Search This Blog

Wednesday, 29 April 2020

शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन


चंद्रपूर, दि.29 एप्रिल: नवनवे तंत्र, शिकण्याचे व शिकवण्याचे मंत्र शिक्षकांना अवगत असावे यासाठी  जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरच्या  वतीने  शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी विविध विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शाळांना व शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सर्वांसाठी आव्हानात्मक काळ आहे. अशा  काळात शिक्षकांनी अधिक क्रियाशील असणे गरजेचे आहे. येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी अधिक सक्षम व्हायला हवे.
या ऑनलाईन वेबिनारमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी ही विशेष पर्वणी आहे. इंग्रजी विषयाची भीती व त्याविषयी उदासीनता बघता शिक्षकांमध्ये या विषयासंबंधी अधिक आत्मविश्वास यावा व इंग्रजी वर्ग व भाषा सहज बोलता यावी हा दुरदृष्टीकोन ठेऊन या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असणार वेबिनारचे तात्पुरते वेळापत्रक:
इनअॅबलिंग स्किल्स रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ला डॉ.शुब्रा रॉय नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. प्लॅनिंग अॅंड मॅनेजिंग टिएजी मीटिंग या विषयावर 1 मे रोजी दुपारी 12:30 ला सुयोग दीक्षित नाशिक हे मार्गदर्शन करणार आहे. ऍक्टिव्हिटीज फोर लर्नर या विषयावर 2 मे रोजी दुपारी 12:30 ला संदीप शेळवाळे मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 4 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.आशिष लिंगे नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग बाय डिस्कवरी या विषयावर 5 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.अनिता शर्मा शिमला हे मार्गदर्शन करणार आहे. अंडरस्टँडिंग हाऊ स्टुडंट्स लर्न या विषयावर 6 मे रोजी दुपारी 12:30 ला नितू बावडेकर कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग प्रणाऊनसेशन इन फन वे या विषयावर 7 मे रोजी दुपारी 12:30 ला दिपक मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. लेस्ट टॉक टुगेदर या विषयावर 8 व 9 मे रोजी दुपारी 12:30 ला दीपिका गोडे नागपुर व शंकर दिगदेवतुलवार वरोरा हे मार्गदर्शन करणार आहे.
लर्निंग फॉरेन लैंग्वेज थेरपी याविषयावर 11 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.वर्षा कुलकर्णी कराड हे मार्गदर्शन करणार आहे. तर टेक्नॉलॉजी फॉर टॅग कॉर्डिनेटर या विषयावर 12 मे रोजी दुपारी 12:30 ला नदीम खान भंडारा हे मार्गदर्शन करणार आहे. हे वेबिनार झूम कॉलिंग च्या माध्यमातून होणार आहे.
या वेबिनारमध्ये सुलभक म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, भंडारा व शिमला येथून काम बघणार आहेत. शिक्षकांसाठी ही संधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रात पहिला जिल्हा आहे. शिक्षकांनी या सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,चंद्रपूर डॉ.विलास पाटील यांनी केले आहे.
00000

Tuesday, 28 April 2020

नागपूर ,यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातून प्रवेशाच्या 61 ठिकाणी नाकाबंदी



विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर
सक्त कारवाई व 14 दिवस कॉरेन्टाइन करणार
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  लॉक डाऊन कायमच ; कोणतीच शिथीलता नाही
Ø  मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातही मास्क आवश्यक
Ø  जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या प्रत्येकावर आहे लक्ष
Ø  जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून नेहमी स्वतःचा बचाव करावा
Ø  दवाखाने बंद करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार
Ø  वैद्यकीय सुविधा न देणाऱ्या संदर्भात 07172-251597 तक्रार करा
चंद्रपूर दि. 28 एप्रिल : चंद्रपूर जिल्हा लगतच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या सीमाभागातील 61 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय जिल्ह्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सक्त कारवाई करा. 14 दिवस कॉरेन्टाइन अनिवार्य करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
           जिल्हावासियांशी आज व्हिडीओ संदेश जारी करताना त्यांनी नाका-बंदीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हा सध्या कोरोना मुक्त असून महाराष्ट्र व देशातील अन्य ठिकाणचे वाढते आकडे लक्षात घेता कधीही ही एखाद्या रुग्णामुळे जिल्हा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सोबतच नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य पार पाळावे. 3 मे पर्यंत घराबाहेर पडू नये. रस्त्यावर दुचाकी वाहने घेऊन फिरू नये. तसेच फारच आवश्यकता असेल तर मास्क घालूनच ओळखपत्रासह घरामधील केवळ एका सुदृढ व्यक्तीने बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर कोणत्याच परिस्थितीत पडू देऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान,महानगरातील उष्णतामान वाढायला लागले असून उष्माघाताच्या संदर्भात नागरिकांनी जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका व नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. महानगरपालिका नगरपालिका यासोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातही नागरिकांनी मास्क बांधूनच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच लहान मुलांच्या नियमित लसीकरणाचे काम कोणत्याच परिस्थितीत थांबता कामा नये, यासंदर्भात नागरिकांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07172-251597 या क्रमांकावर दूरध्वनी करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने:
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश शासन परिपत्रकात दिले आहे.
यामध्ये राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद इतकेच पदाधिकारी,अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये.विधिमंडळ मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री  काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहन करावे.
            जिल्ह्यात 28 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 104 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  96 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 530 आहे. यापैकी 2 हजार 677 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 853 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 128 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
            नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 272 प्रकरणात एकूण 15 लाख 36 हजार 270 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 26 वाहने जप्त केली आहेत.
प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
            जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी  07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

बेरोजगारांनो,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा


ऑनलाइन करता येणार नोंदणी
चंद्रपूर,दि.28 एप्रिल: राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता असून  www.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावी, अशी  माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैयाजी येरमे यांनी दिलेली आहे.
नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजीत करण्यात  येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे. आपली शैक्षणीक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल यामध्ये दुरूस्ती करणे वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकाच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधारलिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीसह आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. असे भैयाजी येरमे यांनी स्पष्ट केले आहे.
00000

बिल्ट कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला


मदतीचा ओघ सुरुच ; आतापर्यंत 67 लक्ष रुपये जमा
प्रशासनातर्फे मदतीचे आवाहन
चंद्रपूर, दि.28 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार  यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 67 लक्ष रुपयाचा निधी जिल्हाधिकारी सहायता निधीसाठी उपलब्ध झाला आहे.
                आज प्रामुख्याने दिपक प्रकाश गोनेवार, चंद्रपूर यांच्याकडून रु.50 हजार, चंद्रपूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.41 हजार, चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूरच्या वतीने रु.31 हजार,सास्ती ओपन कास्ट माईन कामगार सह.पतसंस्था सास्तीच्या वतीने रु.25 हजार, बळवंत गंपावार चंद्रपूर यांच्याकडून रु. 21हजार, इनरव्हील क्लब चंद्रपुर व अध्यक्ष शेतकी मजूर सहकारी संस्था आवाळपूरच्या वतीने प्रत्येकी रु.10 हजार, तर वंदना गंगाधर मुक्तावरम चंद्रपूर व छत्रपती शाहू महाराज नागरी सह.पतसंस्था,चंद्रपूर यांच्यावतीने प्रत्येकी रु.20 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
                आज मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये विलास कोंडीबा सोनटक्के, चंद्रपूर यांच्याकडून रु.1 लक्ष 50 हजार, वासुदेव सादमवार,चंद्रपूर यांच्याकडून रु.32 हजार 233, अध्यक्ष समृद्धी मजूर संस्था,गाडेगाव यांच्यावतीने रु.10 हजार तर बिल्ट आष्टी पेपर मिल मजदूर संघटना आष्टी अंतर्गत बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेडच्या वतीने रु.1 लक्ष 33 हजार 291, अवंथा होल्डिंग लिमिटेड युनिट आष्टीच्या वतीने रु.42 हजार 880 तर बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड आष्टीच्या वतीने 1लक्ष 37 हजार 828 असे एकूण 3 लक्ष 13 हजार 999 रुपयांचा धनादेश अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्यावतीने बिल्ट कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीस देण्यात आले.
मदत करायचीय ? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000

