Search This Blog

Wednesday 20 November 2019

नोकरी करण्यासाठी कुठेही जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक : राहुल कर्डिले


v पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला 810 उमेदवारांची उपस्थिती
v  11 प्रतिष्ठीत कंपन्यांनी घेतल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती
चंद्रपूर दि 20 नोव्हेंबर : शासकीय नोकरी किंवा कंपनीमधील नोकरी ही बहुतेक वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे  विद्यार्थीदशेतच नोकरी करायची असेल तर आपल्या घरापासून जिल्ह्यापासून दूर जाण्याची तयारी ठेवा. नोकरी मिळवणे ही एक प्रक्रिया असते. त्यासाठी सातत्यपूर्ण  प्रयत्न आणि चौकस असणे  गरजेचे असून त्यासाठी देखील मानसिक तयारी  विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृह या ठिकाणी आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह  सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य सचिन नखाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती. 
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची संवाद साधताना राहुल कर्डिले यांनी रोजगाराची सार्वत्रिक चिंता असल्याचे स्पष्ट केले. मात्र स्पर्धा परीक्षांपासून तर अन्य सर्वच क्षेत्रांमध्ये आज स्पर्धा असून त्यासाठी थोडा संयम व आपल्या आवडीची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर सारख्या जिल्ह्यांमधून आयएएस अधिकारी बनण्याचा प्रवास देखील त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढे मांडला. इंजिनिअरिंग केल्यानंतर देखील आपले लक्ष स्पर्धापरीक्षा होते. त्यामुळे  कंपन्यांसोबत  संघर्ष वाट्याला आला नाही.  मात्र तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या संघर्षाची देखील तयारी करावी लागेल. अनेक कंपन्यांची दारे ठोठावी लागेल.
त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न  करावे लागतील. तांत्रिक शिक्षणामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आहेत. त्या संख्येत जिल्ह्याच्या ठिकाणी देखील औद्योगिक संस्था मोठी कंपनी असेलच असे नाही. त्यामुळे तुमच्यासारखाच खेड्यातील एक विद्यार्थी असतानादेखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची अभिलाशा मी ठेवली होती. तुम्ही देखील अशाच पद्धतीने कुठेही जाण्याची तयारी ठेवून नोकरी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरीतील कौशल्य हे देखील तुम्हाला नव्या ठिकाणी आणखी नवी नोकरी देण्यास मदत करत असते.त्यासाठी स्वतःला कायम अपडेट ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ जात असून या समाज माध्यमांचा आपल्या हातातल्या स्मार्टफोनचा सकारात्मक वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळी औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेचे सचिन नखाते यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कंपन्यांमध्ये नोकरी मिळविणे आवश्यक आहे. याबाबतचे मार्गदर्शन केले तर सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे यांनी देखील यावेळी संबोधित करून रोजगार मेळाव्याची पार्श्वभूमी सांगितली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांनी संघर्ष करून नोकऱ्यांमध्ये व कंपन्यांमध्ये मिळेल ती नोकरी करावी, असे आवाहन केले.
आज ज्या प्रतिष्ठित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये पीआयजिओ वेहिकल्स बारामती, समाधान पूर्ती सुपर बाजार चंद्रपुर, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, स्पंदन स्फूर्ती फायनान्स लिमिटेड चंद्रपूर, एबीएस इलेक्ट्रो प्लेट इंडिया लिमिटेड पुणे, थर्ड आय सेक्युरिटी सर्विस चंद्रपूर, एन. डी. जेम्स बल्लारपुर, आदी कंपन्यांनी आपल्या विविध विभागासाठी उमेदवारांची निवड केली. कार्यक्रमाचे संचालन राखी बुराडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल गुल्हाने यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment