Search This Blog

Friday, 16 October 2026

दुष्काळावर मात करण्यासाठी सिंदेवाहीत जलसंधारणाची लोकचळवळ!




 दुष्काळावर मात करण्यासाठी सिंदेवाहीत जलसंधारणाची लोकचळवळ!

Ø तालुक्यात 100 वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर, दि. 16 : दुष्काळग्रस्त सिंदेवाही तालुक्यात आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात किमान 100 वनराई बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, लोकसहभागातून पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पहिल्याच दिवशी अनेक गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : या मोहिमेला 15 ऑक्टोबर 2026 रोजी उत्स्फूर्त सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मेंढामाल, मिनघरी, लाडबोरी, डोंगरगाव, कच्चेपार, नवेगाव लोन, लोणखैरी आदी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारण्यात आले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसाठा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशासनाच्या पुढाकाराला लोकसहभागाची जोड : पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थ या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून ती प्रभावीपणे साध्य होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. स्थानिक संसाधनांचा वापर करून कमी खर्चात पाणी अडविण्याचा प्रभावी पर्याय म्हणून वनराई बंधाऱ्यांकडे पाहिले जात आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रयत्नशील आहेत. गावागावांत लोकसहभाग वाढवून जलसंधारणाच्या कामांना व्यापक स्वरूप देण्यावर प्रशासनाचा भर आहे.

वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी काही प्रमाणात अडविण्यास, जमिनीत मुरण्यास आणि परिसरातील भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते. त्यामुळे शेती, जनावरे आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment