निवडणुकीसंबंधी तक्रार असल्यास यंत्रणेला माहिती द्या
Ø कायदा हातात न घेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर दि. 19 : मुल पोलिस स्टेशन हद्दितील मौजा कोसंबी गावात 18 नोव्हेंबर रोजी दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. त्या अनुषंगाने कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी याबाबतीत अफवा न पसरविण्याचे तसेच निवडणुक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
18 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रकरणात दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्यां गुरूनुले यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपुर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मुनगंटीवार चर्चा करीत असलेल्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून मोबईलद्वारे व्हिडीओ शुटींग केली. तसेच संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून भांडण केले असल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून मुल पोलिस स्टेशन येथे कलम 296,189(2),191(2),190 अन्वये संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम,विजय चिमडयालवार व इतर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे बल्लारशा विधानसभा क्षेत्रातील मौजा कोसंबी येथे सभा घेत असल्याचे माहिती झाल्याने, तक्रारदार कांग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे वाहनचालक राजू माणिकराव गावतुरे हे मौजा कोसंबी येथे उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत गेले असता सदर सभा ठिकाणी मोबाईलने व्हिडीओ चित्रीत करीत असतांना, सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रीकरण का करीत आहे? यावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने पोलिस स्टेशन मुल येथे कलम 115(2), 351 (2),351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेबाबत दोन्ही गटांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. बल्लारशा विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. याबाबत कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी अफवा न पसरविण्याचे आणि निवडणूकसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कार्यालयाने कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment