Search This Blog

Tuesday, 10 May 2022

मान्सूनपूर्व कामे जबाबदारीने पार पाडा – जिल्हाधिकारी गुल्हाने

 




मान्सूनपूर्व कामे जबाबदारीने पार पाडा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø तालुका यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सुचना

Ø जिल्ह्यात 86 गावे पूरप्रवण

चंद्रपूर दि. 10 मे : चंद्रपूर हा नद्यांचा जिल्हा आहे. वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा आणि अंधारी या प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहतात. अतिवृष्टी आणि धरणातील पाणी विसर्गामुळे यापूर्वी जिल्ह्यात सन 2005, 2006, 2013 आणि 2020 मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपापल्या क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी अधिका-यांना दिल्या.

नियोजन सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सुरवाळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नद्यांना येणारे पूर, अतिवृष्टी आणि धरणातील पाणी विसर्गामुळे जिल्ह्यात बाधित होणा-या गावांची संख्या 86 आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, पूर परिस्थितीत नागरिकांना कमी वेळात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे अत्यंत महत्वाचे असते. त्यासाठी नगरपालिका क्षेत्रात किंवा इतर गावातील सुरक्षित स्थळे शोधून ठेवा. शासकीय यंत्रणेला विविध सामाजिक संघटनांची मदत मोलाची ठरू शकते. त्यामुळे तालुका स्तरावर मान्सूनपूर्व आढावा घेतांना अशा संघटनांना आमंत्रित करावे. प्रत्येक वेळी पूर परिस्थिती, त्याची कारणे आणि धोके वेगवेगळे असतात. त्यादृष्टीने तालुका यंत्रणांनी सतर्क राहून पूर्वतयारी करावी.

महत्वाच्या यंत्रणांनी करावयाची कामे :

मान्सून कालावधीमध्ये तहसीलदार यांची जबाबदारी : मान्सून कालावधीत नियंत्रण कक्षाचे कामकाज दिवस-रात्र चालू राहील, याकडे लक्ष द्यावे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक तसेच नियंत्रण कक्षात कार्यरत असणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्षाला द्यावे. नियंत्रण कक्षातील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, फॅक्स व इतर उपकरणे तसेच शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पूरग्रस्त गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांकाची अद्ययावत यादी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून द्यावी.

पूरप्रवण गावांचे संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या समवेत तहसीलदार यांनी बैठक आयोजित करावी. पुराच्या पाण्याखाली जाणा-या पुलाच्या दोन्ही बाजूला पुराच्या वेळी वाहतूक होणार नाही तसेच या पुलावर साईन बोर्ड, बॅरीकेटींग लावण्यात यावे. यासंदर्भात संबंधित तलाठी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. पूरप्रवण गावातील पुराच्या वेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरीता गावातील शाळा, समाज मंदिर, आश्रयस्थान निश्चित करून याबाबतची जबाबदारीकरीता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची जबाबदारी : नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. पूरप्रवण भागातील नैसर्गिक जलाशयाची साफसफाई करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे. तसेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गटारे तात्काळ साफ करण्याबाबत कार्यवाही करावी.

आरोग्य विभाग : आरोग्य विभागाने पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्याच्या अनुषंगाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. पूरप्रवण गावातील गरोदर स्त्रियांबाबतची माहिती मान्सूनपूर्व कालावधीमध्ये निश्चित करावी. अतिवृष्टीच्या वेळी अथवा गावाचा संपर्क तुटण्यापूर्वी सदर महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात स्थानांतरित करावे. पावसाळ्यात उद्भवणारी आपत्कालीन स्थिती, पूरपरिस्थिती, साथउद्रेक संबधाने तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक व मोबाईल क्रमांक संपर्कासाठी घेण्यात यावे. जोखीमग्रस्त गावातील, गरोदर मातांची प्रसूतीची संभाव्य तारीख व प्रसूतीचे ठिकाणाची माहिती अद्यावत ठेवावी. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाचे औषध उपलब्ध ठेवावे. पावसाळ्यात उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हास्तर ते प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वाहनव्यवस्था अद्यावत ठेवावी.

पाटबंधारे विभाग : पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील तलावांची तपासणी करावी व सर्व्हे करून फुटलेल्या तलावाची दुरुस्ती तात्काळ करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे गावाचे नुकसान टाळण्यासाठी लाल व निळी पूररेषा निश्चित करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. धरण सुरक्षिततेसंबंधी धरणाचे गेट ऑपरेशनकरीता धरणाच्या स्थळी डीजल, पेट्रोलसाठी तसेच जनरेटर सुस्थितीत आहे किंवा नाही, याबाबत विभागाच्या संबंधित अभियंत्याने खात्री करावी व त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय : क्रीडा विभागाने बचाव साहित्य, यांत्रिकी बोट, लाईफजॉकेट, जलतरणामध्ये तरबेज असलेली टीम, टॉर्च आदी साहित्याची तपासणी करावी. जिल्हा मुख्यालयातील यांत्रिकी बो व इतर बचाव साहित्याची तपासणी करून साहित्य सुस्थितीत असल्याबाबतची खात्री करावी. शोध व बचाव पथक प्रमुख म्हणून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.

महाऔष्णिक विद्युत केंद्र : चंद्रपूर येथील सीटीपीसच्या व्यवस्थापकांनी इरई धरणातील पाण्याची क्षमता व पुराच्या प्रवाहाबाबत आणि धरणात साठणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताबाबत माहिती एकत्रित करावी. धरणातील पाण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन तयार करून धरणाचे किती गेट सोडल्यास पाण्याची किती पातळी वाढू शकते यासंबंधीचा डेटा तयार करावा. इरई धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी. तसेच धरणाचे गेट उघडतेवेळी पाण्याचा किती विसर्ग सोडला आहे, याबाबतची माहिती चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच भद्रावतीच्या तहसीलदारांना द्यावी.

सा.बा. व जिल्हा परिषद बांधकाम विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या पूरग्रस्त गावातील रस्त्यांची माहिती संकलित करून जिल्हा कार्यालयास सादर करावी. कार्यकारी अभियंता सिंचन आणि जिल्हा परिषद बांधकाम यांनीसुद्धा क्षतिग्रस्त रस्त्याचे व तलावाचे काम तात्काळ पूर्ण करावे.

पुरवठा विभाग : पूरग्रस्त गावात संबंधित तहसीलदार यांनी गावकऱ्यांना अन्नधान्य पुरवठा करण्यासंदर्भात व अधिकचा अन्नसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच जिल्हा पुरवठा अधिका-यांनी अन्नधान्य पुरवठा संबंधी आवश्यक ती कार्यवाही करावी.

वे.को.ली. : वे.को.ली. मुळे किटाळी, भटाळी,  चिंचोली, आरवट, चारवट, व पद्मापूर  आदी गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होऊन प्राणहानी व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेकोली व्यवस्थापकांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी. तसेच माजरी, ताडाळी, बल्लारपूर व राजुरा या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहापासून मातीचे ढिगारे हटविण्याची कार्यवाही करावी व वेकोलि परिसरालगत असलेल्या गावकऱ्यांना मदत करावी.

महावितरण व दूरसंचार : अतिवृष्टी व वादळी पावसामुळे वीज खांब, टेलिफोन तारा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही विभागाच्या अधीक्षक अभियंता यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तात्काळ सादर करावा.

वनविभाग : वनविभागाने आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी, जसे जनावरांना ठेवण्याचे स्टॅन्ड, धारदार उपकरणे, बुलडोझर, कीटकनाशके, ट्रॅक्टर्स, डंपर्स, अर्थमूव्हर्स, एक्सकॅव्हेटर, जनरेटर्स, कटर्स, ट्रि कटर्स, रोप्स, फ्लड लाईट, शॉवेल्स, हॅक्सेस, हॅमर्स आदी उपकरणे, वाहने चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. हानीप्रवण क्षेत्रात वायरलेस, टेलिफोन, मनुष्यबळ, बीटगार्ड, फॉरेस्टगार्ड आदींना सतर्क ठेवावे. तसेच क्षतीग्रस्त क्षेत्रात प्राधान्याने जळाऊ लाकूड आणि बांबू यांची उपलब्धता करून द्यावी.

पोलिस विभाग : पुलावरून पाणी वाहत असताना वाहतूक होणार नाही तसेच आपत्तीच्या वेळी धरणांमधून पाणी सोडल्यानंतर पुरामध्ये कोणीही जाऊ नये, याकरीता अशा पुलाजवळ आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच इतर विभागांनी दिलेल्या सूचनांनुसार वेळोवेळी कार्यवाही पार पाडावी.

०००००००

No comments:

Post a Comment