Monday, 27 April 2020

चेक पोस्टवरून विनापरवाना कोणालाही आत सोडू नका ; जिल्हा कोरोनामुक्त ठेवा : ना. वडेट्टीवार



Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करा
Ø  वैद्यकीय तपासणी इतकीच नाकाबंदी जबाबदारीची
Ø  अन्नधान्य वाटपामध्ये जिल्ह्यात समाधानकारक काम
Ø  शेल्टर होममधील नागरिकांनी दूरध्वनी संवाद साधावा
Ø  अन्य ठिकाणच्या जिल्हावासियांनी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करू नये
Ø  शेतीच्या सर्व कामांना शारीरिक अंतर ठेवून सुरू ठेवा
Ø  अजान देतांना मशिदीमध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती नको
Ø  केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी
Ø  लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम असून बाहेर पडू नये
Ø  विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे
चंद्रपूर, दि.27 एप्रिल : जिल्ह्यात, शहरात, गावाच्या कोणत्याही भागात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होत आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी एवढी नाका-बंदी देखील महत्त्वाची आहे. पोलिसांना हे काम अतिशय कठीण व 24 तास करावे लागत आहे. मात्र हा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विनापरवाना कोणालाही जिल्हयात घेऊ नये, असे सक्त निर्देश आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कृषी विभागाच्या मर्यादित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक    डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संक्रमणासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागपूर, यवतमाळ या 2 लगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या परिस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त ठेवणे अतिशय जिकिरीचे, जबाबदारीचे आणि कर्तव्यदक्षतेचे काम आहे.ज्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी जीव धोक्यात घालून तपासणी करत आहेत. त्याच पद्धतीने नाका-बंदी देखील केली जात आहे. मात्र ही प्रक्रिया पुढील काही दिवस अतिशय जिकरीने करणे गरजेचे आहे, तेव्हा पोलिस विभागाने राज्य जिल्हा सीमांवर विनापरवाना कोणालाही आत घेऊ नये, असे निर्देश त्यांनी आज दिले.
          अन्य जिल्ह्यातील नागरिकांची आवश्यक ती काळजी शेल्टर होममध्ये घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यातील बाहेर अडकून पडलेल्या हजारो चंद्रपूरवासियांची काळजी अन्य जिल्ह्यात अन्य राज्यात घेतली जात आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत जो जिथे आहे त्यांनी तिथेच राहणे आवश्यक आहे. घरापर्यंत पोहोचण्याशिवाय अन्य काही अडचण असल्यास त्यामध्ये निश्चित मदत केली जाईल. तोडगा काढला जाईल, असे देखील त्यांनी आज स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. आराधना आणि आणि दान करण्याचा हा महिना असून जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पडून सण साजरा करावा. घोळक्याने जमा होणे,घराबाहेर पडणे किंवा मशिदीमध्ये गोळा होणे धोकादायक आहे. मशिदीमध्ये अजान देताना केवळ 3 ते 5 नागरिक हजर राहतील, शारीरिक अंतर ठेवून धार्मिक विधी पार पडतील, प्रशासनाने दिलेल्या सूचना  पाळतील अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या  काळात आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली असून शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे शारीरिक दूरी ठेवत पूर्ण करावी. हंगाम सुरू करण्यास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित अन्नधान्य वाटप 99 टक्के पूर्ण झाले आहे. तर वरील योजनेतील नागरिकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वाटपाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे.या सर्व नागरिकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप पूर्ण झाले आहे.केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी.
दरम्यान, 27 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 101 नागरिकांची नोंद करण्यात आली असून यातील  93  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 83 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 245 आहे. यापैकी 2 हजार 697 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 548 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 122 आहे.
000000