Search This Blog

Wednesday, 18 May 2022

जिल्ह्यातील कोलाम बांधवांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडवा - राज्यमंत्री बच्चु कडू




 

जिल्ह्यातील कोलाम बांधवांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडवा - राज्यमंत्री बच्चु कडू

Ø जलसंधारणाच्या कामांबाबत ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सुचना

Ø एक कुटूंब एक मजूर अभियान राबविण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 18 मे: जिल्ह्यातील कोलाम समुदायांचे अनेक प्रश्न व समस्या आहेत, हे प्रश्न व समस्या सुटेल तरच येथील कोलाम बांधवांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणता येईल. त्यामुळे येथील बांधवांना भेडसावणारे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडवा,अशा सूचना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी दिल्या. जिवती तालुक्यातील पाटण, सितागुडा येथील कोलाम गुड्यावर कोलामांशी चर्चा करतांना ते बोलत होते.

यावेळी, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, प्रा. प्रशांत कडू, अॅड.दीपक चटक, तहसीलदार प्रवीण चिडे, गटविकास अधिकारी श्री. पेंदाम, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. स्वप्नील टेंभे, आरोग्य अधिकारी डॉ. कविता शर्मा, बालविकास अधिकारी स्वप्नील जाधव, पुरवठा निरीक्षक सविता गंभीरे तसेच कोलाम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागात जलसंधारण, जमिनीचे पट्टे, जातीच्या दाखल्याचे वाटप, राशनकार्ड वाटप व आरोग्य सुविधा ही तीन ते चार महत्त्वाची कामे आहेत. ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. असे सांगून राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, येथील कोलाम बांधवांकडे अद्यापही राशनकार्ड नाही, राशनकार्ड वाटप केल्यास त्यांना स्वस्त धान्य मिळेल. दुर्गम भागातील कोलाम बांधवांना राशनकार्ड मिळावे यासाठी 6 ते 16 जूनपर्यंतच्या कालावधीत राशनकार्ड मोहीम राबवावी. पुरवठा निरीक्षकांनी स्वस्त धान्य दुकानात वेळोवेळी भेटी द्याव्यात. पाच ते सहा कोटी रुपयांचे काम जलसंधारणाच्या माध्यमातून या भागातील आदिवासी पट्टयात करण्यात येत आहे. त्यामुळे सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची सुविधा या भागात निर्माण होणार आहे. पाणी कुठे थांबते, तलाव कुठे करता येईल यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंपदा व जलसंधारण विभागांनी सर्व्हे करावा. सिंचन विहिरीची कामे अद्याप झालेली नाही ती कामे पूर्णत्वास न्यावीत. त्यासोबतच जलसंधारणाच्या कामाबाबत अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यमंत्री श्री. कडू पुढे म्हणाले, जलसंधारणाची कामे या भागात करण्यात येत आहे. त्या माध्यमातून येथील कोलाम बांधवांच्या हाताला काम मिळेल. 90 दिवसाच्यावर काम केले तर त्यांना कामगार खात्याशी जोडता येईल व कामगार विभागाच्या 19 योजनांचा लाभ या बांधवांना देता येईल. तसा सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. खडकी ग्रामपंचायतीतील 9 गुडे मिळून रोजगार हमीचा प्लॅन करावा. या 9 गावांमधील घरातील प्रत्येकी एका व्यक्तीला रोजगार हमीमध्ये काम मिळावे यासाठी एक परिवार एक मजूर हे अभियान राबवावे. तसेच गावातील 600 लोकांना काम मिळेल यासाठी नियोजन करावे. व  त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा.

जूनमधील पहिल्या आठवड्यात शेतीच्या ठिकाणी सीताफळ, बांबू लागवड, फळझाडे इत्यादींची लागवड करावी. त्या ठिकाणी 200 झाडे लावण्याचे नियोजन कृषी सेवकांनी करावे. गावातील विधवा महिला,आजारी महिला याची माहिती ठेवावी. दुर्लक्षित वाडे तसेच कोलाम बांधवांसह इतर समाजासाठी आरोग्य कॅम्प आयोजित करावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना या व्यक्तिगत योजनांच्या अभियानाचे आयोजन करावे.

रोजगार सेवकांच्या या भागात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून घरकुलाची बोगस कामे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आहे. घरकुलाची कामे ही ठेकेदारी पद्धतीने सुरू असून ही कामे तात्काळ बंद करावी. घरकुलाची किती कामे ठेकेदारी पद्धतीने सुरू आहे याची गावनिहाय माहिती तहसीलदारांनी घ्यावी. असेही ते म्हणाले.

याप्रसंगी, राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते आदिम कोलाम या पुस्तीकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी कोलामांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक करून कोलामांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

00000

No comments:

Post a Comment