म्हसाळा,नवेगाव वेकोलि परिसरातील ‘तो’ वाघ वयोवृद्ध
Ø ट्रॅप कॅमेरा, रॅपिड रिस्पॉन्स युनिट टीम व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे वाघावर लक्ष
चंद्रपूर, दि. 10 मे : दुर्गापूर कोळसा खाणीलगत चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दुर्गापुर उपक्षेत्र, दुर्गापुर नियत क्षेत्रातील म्हसाळा (तू.) नवेगाव परिसरातील वेकोलिचे ओव्हरबर्डन भागात वाघ बसलेला असल्याबाबत दि. 7 मे रोजी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर परिक्षेत्रात कार्यरत रॅपिड रिस्पॉन्स युनिट घटनास्थळी दाखल झाली आहे.
सदर टीमने वाघाचे निरीक्षण केले असता वाघ बसलेला आढळून आला. वाघाची हालचाल कमी प्रमाणात दिसून येत होती. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक दुर्गापूर व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी गेले असता त्यांना वाघ हालचाल करताना दिसला व काही कालावधीनंतर वाघ त्या घटनास्थळावरून निघून गेला. रात्र व झुडपी भाग असल्याने त्यानंतर त्या वाघाचा शोध घेता आला नाही.
दि. 8 मे रोजी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी सदर परिसरात वाघाचा शोध घेतला असता वाघ आढळून आला नाही. 8 मे रोजी सायंकाळी पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी संपर्क केला असता अमराई परिसराकडे आवाज आल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्रीचा काळोख असल्यामुळे त्या भागामध्ये वाघाचा मागोवा घेता आला नाही. रात्री 9.30 ते 10 वाजताच्या दरम्यान विभागीय वन अधिकारी यांनी सुद्धा सदर परिसरात पाहणी केली.
दि. 9 मे रोजी सकाळच्या सुमारास वाघ म्हसाळा, नवेगाव परिसरामध्ये फिरत असताना आढळून आला. अंदाजे 11.20 वाजताच्या दरम्यान सदर परिसरात बकरीची शिकार करून खात असल्याचे दिसले. सदर वाघ हा वयोवृद्ध असल्याचे दिसून आले. वरील संपूर्ण घटनेवर वनाधिकारी यांचे लक्ष असून सदर वाघावर ट्रॅप कॅमेराद्वारे तसेच चंद्रपूर वन विभागात कार्यरत रॅपिड रिस्पॉन्स युनिट टीम व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यामार्फत मागोवा घेण्यात येत आहे, असे विभागीय वन अधिकारी प्रंशात खाडे यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment