Search This Blog

Monday, 4 May 2020

चंद्रपूरमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे ' केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी



Ø  पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 46 लोकांची संपर्क सूची तयार
Ø  जवळच्या 10 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी  पाठवले
Ø  पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर ; दर तासाला आढावा
Ø  यापूर्वी ज्यांना परवानगी आहे ते दुकाने उघडली जातील
Ø  कन्टेनमेंट झोनमध्ये जाण्या येण्याची 14 दिवस परवानगी नाही
Ø  बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येकाला कॉरेन्टाइन होणे आवश्यक
Ø  सरकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू होण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 4 मे : चंद्रपूरमध्ये केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या 46 लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. संशयित 10 स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कंटेनमेंट झोनमध्ये पुढील 14 दिवस सर्वांना येणे-जाणे बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नव्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
आज दुपारी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये जिल्हा प्रशासनातील प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती  घेतल्याशिवाय समाज माध्यमांवर कोणतेही वृत्त प्रसारित करू नये, अपप्रचार होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी सूचना केली आहे.
शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून हा कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत होता. त्या संपूर्ण इमारतीला देखील सील करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 46 लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. तसेच संशयित 10 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या रुग्णाची दर तासाला तपासणी होत असून प्रकृती स्थिर आहे. या संदर्भातल्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कृष्णनगर वस्तीच्या आसपास असणाऱ्या इंदिरानगर, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प परिसराला देखील बंद करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या परवानगी पासेस शिवाय कोणालाही या परिसरात खेळता येणार नाही. आरोग्य तपासणी व नोंदी घेणे सुरू असून याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,अशी सूचना त्यांनी केली आहे.
अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर गावागावात परतत आहे. परतलेल्या मजुरांना 14 दिवस होम कॉरेन्टाइन करण्यात येत आहे.तसेच जिल्ह्यात अडकून पडलेल्या अन्य राज्यातील मजुरांना देखील पाठविण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था,अनेक संघटना मोठ्या प्रमाणात प्रशासनाला मदत करीत आहे. मात्र ही मोहीम सुरु असताना जिल्हाभरातील नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या या नागरिकांच्या संपर्कात पुढील काही दिवस येऊ नये ,कुणाची प्रकृती बिघडल्यास वारंवार प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, शेकडो लोकांचे दूरध्वनी सुरू असल्यामुळे संयम ठेवून या यंत्रणेचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी या संदेशात दिल्या आहेत.
कृष्णनगर परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी पुढील 14 दिवस घरातच राहणे अनिवार्य आहे. घरापर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य पथकाला आवश्यक माहिती द्यावी. बाहेर पडणे प्रतिबंधित असून पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन याठिकाणी झालेच पाहिजे असे निर्देशही त्यांनी दिले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 132 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  124  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 113 नमुने निगेटिव्ह निघाले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त  आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 36 हजार 724 आहे. यापैकी 4 हजार 387 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 337 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 202 आहे.

00000

लॉकडाऊन कायम;जाणून घ्या काय सुरू, काय बंद राहणार


चंद्रपूर, दि.4 मे : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे. असे दिसून येत असल्याने  राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 फेब्रुवारी 2020 पासुन लागु केलेला आहे. सद्यस्थितीतही कोरोना विषाणुचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या आदेशानुसार साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असणार आहे.
हे राहणार बंद:
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मीक, क्रिडा विषयक प्रदर्शने व शिबीरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, लग्न समारंभ, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक स्थळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना विषाणु (कोविड-19) च्या अनुषंगाने कोणत्याही नागरीकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भिती व्हॉटसअँप, फेसबुक, ट्वीटर, वृत्तपत्र, सोशल मिडीया व होर्डिंग इत्यादींवर प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमांवर प्रसारीत करु नये. धार्मीक स्वरुपाचे समुपदेशन, धर्म परिषद, धार्मीक गर्दीचे आयोजन करु नये.
कोरोना विषाणु (कोविड -19) चे अनुषंगाने घोषीत करण्यात आलेल्या क्वारंटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरांतर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणुक, रॅली, लग्न समारंभ, सामुहिक कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने इ. यांना मनाई राहील.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व  परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंद राहील. सार्वजनिक स्थळी, कामाचे ठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य राहील. आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल. 65 वर्षावरील व्यक्ती को-मॉरबीडीटीस व्यक्ती व 10 वर्षाच्या आतील बालके, गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशाशिवाय घराबाहेर निघू नयेत.
या बाबींना आदेश लागू नाही :
            किमान मनुष्यबळासह शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम,आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी लेबोरेटरी, दवाखाना, विमानतळ व रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्क अत्यावश्यक असेल. अंत्यविधी (कमाल 20 व्यक्तींपुरता मर्यादीत).अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध, दुग्धोत्पादने,  फळे व भाजीपाला, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री,वितरण व वाहतुक करण्यास परवानगी राहील.
            सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवुन फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. ज्या आस्थापना (उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश-परदेशातील अतिमहत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम सुरू होऊ शकतील.(परंतु  या दृष्टीने सदर अास्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांना विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे.
प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालय. अन्न, औषधी, वैद्यकीय  उपकरणांची घरपोच सेवा देणाऱ्या ई-कॉमर्स सेवा उदा. अँमेझॉन, फ्लीपकार्ट, बिग बास्केट इत्यादी सुरु राहील. किमान मनुष्यबळासह बँका, एटीएम, कॅश लॉजिस्टीक आणि कॅश ट्रॉन्झकशन व अन्य संबधीत सेवा सुरू राहतील.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे. टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सेवा. अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी आणि वाहतूक. शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात-निर्यात आणि वाहतूक. बंदरावरुन होणारी वाहतुक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्स्चेंजची कार्यालय, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सव्दारे वितरण सुरू असणार आहे.
जीवनावश्यक दुकाने मर्यादीत वेळेसाठी सुरु :
            खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंतच सुरु राहील. खाद्य पदार्थ, किराणा, दुध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, यांची वाहतुक व साठवण.बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा. उपहारगृहांमधुन आणि खाजगी, घरगुती खानावळ यांचकडून होणारी घरपोच सेवा. औषधी निर्मीती, डाळ व भात गिरणी, इतर जिवनावश्यक अन्नपदार्थ निर्मीती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, चारा निर्मीती घटक इत्यादी सुरू असतील.
अत्यावश्यक सेवा व संबंधित वाहतूक सुरु :
रुग्णालये, औषधालय, चष्माची दुकाने, औषधांचे दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतुक.पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबधित वाहतूक. टँकर्सव्दारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.पावसाळयापुर्वीची सर्व अत्यावश्यक कामे. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था. अत्यावश्यक सेवांना किंवा कोरोना (कोविड-19) प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणाऱ्या खासगी आस्थापना. सर्व प्रकारचे शितगृहे, वखार, गोदामा संबधीत सेवा, घाऊक वितरणासाठी आणि वरील बाबींशी संबधीत पुरवठा साखळी सुरू असणार आहे.

