Search This Blog

Thursday, 8 January 2026

खेळामधून होतो व्यक्तिमत्वाचा विकास - अपर पोलिस अधिक्षक कातकडे

 




खेळामधून होतो व्यक्तिमत्वाचा विकास - अपर पोलिस अधिक्षक कातकडे

Ø चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 08 : खेळामध्ये यश-अपयश या गोष्टीची पर्वा न करता मुलांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा. त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. आपल्या मुलांना मैदानी खेळ तथा कला कौशल्य जोपासू द्या, असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास नागपूरचे विभागीय उपायुक्त दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, सदस्य वनिता घुमे, ज्योत्स्ना मोहितकर, महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, आदी उपस्थित होते.

उपायुक्त दत्तात्रय मुंडे यांनी स्पर्धेत सहभाग घेतांना यशाची पर्वा न करता सहभाग घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या व चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाळूंना विभागीय तथा राज्यस्तरावर संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असे बालक व विधी संघर्षग्रस्त बालके, बालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमध्ये शिकत असलेले सर्वसामान्य बालके यांच्यामध्ये एकमेकांविषयी  बंधूभाव निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात कौटूबिंक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बालकामगार प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, बालशोषण प्रतिबंधावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तथा महिला व बालविकास विभागाच्या केंद्र पुरस्कृत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बालगृह योजना, मिशन शक्ती अंतर्गत महिला हेल्पलाईन 181, महिला सक्षमीकरण केंद्र,  सखी वन स्टॉप सेंटर, शक्तिसदन, वर्किंग वूमन हॉस्टेल, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, अनाथ प्रमाणपत्र, बालसंगोपन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, परिविक्षा अधिनियम  आदी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. 

विद्यार्थ्यांचा मानसिक, शारिरीक व कौशल्यात्मक विकास व्हावा व बालगृहातील मुलांना बाहेर जगातील स्पर्धांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण व्हावे, यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजूरकर यांनी केले तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले.

०००००

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी पुस्तकांचे प्रकाशन

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी पुस्तकांचे प्रकाशन

Ø 11 जानेवारीपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 08 : जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर यांच्या वतीने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी  दरवर्षी 14  ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

चंद्रपूर जिल्हा मराठी भाषा समितीच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने मराठी पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे नियोजित आहे. चंद्रपूर जिल्हयातील साहित्यिकांना आपली पुस्तके प्रकाशित करावयाची आहेत, अशा लेखकांनी 11 जानेवारी पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर यांच्या 9923694060 या  भ्रमणध्वनी  क्रमांकावर  संपर्क  साधावा.  विहित  मुदतीनंतर  प्राप्त  होणा-या  विनंतीचा  स्विकार केला जाणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिक व रसिक वाचकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

०००००

महामार्गावर रुग्णवाहिका व गस्ती पथके तैनात

 

महामार्गावर रुग्णवाहिका गस्ती पथके तैनात

Ø  भटक्या जनावरांमुळे होणा-या अपघाताची दखल

          चंद्रपूर, दि. 08 : राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो दखल घेवून महत्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील खालील राष्ट्रीय  महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून त्यावर 24 बाय 7 रुग्णवाहिका तथा गस्ती पथके कार्यान्वित करण्यात आली आहे.  

        वरोरा-वणी या राष्ट्रीय महामार्ग 930 वर गस्त करणा-या वाहनाचा क्रमांक MH-३४, BZ-१४१८ असून गस्तवाहन चालकाचे नाव आशिष बलवान नागपुरे (मो. क्र. 8329592097) आहे. तर जनावरामुळे अपघात झाल्यास या महामार्गावर रुग्ण वाहिका क्रमांक MH-३४ BZ- ३९९३ उपलब्ध आहे. रुग्णवाहिका चालकाचे नाव सौरव बेग  (मो. क्र.9201997286) असे आहे.

गोविंदपूर-राजुरा या NH-३५३ बी या महामार्गावर गस्त वाहन क्रमांक MH-३४, CQ-०१२४ असून गस्तवाहन चालकांचे नाव सुनिल विजय  (मो. क्र. 9507905482, 7748096278) आहे. या महामार्गावर रुग्णवाहिका क्रमांक RJ-२७ PB-२५६८ असून रुग्णवाहिका चालकाचे नाव शिवपाल (मो.क्र. 8878418057) आहे.

         राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या भटक्या जनावरांना, राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून राज्य शासनाद्वारे प्रस्तापित केलेल्या गौशाला /शेल्टर मध्ये उक्त जनावरांना जमा करण्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबत संपर्क साधण्याच्या दृष्टीने माहिती आवश्यक आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या गौशाला/ शेल्टर, नियत्रंण कक्ष व गस्ती  पथकाची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी.

            जिल्हा/ तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षांचे ठिकाण व संपर्क क्रमांक (दुरध्वनी मोबाईल/-मेल) गठीत करण्यात आलेल्या गस्ती पथकांचा तपशील (विभागनिहाय), त्यामध्ये -कार्यक्षेत्र, पथक प्रमुख व सदस्यांचे संपर्क क्रमांक, गस्तीचे वेळापत्रक या संदर्भात जारी करण्यात आलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना / कार्यपद्धती असल्यास त्याची देखील एक प्रत पुरविण्यात यावी, जेणेकरून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या संबंधित उद्योजकांच्या गस्ती प्रथकाला समन्वय साधण्यासाठी माहिती पुरविता येईल. सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे सतत निरीक्षण असल्याने हा विषय अत्यंत तातडीचा असून आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी कळविले आहे.

००००००

13 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

 

13 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

            चंद्रपूर, दि. 08 :  सर्व निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

००००००

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 08 : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात  साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या  पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती,  इयत्ता 9वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी/ परीक्षा फी या शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे.

वरील सर्व योजना सन 2025-26 पासून महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असल्याने सर्व मान्यताप्राप्त शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांचे  अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००