ईमेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

या परिक्षा केंद्राना लागू राहतील आदेश : 1) विद्याविहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर 2) सरदार पटेल महाविद्यालय, गंजवॉर्ड,चंद्रपूर, 3) बी.जे.एम. कार्मेल अकादमी, तुकूम चंद्रपूर, 4) रफी अहमद किदवाई मेमो हायस्कूल, घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर, 5) सेंट मायकल इंग्लिश स्कूल, नगीनाबाग, चंद्रपूर, 6) बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर, 7) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर, 8) मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, चंद्रपूर, 9) चांदा पब्लिक स्कूल, रामनगर चंद्रपूर आणि 10) भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मुल रोड, चंद्रपूर.

सदर आदेश परीक्षा दिनी अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तिविरुध्द प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमूद आहे.

०००००