कृषी संदर्भातील सेवा, वाहतूक, शेतीविषयक कामे सुरु राहतील :
कृषी उत्पादन व किमान आधारभुत किंमत यांचेशी संबधीत कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती वा राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी,बाजार विशेषत: कापुस, तुर व धान खरेदी, विक्री आस्थापना,दुकाने. शेतकरी व शेतमजुर यांचे कडून करण्यात येणारी शेती विषयक कामे मासेमारी व मस्त्यव्यवसाय संबधी सर्व कामे व शेती विषयक औजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती संबधीत मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह). अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्र, (एफआरए) क्षेत्र यातील गौण वनउत्पादने गोळा करणे, प्रक्रिया करणे, वाहतुक व विक्री आणि वन व वनेत्तर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन केंद्र, व गोदामापर्यंत त्याची वाहतुक.वनातील आगी रोखण्याकरीता जंगलात पडलेले लाकुड याची तात्पुरती, विक्री आगारापर्यंतची वाहतुक सुरू राहील.
शेती संबधीत यंत्रे,अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजुर वर्ग, केंद्र (कस्टम हिअरींग सेंटर-सीएचसी).खते, किटकनाशके व बियाणे यांचेशी निगडीत उत्पादन व पॅकजींग आणि किरकोळ विक्री संबधीत उद्योग,आस्थापना,दुकाने. आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल परंतु, सर्व प्रकारची मालवाहतुक, अत्यावश्यक मालवाहतुक नसली तरी परवानगी असेल.
राज्यांतर्गत,आंतरराज्यीय मालवाहतुक समयी ट्रक चालक व अतिरिक्त एक व्यक्ती वैध कागदपत्रासह मालवाहतुक अत्यावश्यक असली अथवा नसली तरी सुरु राहील. त्याकरिता वेगळा परवाना आवश्यक नाही. मालवाहतूक करुन खाली ट्रकाची वाहतुक सुध्दा यामध्ये समाविष्ठ राहील.
राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी, फलोत्पादन संबधीत अवजारे, यंत्रे जसे पेरणी,कापणी यांची वाहतुक. जिवनावश्यक वस्तु व सेवा, अत्यावश्यक मालवाहतूक सेवा या बाबींशी संबधातील पुरवठा साखळी सुरळीत राखण्याकरिता आणि शासकीय वाहने,रुग्णवाहीका, ट्रक इ. ची दुरुस्ती व देखभाल करण्याकरीताची गॅरेज, वर्कशॉप, स्पेअर पार्ट पुरवठादार यांची दुकाने, आस्थापना (योग्य ती सुरक्षितता राखुन किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.
टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर व यांच्यासाठी काम करणारे सरकारी, खाजगी, कंत्राटी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना टेलिकॉम सेवा सुरळीत सुरु राहावी. याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र (कंन्टेनमेंट झोन, हॉटस्पॉट, सिलींग करण्यात आलेल्या इमारती व कॉम्प्लेक्स, लॉकडाऊन) इ.क्षेत्रामध्ये असलेल्या टेलिकॉम सबधीत यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती. ग्राम पंचायत स्तरावरील सरकार मान्य सीएससी सेंटर सुरू असणार आहे.
इलेक्ट्रीकल्स ट्रॉन्सफार्मर दुरुस्ती, स्वयंरोजगार करणारे कामगार, कारागीर जसे इलेक्ट्रीशियन, संगणक दुरुस्ती तंत्रज्ञ, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर यांची घरपोच सेवा.  कोळसा व खनिज उत्पादन वाहतुक व खनिकर्माकरीता आवश्यक स्पोटके व इतर सेवांचा पुरवठा व वाहतुक सुरू राहील.
लघु अथवा मध्यम स्वरुपातील अत्यावश्यक उद्योग सेवा जसे पिठाची गिरणी, डाळ निर्मीती, खाद्य तेलाचे उत्पादन कारखाने. उपरोक्त वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर असेल, वस्तुंच्या दळणवळणावर नाहीत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तु व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था, संबधीत कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
सदरचा आदेश संपुर्ण जिल्ह्यामध्ये 17 मे  2020 पर्यंत लागु असणार आहे.
00000

Sunday, 3 May 2020

बाहेर राज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी 10 संपर्क क्रमांक जारी


शक्यतो गुगल फॉर्म भरून आपली माहिती द्यावी
चंद्रपूर, दि.3 मे: महाराष्ट्र शासनाने दि. 30 एप्रिल 2020 रोजी आदेश निर्गमित करुन बाहेरच्या जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या व्यक्तींना स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अटी, शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय  येथे  जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केले असून जिल्हा प्रशासनाने 10 संपर्क क्रमांक जारी केले आहे.
खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात, त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी, तालुका प्रशासनाशी संपर्क साधने सर्वात आवश्यक आहे.ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन आपल्यावतीने चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधनार आहे. संपर्क झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात त्या जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला प्रवास परवानगी विषयी कळविण्यात येईल. तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल.(त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात अडकला आहात, तेथील जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्हाशी थेट संपर्क साधला तरी परवानगी देणे शक्य होणार नाही.) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तेथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर संपर्क क्रमांक जारी:
07172-274166, 07172-274167, 07172-274168, 07172-274169, 07172-274170, 07172-274171, 07172-274172, 07172-274173, 07172-274174, 07172-274175 हे संपर्क क्रमांक 24 तास सेवा देणार आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232).मुल, नागभीड, राजुरा, कोरपना, चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449). चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाहेर राज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो chanda.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधित दिसणाऱ्या बॅनरला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल. या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती भरावी किंवा chandrapurhelpdesk@gmail.com या इमेल वर सुद्धा संपर्क साधता येणार आहे.
00000

उत्तर प्रदेशातील 307 मजुरांना जिल्हा प्रशासनाने केले रवाना.. !


चंद्रपूर, दि. 3 मे : चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 15 तालुक्यात काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील 307 नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जवळपास 25 वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून हे सर्व व कामगार लखनऊकडे रवाना झाले आहेत.
नागपूर येथून नागपूर ते लखनऊ पर्यंत एका विशेष ट्रेनला आज रवाना करण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी या संदर्भात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना आपापल्या जिल्ह्यातील उत्तर प्रदेशातील मजूर वर्गाला पाठविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात जिल्हाभरात नियोजन करण्यात आले होते.
उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून रवाना झालेल्या या विशेष रेल्वेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील 84, राजुरा 22, भद्रावती 18, मुल 47, गोंडपिंपरी 29, गडचांदूर 12, सावली 10, जिवती 13, वरोरा 2 व बल्लारपूर येथील 70 अशा एकूण 307 मजुरांना रवाना करण्यात आले. यामध्ये 289 मजुरांचा समावेश होता. इतर त्यांची मुले पकडून हा आकडा 307 झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या मजुरांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी मदत केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मजुरांनी स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहे.
00000

चंद्रपुरातील कृष्ण नगर, संजय नगर, दर्गा वार्ड सील


अडीच हजार कुटुंबाची आरोग्य पथकाद्वारे तपासणी
Ø  पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन सक्त
Ø  पालकमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
Ø  40 आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू सक्रिय
Ø  रुग्णाच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी 
Ø  रुग्ण नोकरी करत असलेले अपारमेंट सील
Ø  इलाज केलेले डॉक्टर होम कॉरेन्टाइन
Ø  7 किमीच्या बफर झोनमध्येही तपासणी
चंद्रपूर दि. 3 मे : चंद्रपूर महानगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने कृष्ण नगर संजय नगर दर्गा वार्ड सील केले आहे. रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करत असलेल्या इमारतीतील 6 कुटुंब होम कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. कुटुंबातील अन्य 3 सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून अडीच हजार कुटुंबातील परिसरात 10 हजार लोकांची दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.
       राज्याचे मदत व पुनर्वसन ,आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी देखील चार वाजता जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर परिसरातील एक रुग्ण काल पॉझिटिव्ह आला आहे. 1 मे रोजी छातीमध्ये दुखत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निमोनिया सारखे लक्षणे असणाऱ्या या रुग्णाचे स्वॅब 2 मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 3 मे रोजी हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर रुग्ण रहात असलेल्या कृष्णनगर, संजय नगर,दर्गा वार्ड, आदी 10 हजार लोकसंख्या वस्तीतील अडीच हजार कुटुंबाची आज सकाळी 7 वाजता पासून दुपारी 2 पर्यंत 40 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चमूने तपासणी केली आहे. पुढील 14 दिवस दररोज या भागात तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक चमूच्यामागे एक डॉक्टर काम करणार आहे. या परिसरात येण्या-जाण्याचा फक्त एकच मार्ग सुरू असून ॲम्बुलन्स वगळता कोणतीही वाहने आतमध्ये जाऊ दिले जात नाही. या परिसरात कंटेनमेंट प्लन सुरू करण्यात आला आहे. यासोबतच या परिसराच्या बाहेरील 7 किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून संबोधित करण्यात आला असून या ठिकाणी देखील पुढील 14 दिवस ताप व आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे. या परिसरातील चौकशी मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाच्या कुटुंबात त्यांच्यासह 4 सदस्य असून पत्नी व दोन मुलांचे देखील नमुने घेण्यात आले आहे. उद्या सायंकाळपर्यंत त्यांच्या नमुन्याचा अहवाल येणार आहे. शिवाजीनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये रात्रपाळीतील चौकीदार म्हणून हा रुग्ण काम करत होता. रात्री 10 ते सकाळी 6 या काळात सुरक्षारक्षक म्हणून तो कार्यरत असायचा. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहा कुटुंबातील 28 लोकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी या 28 नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.
23 एप्रिल पासून त्याला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसोलेशन वार्ड मध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर इलाज केलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे . सोबतच या रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे. तथापि, गेल्या 15 दिवसांपासून चंद्रपूर बाहेर तो गेलाच नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात एक वैद्यकीय चमू गेल्या पंधरा दिवसात हा रुग्ण कुठे कुठे गेला होता या संदर्भातली चाचपणी करत आहे.
दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक           डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, सर्वेक्षण अधिकारी सुधीर मेश्राम यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला. हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 3  मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 125 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  117  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 106 नमुने निगेटिव्ह निघाले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त  आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 900 आहे. यापैकी 2 हजार 672 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 228 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 216 आहे.
00000