Search This Blog

Tuesday, 19 November 2024

आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरीत तक्रार करा

 

आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरीत तक्रार करा

Ø जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 19 : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. त्यानंतरचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याबाबत त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

००००००

निवडणुकीसंबंधी तक्रार असल्यास यंत्रणेला माहिती द्या

 

निवडणुकीसंबंधी तक्रार असल्यास यंत्रणेला माहिती द्या

Ø कायदा हातात न घेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर दि. 19 : मुल पोलिस स्टेशन हद्दितील मौजा कोसंबी गावात 18 नोव्हेंबर रोजी दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. त्या अनुषंगाने कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी याबाबतीत अफवा न पसरविण्याचे तसेच निवडणुक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

   18 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रकरणात दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्यां गुरूनुले यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपुर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मुनगंटीवार चर्चा करीत असलेल्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून मोबईलद्वारे व्हिडीओ शुटींग केली. तसेच संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून भांडण केले असल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून मुल पोलिस स्टेशन येथे कलम 296,189(2),191(2),190  अन्वये संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम,विजय चिमडयालवार व इतर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

   तसेच दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे बल्लारशा विधानसभा क्षेत्रातील मौजा कोसंबी येथे सभा घेत असल्याचे माहिती झाल्याने, तक्रारदार कांग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे वाहनचालक राजू माणिकराव गावतुरे   हे मौजा कोसंबी येथे उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत गेले असता सदर सभा ठिकाणी मोबाईलने व्हिडीओ चित्रीत करीत असतांना, सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रीकरण का करीत आहे? यावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने पोलिस स्टेशन मुल येथे कलम 115(2), 351 (2),351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

   सदर घटनेबाबत दोन्ही गटांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. बल्लारशा विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. याबाबत कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी अफवा न पसरविण्याचे आणि निवडणूकसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कार्यालयाने कळविले आहे.

०००००

Monday, 18 November 2024

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी




 

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, चंद्रपूर द्वारा विधानसभा निवडणूक - 2024 स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती मानवीय साखळीचे आयोजन शहरातील भवानजी भाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) श्री. कुतीरकर, तहसीलदार विजय पवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, अश्विनी सोनवणे (प्राथ.), उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निवास कांबळे यांच्या उपस्थितीत चार हजार विद्यार्थी, शिक्षक यांनी जवळपास तीन किलोमीटर मानवीय साखळी तयार केली.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. सोबतच 20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर आपली सेल्फी दिलेल्या लिंक वर अपलोड करून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे, असेही सांगितले.

या मानवीय साखळी मध्ये ज्युबली हायस्कूल, मातोश्री विद्यालय, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल, माऊंट कार्मील कॉन्व्हेन्ट, विर शहीद भगतसिंग हायस्कूल, रवींद्र उच्च प्राथमिक शाळा, हिंदी माध्यमिक स्कूल, चंद्रपूर पब्लिक स्कूल, राजीव गांधी महाविद्यालय, बाबुराव वानखेडे या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाली होते. सोबतच  जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षकांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या टी शर्ट, टोपी परिधान करून सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनपाल फटिंग शिक्षण यांनी मानले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे, प्रशासन अधिकारी नीत सर, निखिल तांबोळी, अविनाश जुमडे, अतुल पोहणे, प्रकाश झाडे, सुरेंद्र शेंडे, प्रशांत मत्ते, श्री. आत्राम, श्री. गेडाम, श्री. कोवे यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी  उपस्थित होते.

०००००००

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल



 बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

Ø मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना

चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे. यात एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षीसे तुम्ही जिंकू शकता, त्याकरीता बस, मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे. 

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. यात मतदारांनो तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणा-या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आहे 2.15 लाखांची  रॉयल एनफिल्ड बुलेट (प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आणि विमा खर्च समाविष्ट). सदर बाईक सध्या विसापूर येथील अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षिसांमध्ये 15 ग्राम सोन्याचे नाणे, आणि एस-23, फाईव्ह जी सॅमसंग गॅलक्सी फोनचा समावेश आाहे.

अशी आहे पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक. 2) 20 नोव्हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक.

सहभागी होण्यासाठी : इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या Google फॉर्मवर (https://forms.gle/L9hkapkUuR3c46jBA) अपलोड करावा. दिलेला QR कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

००००००

अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा



अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

चंद्रपूर दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. याच अनुषंगाने आज (दि.18) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील इतर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे एकाच वेळी जिल्ह्यातील विविध आस्थापनांच्या नागरिक / मतदारांनी मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुक कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राकरीता दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. सामुहिक प्रतिज्ञेसाठी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयात प्रतिज्ञा घेतली. यात खाजगी व शासकीय महाविद्यालये/ अभियांत्रिकी महाविद्यालये / आयटीआयचे विद्यार्थी, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ, विविध महिला बचत गट, जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांचे कर्मचारी, मनरेगा जॉबकार्डधारक मजुर व औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या कर्मचा-यांचा सहभाग होता.

०००००