Search This Blog

Saturday, 18 November 2017

प्रधानमंत्र्यांच्या स्कील इंडियासाठी सिपेटच्या माध्यमातून काम करु शकल्याचा आनंद -- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर



सिपेटच्या पहिल्या तुकडीला प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कौशल्य विकासाची घोषणा केली होती. चंद्रपूरमध्ये सेन्ट्रल इन्स्टिटयुट ऑफ प्लॅस्टीक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय मंत्री म्हणून या विभागासाठी हे काम करु शकल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
विदर्भातील सर्वात प्रभावी असणा-या या प्रशिक्षणाला आगामी काळात वैभव प्राप्त होणार आहे. पहिल्याच तुकडीतील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील कौशल्य विकास उपक्रमाचे हे जीवंत उदाहरण आहे. चंद्रपूरमधील औद्योगिक संस्थांनी या प्रशिक्षणार्थ्यांना स्थानिक स्तरावरही संधी दयावी, असे आवाहन केले.
केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री असताना मला या प्रशिक्षणाबद्दल कळले होते. त्यावेळी या इन्स्टिटयुटमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच रोजगार उपलब्ध होतो. ही बाब मला लक्षात आली. त्यामुळे ही संस्था आपल्या येथे मिळावी यासाठी प्रयत्न केले, त्याला यश आले. भारतात 27 ठिकाण ही संस्था चालते. त्यात चंद्रपूरचा सहभाग आहे. ही संस्था या ठिकाणी सुरु करुन शकल्याबद्दल आज खरा आनंद होत आहे.  
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांच्यासह आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, वरोराचे नगराध्यक्ष एहेतशाम अली, माजीमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनील फुलझेले, सिपेटचे प्रकल्प प्रमुख मिलिंदकुमार भरणे  उपस्थित होते.
भारत सरकारच्या रसायणे, खते मंत्रालयातंर्गत येणा-या केमीकल आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर येथे सेन्टर यून्स्टिटयुट प्लॉस्टिक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था काम करते. महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत प्रशिक्षण मिळालेल्या 90 टक्के मुलांना चांगल्या कंपनीत हमखास नोकरी मिळत आहे. या संस्थेची सुरुवात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पेट्रोकेमिकल विभाग असताना झाली. ही संस्था चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारी संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हॉटेल एनडीमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हयातील शासकीय, गैरशासकीय औद्योगिक संस्था, विविध व्यापारी संघटना, व्यापार उद्योग समूहातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन सिध्दार्थ दाभाडे यांनी केले. आदिवासी गावातील विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठीत कंपनीत नोकरी लागल्यानंतरचे मनोगत या कार्यक्रमाचे वैशीष्टय ठरले.  या कार्यक्रमाला एससीसी, अल्ट्राटेक, माणिकगड, सिटीपीएस, डल्ब्युसिएल, एमईल, अंबुजा सिमेंट आदी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या कौतुक सोहळयाला उपस्थित होते.

