ई-श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी वाढविण्याकरीता योग्य नियोजन करा - प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर
Ø 100 टक्के उद्दिष्ट ठेवण्याच्या सुचना
चंद्रपूर दि. 4 मे : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे व व्यवसाय असल्याने असंघटित कामगारांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 100 टक्के उद्दिष्ट ठेवून येत्या काळात नोंदणी वाढविण्याकरीता योग्य नियोजन करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्या. असंघटित कामगारांकरिता ई-श्रम पोर्टलवर नोंदणी संदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे, नगरविकास विभागाचे अजितकुमार डोके, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, किरणकुमार धनवडे, आर. राठोड, विस्तार अधिकारी अमित महाजनवार, तसेच नगरपालिकेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी वाढविण्याकरीता पुढच्या काळात योग्यप्रकारे नियोजन करा, असे सांगून श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, जिल्ह्यात 4 लक्ष 26 हजार 594 कामगारांची ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. ही टक्केवारी 47 आहे. 100 टक्के नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तालुकानिहाय डेटा उपलब्ध करून घ्यावा. यासंदर्भात सर्व गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करा. समाज कल्याण, आरोग्य विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी विभागांमध्ये कंत्राटी कामगार कार्यरत आहे. त्यांची ई-श्रम पोर्टलवर प्राधान्याने नोंदणी करा. ई-श्रम कार्ड नोंदणी संदर्भात कामगार विभागाने जनजागृती करावी, असेही त्या म्हणाल्या.
बाल व किशोरवयीन कामगार जिल्हास्तरीय कृती दल आढावा :
जिल्ह्यातील बालकामगारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी हॉटेल व रिसॉर्टमध्ये बाल कामगार आढळून येतात. बालकामगार आढळून आल्यास संबंधित हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशा सूचना श्रीमती वरखेडकर यांनी कामगार विभागाला दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समितीचासुध्दा आढावा घेतला.
00000
No comments:
Post a Comment