Search This Blog

Thursday, 19 May 2022

जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार - राज्यमंत्री बच्चु कडू





 


जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार - राज्यमंत्री बच्चु कडू

चंद्रपूर दि. 19 मे: चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य कारखाने व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे येथे कामगारांची संख्या देखील अधिक आहे. येथील कामगारांच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी केले. मातोश्री सभागृह येथे आयोजित कामगार आनंद मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी, सहा. कामगार आयुक्त श्रीमती भोईटे, राजदीप धुर्वे, कामगार कल्याण मंडळाचे कल्याण अधिकारी श्री. राठोड, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक शरद धनविजय, बाष्पके विभागाचे श्री. चौधरी, सरकारी कामगार अधिकारी श्री. मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

बुटीबोरी नंतर चंद्रपुरात हा दुसरा कामगार आनंद मेळावा आहे. असे सांगून राज्यमंत्री बच्चु कडू म्हणाले, शासनाच्या कामगार विभाग व कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना असुन बांधकाम कामगारांच्या 28 योजना आहेत. नोंदणी झाल्यापासून ते शेवटपर्यंत या योजना कामगारांच्या उपयोगी पडणार आहेत. शिक्षण, लग्नकार्य, अपघात, आरोग्य यासाठी योजनांचा लाभ कामगारांना मिळू शकतो. या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून कामगार विभागाच्या योजनांच्या माहितीचे विविध स्टॉल लावण्यात आले आहे त्या योजनांचा जिल्ह्यातील कामगारांनी लाभ घ्यावा. असे ते म्हणाले.

राज्यमंत्री श्री.कडू पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य कारखाने व उद्योगधंदे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात कामगार मोठया प्रमाणात आहे, खराखुरा बांधकाम कामगार हा मागे पडला आहे.  जिल्ह्यातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना योग्य न्याय व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरातील कारखान्यांना भेटी देणार असून कामगारांच्या होणाऱ्या फसवणूकीवर आळा घालण्यासाठी मोहीम राबवणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी घरेलू कामगारांना ओळखपत्र, ई-श्रम कार्ड, सुरक्षासंच किटचे वाटप राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते करण्यात आले. तर कामगार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांचा राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगार विभागातर्फे लावलेल्या विविध स्टॉलला भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील असंख्य कामगांराची उपस्थिती होती.

00000

No comments:

Post a Comment