0000

सामान्य जनतेला समाधान वाटेल अशी खड्डे मुक्त मोहीम राबवा - चंद्रकांत दादा पाटील



चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा
चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर – रस्ते दुरुस्ती, त्यातील तांत्रिक अडचणी व खड्डे दुरुस्ती मोहीम यामध्ये कारणमिमांसा न देता जनतेला समाधान वाटेल, अशा पध्दतीच्या खड्डे मुक्त मोहीमेला धडाक्याने पूर्ण करा. 15 डिसेंबरपर्यंत ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
ना.चंद्रकांत दादा पाटील खड्डे मुक्त महाराष्ट्र मोहीमेसाठी 34 जिल्हयांच्या दौ-यावर आहेत. चंद्रपूर हा त्यांचा या मोहिमेतील 16 वा जिल्हा होता. तत्पूर्वी वर्धा जिल्हयात त्यांनी आज बैठक घेतली. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीनही विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता उल्हास डेबडवार, अवर सचिव करमरकर, आंतर वित्तीय सल्लागार मेश्राम, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे आदी उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व पदावरील अभियंते, सहायक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बालपांडे यांनी चंद्रपूर जिल्हयात सुरु असलेल्या कामाचा आढावा सादरी करणामार्फत मांडला. जिल्हयातील 2510 कि.मी.लांबीच्या रस्त्यामध्ये 450 लहान मोठे पुल असून जवळपास 40 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्यामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-या चिमूर येथील उपविभागीय अभियंता श्री.टिकले, नागभिड उपविभागीय अभियंता श्री.कोठारी, सिंदेवाही येथील उपविभागीय अभियंता श्री.पुपरेड्डीवार यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दादा पाटील यांना सादरीकरण करतांना नियोजन भवनाच्या भव्यतेबद्दल व तांत्रिक वैशिष्ठयाबद्दल माहिती देण्यात आली. या नियोजन भवनाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाची भूमिका असणारे चंद्रपूरचे उपविभागीय अभियंता उदय भोयर, शाखा अभियंता चंद्रशेखर कोडगीलवार, स्थापत्य अभियंता संजय धारणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सामान्य कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यत सर्वांशी संवाद साधतांना मुंबईच्या वाररुमध्ये कशा पध्दतीने काम सुरु आहे, याची माहिती दिली. नागपूर व चंद्रपूरमध्ये नवनवीन उपाय योजना करुन काही जुन्या इमारतींचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षानी वाढविण्यात आले आहे. तांत्रिक दृष्टया योग्य असणा-या या बांधकामाला नवे स्वरुप दिल्याबद्दल त्यांनी विभागाच्या कर्मचा-यांचे कौतुक केले. खड्डेमुक्त जिल्हा करण्यासाठी यावेळी काही तरुण अभियंत्यांनी वेगवेगळे उपाय सूचविले. तर काहींनी वेगळया सूचना केल्या. या सूचनांचे स्वागत करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिमा संवर्धनासाठी जनतेच्या या विभागातील सहभागाबद्दल आग्रही राहा, अशी सूचना त्यांनी केली. सामान्य जनतेला तांत्रिक बाबी माहिती नसल्यातरी त्यांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे खड्डेमुक्त अभियानात देखील काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र समाजातील विविध घटकातील दहा लोकांकडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंचापासून गृहीनी पर्यंत या मोहीमेमध्ये जनसहभाग घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
                                                                       0000

चंद्रपूर जिल्हयात कौशल्य विकास विभागामार्फत शेकडो युवकांना आर्थिक सुबत्ता जिल्हयात 1736 उमेदवारांना प्रशिक्षण

117 युवकांना रोजगार व स्वयंरोजगारातून आर्थिक सुबत्ता
चंद्रपूर, दि.16 नोव्हेंबर – सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य युक्त प्रशिक्षण देवून त्यांना त्यांचा रोजगार उभा करण्यासाठी किंवा नौकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे महत्वपूर्ण कार्य जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हयात सुरु असते. गेल्या तीन वर्षात या विभागाने जिल्हयातील 1 हजार 736 उमेदवारांना प्रशिक्षण दिले असून 117 युवकांना आतापर्यंत विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळाला आहे. बेरोजगार युवकांनी या विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना प्रशिक्षित करणे, विविध ठिकाणच्या खाजगी व्यवस्थापनाशी संपर्क साधणे, विविध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणार्थी मिळविण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणा-या संस्थेवर नियंत्रण ठेवणे, रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे, असे विविध कार्य या विभागामार्फत जिल्हयात सुरु असतात. कौशल्ययुक्त चंद्रपूर जिल्हा बनवण्याकडे या विभागाचा कटाक्ष असून आदिवासी अनुसूचित जमाती याशिवाय अन्य घटकातील उमेदवारांना प्रशिक्षण, नोकरी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकस महामंडळाव्दारे पतपुरवठा करण्याचे कार्य या विभागामार्फत चालते.
युवकांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम प्रशिक्षण देवून शहरी व गावपातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे कौशल्य विकास विभाग स्थापन केला आहे. याचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत. चंद्रपूर जिल्हयात आतापर्यंत 642 युवक, युवती रोजगार स्वयंरोजगारक्षम झालेले आहेत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात रोजगार व स्वयंरोजगारातून आर्थिक सुबत्ता आली आहे.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियांनाअंतर्गत चंद्रपूर जिल्हयात 42 तुकडयामध्ये 1129 युवक युवती प्रशिक्षण घेत असून 13 तुकडयांमधील 372 युवक युवतींचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. तसेच शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी करणे, शहरातील बिकट आर्थिक परिस्थितीतील कुटूंबाना कौशल्य विकासातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देवून त्यांचे किमान जीवनमान उंचावण्याकरीता राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयात 17 तुकडयामध्ये 507 उमेदवार प्रशिक्षणाचा लाभ घेत असून 9 तुकडयामधील 270 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. तसेच ग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्रदान करता यावा म्हणून शासनाकडून ग्रामीण भागात ग्राम विकास प्रवर्तकाची नेमणूक केलेली असून मुल, जिवती या तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामपातळीवरील एकूण 60 युवक युवती वरील दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत.
एकंदरीत प्रमोद महाजन कौशल्य विकास NULM व RDF या तीन्ही योजनेअंतग्रत 59 तुकडया मधून 1736 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. जवळपास 22 तुकडयामधील 642 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण होवून रोजगारक्षम झाले आहे. त्यांना उपलब्धतेनुसार नोकरी मिळू शकते. एकूण 117 युवक-युवती निरनिराळया क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगारक्षम झालेले आहेत.
आता यवुक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणातून सक्षम होवून, अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाचा लाभ घेवून असंख्य युवक, युवती आपले जीवन समृध्द करीत आहे. या योजनेअंतर्गत बाजारपेठेत उच्च मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. ज्यात बांधकाम, फॅशन डिझाइन, गारमेंट मेकिंग, ब्युटी अडव्हाझर, सॉफ्ट स्किल, सॉफ्ट टॉय, बांबू, कौन्सिलिंग स्किल ईलेट्रिकल, इंडस्ट्रियल ईलेट्रिकल, रिफ्रीजेटर ॲन्ड हेअर कंडिशनर, अकाऊटिंग टॅली, ऑटोमोटिव्ह, प्लॅस्टिक प्रोसेसिंग, कुरिअर ॲन्ड लॉजिस्टिक, बँकिंग, कृषी प्रक्रिया या सारख्या महत्वाचा क्षेत्राचा समावेश होतो.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज असंख्य तरुण-तरुणींच्या मनात भविष्यात आर्थिक स्थैर्याबाबत सुरक्षितता निर्माण झाली आहे. पांरपारिक शिक्षणाच्या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. राष्ट्राच्या विकासात युवक आपले अमुल्य योगदान देत आहे. कौशल्यात्मक विकासाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्याकरिता मेक इन इंडियाचा धर्तीवर राज्याचे कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय साकार होत आहे. हेच खरे या योजनेचे फलित होय. चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींनी प्रशिक्षण देणा-या संस्थांनी, प्रशिक्षण देऊ शकणा-या तज्ज्ञांनी आणि रोजगार उपलब्ध असणा-या संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता या प्रशासकीय भवनातील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक मदत घेण्याचे आवाहन सहायक संचालक श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
                                                                      0000

वेकोलीकडून योग्य मोबदला आणि नोकरी देण्याचे अभिवचन ना.हसंराज अहीर यांच्यासोबत वरिष्ठांची बैठक एकरी 8 ते 10 लाख रूपये दर मिळणार


पोवनी- 3 प्रकल्पात एक रूपयाही दर कमी होणार नाही
पोवनी-3 प्रकल्पात सीआयएल आर ॲन्ड आर पॉलिसी 2012 नुसार पूर्ण नोक-या मिळणार

चंद्रपूर, दि.16 नोव्हेंबर - केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषतः पोवनी 3 या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी या संबंधात महत्वपूर्ण बैठक वेकोलिचे सीएमडी आर.आर.मिश्र, डायरेक्टर पर्सनल डॉ. संजय कुमार यांच्यासोबत नागपूर येथे घेतली. सदरच्या बैठकीत वेकोलिमधील चालू प्रकल्पामध्ये व पोवनी 3 या प्रकल्पामध्ये सी.बी. ॲक्ट 1957 मधील कलम 14(1) चा वापर करून शेतक-यांना एकरी 8 ते 10 लाख रूपए मोबदला व सीआयएल आर ॲन्ड आर पॉलिसी 2012 प्रमाणे नोक-या दिल्या जातील, असे स्पष्ट केले. वेकोलिमधील चालू सात प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार असून त्यात बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी 3, धोपटाळा एक्सटेन्शन, चिंचोली रिकास्ट तसेच वणी क्षेत्रातील बेलोरा नायगांव डिप, निलजई डिप, मुंगोली एक्सटेन्शन व वणी नार्थ क्षेत्रातील उकणी प्रकल्प यांना याचा विशेष फायदा होणार आहे.
सदरच्या बैठकीत वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र यांनी स्पष्टपणे कबुली दिली की, पवनी -3 प्रकल्पाच्या जमीनीच्या दराच्या बाबतीत वेकोलिच्या अधिका-यांची विषय समजण्यात चूक झाली व गलतफहमी झाली. नागपूर मुख्यालयातच पवनी-3 प्रकल्पाचे बिल असून हा प्रकल्प पहिला असेल, की ज्याचे ‘कॅम्पेनशेन बिल’ हे नागपूर मुख्यालयातूनच पारीत होईल. 4 नोव्हेंबर 2017 रोजी ना. हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक आयोजित केली होती. त्यादृष्टीने 13 नोव्हेंबरला वेकोलि सीएमडी सोबत बैठक आयोजित करून या बैठकीत वेकोलि अधिका-यांना ना.अहीर यांनी कोळसा मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे पोवनी 3 व इतर प्रकल्पात काम करावे असे स्पष्ट निर्देश दिले. ना.अहीर यांच्या प्रयत्नामुळे विकेंद्रीकरण होवून शेतक-यांच्या प्रकल्पाचे कॉम्पेन्सेशन बिल आता दिल्ली ऐवजी नागपूर येथूनच मान्यता मिळणार असून वेकोलिचे सीएमडी यांनी पोवनी 3 प्रकल्पाचे बिल येत्या दोन महिन्यात नागपूर येथेच निकाली काढावे असे निर्देश दिले. सदरच्या बैठकीत मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण काम करू व पोवनी 3 या प्रकल्पाचे बिल जलदरित्या पूर्ण करून हा प्रकल्प लवकरच सुरू करण्याची ग्वाही वेकोलिचे सीएमडी यांनी दिले. सदरच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे वेकोलि पोवनी 3 चे प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच कलम 14(1) प्रमाणे दर तसेच नोक-या प्राप्त होतील. ना.अहीर यांनी पोवनी 3 च्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना आश्वस्त करतांना सांगितले की, एकरी 8 ते 10 लाख रूपए दरामध्ये कुठेही एकसुध्दा रूपया कमी होवू देणार नाही. तसेच या प्रकल्पात असलेल्या संपूर्ण नोक-या देण्यात येतील.
या विशेष बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्रा प्रमुख खुशाल बोंडे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा महासचिव राहूल सराफ, जि.प. सदस्य तथा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, किसान आघाडी महामंत्री राजू घरोटे, तालुक्याचे महामंत्री प्रशांत घरोटे व सुनिल वांढरे, काशिनाथ पाटील गोरे, संजय गोरे, जितेंद्र उमरे, सुरेश पोडे, प्रविण खंडारकर, संदीप कावळे, संतोष उरकुडे, धनराज देठे, प्रफुल गोवारदिपे, मारोती लेडांगे, राजु गालफाडे, आशिष मेंढे, मुमताज खान, शंकर जेऊरकर, इटनकर, सचिन धाबेकर, शामराव काठवले, रामदीन, विशाल वैरागडे आदी पवनी -3 प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते, अशी माहिती ना.अहीर यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.
                                                                          000

जागरुक समाज निर्मीतीचे श्रेय पत्रकारीतेलाच – मनोहर गव्हाळ


जिमाअ व विदर्भ संपादक संस्थेतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
चंद्रपूर, दि.16 नोव्हेंबर – पत्रकारीतेचा मुळपिंड हा जागरुकता निर्माण करणे आहे. माहिती देणे, शिक्षित करणे हेच पत्रकारीतेचे प्रमुख कार्य असून भारतीय समाजाला जागरुक करण्याचे आणि लोकशाही बळकट करण्याचे कार्य पत्रकारीतेने केले असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व विदर्भ संपादक, पत्रकार बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळयात ते बोलत होते.
स्थानिक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आज राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात आला. भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय प्रेस दिन साजरा केला जातो. यावर्षी ‘माध्यमासमोरील आवाहने’ हा विषय प्रेस परिषदेने निश्चित केला होता. या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर जेष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक डॉ.भाईदास ढोणे, विदर्भ संपादक संस्थेचे अध्यक्ष सयद रमजान अली, कार्यकारी अध्यक्ष शेख अनवरभाई उपस्थित होते.
यावेळी संबोधित करतांना मनोहर गव्हाळ यांनी भारतीय लोकशाहीमध्ये माध्यमांनी आपले दायित्व व जबाबदारी ओळखून समाज सुधारणेचे महत्वाचे कार्य केले आहे. त्यामुळेच पत्रकारीतेचे महत्व आणि पत्रकारीतेचा दरारा कायम आहे. पत्रकारांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण गुणवत्तेतून हा दर्जा कायम राखण्याची धडपड करायला हवी. वेगवेगळी माध्यमं आणि त्याचा उपयोग सकारात्मक होणे याचाच अर्थ समाजात मोठया प्रमाणात प्रबोधन होत आहे. त्यामुळेच जागरुक समाज निर्मितीचा आपला वसा कायम ठेवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी बोलतांना भाईदास ढोले यांनी समाजाचा सामाजिक पुरुषार्थ जागविण्याचे कार्य पत्रकार करु शकतो. त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यरत असावे, असा आशावाद व्यक्त केला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यमांसमोरील आवाहने या विषयावर बोलतांना सद्या समाज माध्यमांतून येणा-या माहितीला तपासण्याचे मोठे काम माध्यमांवर येवून पडले आहे. माहितीचा धबधबा समाज माध्यमांवर सुरु झाला आहे. मात्र बातमी खरी की खोटी हे जाणून घेण्याचे कसब अंगी बाळगणे व ते विकसीत करणे खरी कसोटी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत दाचेवार यांनी छोटया व मध्यम वृत्तपत्राच्या पत्रकार संपादकानी आपल्या वर्तमानपत्राची ओळख निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 20 ते 25 वर्षापूर्वी नवाकाळ, मराठा आदी वर्तमानपत्रे आपल्या निर्भिड अग्रलेखासाठी ओळखले जात होते. वर्तमानपत्र समाजाचा जसा आरसा असतो. तसाच तुमच्या वृत्तपत्रातील अग्रलेख हा संपादकाचा चेहरा असतो. त्यामुळे कोणत्याही काळात लिखानातूनच पत्रकाराची ओळख झाली पाहिजे. चारपानी नवाकाळ जर ही हुकूमत आजही गाजवू शकतो. तर स्थानिक दैनिकाला ही वाटचाल कठीण नाही. यावेळी पत्रकार व शायर सय्यद रमजान अली यांनीही मार्गदर्शन केले. शेख अनवर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन आरती दाचेवार यांनी केले. तर आभार रकिब अलीम शेख यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते.
                                                                                0000