गिलबिली गाव ठरणार विकासाचे मॉडेल
Ø मनरेगा अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया सुरू
चंद्रपूर, दि. 10 मे : बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याकरीता निवड करण्यात आली आहे. या विकास आराखड्यातून गिलबिली ग्रामपंचायत एक विकासाचे मॉडेल ठरणार असून याकरीता नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांची चमू मुक्कामी राहून विकास आराखडा तयार करणार आहे.
सदर प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होण्याकरीता बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पहिल्या दिवशी सभा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गिलबिली ग्रामपंचायतीतील आसेगाव, मोहाडी व गिलबिली या गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कुटुंबाच्या मागणीनुसार योजनेतील अनुज्ञेय 262 कामांपैकी पाहिजे त्या वैयक्तिक कामांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यानंतर तिन्ही गावाचे शिवार फेरी, गाव फेरी काढण्यात येणार आहे. त्याद्वारे सार्वजनिक व जलसंधारण कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच वनविभाग व वैयक्तिक जमिनीवर वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, बोडी खोलीकरण, मजगी, शेततळे या कामांचा समावेश करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, सामूहिक शोषखड्डे, नॅडेप टाके बांधकाम, गुरांचा गोठा, सार्वजनिक गोडावून, बचत गटांच्या महिलांकरीता इमारत तसेच शाळा, अंगणवाडीकरीता भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात नियोजनात घेण्यात येणार आहे, असे बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment