Search This Blog

Wednesday, 7 September 2022

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी





 

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

Ø भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते.

शहरातून निघणा-या मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी दाताळा रोड येथील इरई नदी काठावरील विसर्जन स्थळाची पाहणी केली. मुर्तीचे विसर्जन करतांना एकाच वेळी गर्दी होऊ देऊ नका, त्यासाठी योग्य नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. नागरिकांनी घरगुती छोट्या गणपतीचे विसर्जन मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करावे. इरई नदीच्या पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कुणीही नदीच्या पात्रात उतरू नये. सणांचे महत्व कायम राखून भाविकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी जेटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक येथे वाहतूक व्यवस्था कशी राहील, याची माहिती जाणून घेतली.

०००००००

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

 

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा अहवाल तयार करून प्रशासनाने 302 कोटी 3 लक्ष 40 हजार रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला नुकताच सादर केला आहे.

जिल्ह्यात तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे एकूण 2 लक्ष 21 हजार 900 हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात बाधित शेतक-यांची संख्या 2 लक्ष 30 हजार 362 असून एकूण बाधित गावांची संख्या 1382 आहे. यात सर्वाधिक नुकसान चिमूर तालुक्यातील 44618 शेतक-यांचे असून बाधित क्षेत्र 30388.84 हेक्टर आहे. यानंतर वरोरा तालुका (शेतकरी संख्या - 37307, बाधित क्षेत्र – 57511.16 हेक्टर), भद्रावती तालुका (शेतकरी संख्या - 26128, बाधित क्षेत्र – 31711.70 हेक्टर), मूल तालुका (शेतकरी संख्या - 25898, बाधित क्षेत्र – 12795.51 हेक्टर), ब्रम्हपूरी तालुका (शेतकरी संख्या - 15791, बाधित क्षेत्र – 17840 हेक्टर) व इतर तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने संपूर्ण 15 तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेती क्षेत्रासाठी निधीची मागणी शासनाकडे केली आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त 6469 हेक्टर क्षेत्रासाठी 8 कोटी 79 लक्ष 82 हजार रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील 17840 हेक्टरसाठी 24 कोटी 34 लक्ष 14 हजार रुपये, नागभीड तालुका 781 हेक्टरसाठी 1 कोटी 6 लक्ष 29 हजार रुपये, चंद्रपूर तालुका 14987 हेक्टरसाठी 20 कोटी 38 लक्ष 25 हजार रुपये, चिमूर तालुका 30388 हेक्टरसाठी 41 कोटी 32 लक्ष 88 हजार, सिंदेवाही तालुका 378 हेक्टरसाठी 51 लक्ष 48 हजार, गोंडपिपरी तालुका 6712 हेक्टरसाठी 9 कोटी 16 लक्ष 37 हजार, पोंभुर्णा 4296 हेक्टरसाठी 5 कोटी 84 लक्ष 75 हजार, मूल 12795 हेक्टरसाठी 17 कोटी 40 लक्ष 18 हजार, सावली 11801 हेक्टरसाठी 16 कोटी 4 लक्ष 95 हजार, जिवती 7988 हेक्टरसाठी 10 कोटी 86 लक्ष 38 हजार, कोरपना 8862 हेक्टरसाठी 12 कोटी 5 लक्ष 33 हजार, राजूरा 9373 हेक्टरसाठी 12 कोटी 76 लक्ष 80 हजार, भद्रावती 31711 हेक्टरसाठी 43 कोटी 18 लक्ष 47 हजार तर वरोरा तालुक्यातील 57511 हेक्टरसाठी 78 कोटी 27 लक्ष 23 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 2 लक्ष 21 हजार 898 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकूण 302 कोटी 3 लक्ष 39 हजार 424 रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विधवा महिलांचा तालुकास्तरीय महिला मेळावा




 

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विधवा महिलांचा तालुकास्तरीय महिला मेळावा

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 च्या संसर्गामूळे एक पालक व द्विपालक गमावलेल्या बालकांचे न्याय व हक्क अबाधित राहावे, वंचितांना तात्काळ लाभ देण्याकरीता तसेच विधवा महिलांना कौशल्य विकास मार्गदर्शनाकरीता तालुकास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते उदघाटन झाले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसिलदार रोशन मकवाने, नायब तहसिलदार (संगायो) मधुकर काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. मुंजनकर, पुरवठा विभागाचे नंदकिशोर मांडवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वंचित बालकाचे न्याय व महिलांचे हक्क याबाबत उपस्थितांना माहिती देत मार्गदर्शन केले. नायब तहसिलदार (संगायो) मधुकर काळे यांनी विशेष सहाय्य योजनेच्या विविध लाभांबाबत माहिती दिली.

मेळाव्याचे प्रास्ताविक तहसिलदार रोशन मकवाने यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत तालुकास्तरीय कृतीदल समिती कडून वंचित लाभार्थ्यांना तहसिल कार्यालयामार्फत विविध लाभ मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा / संजय गांधी निराधार (विधवा) या लाभार्थ्यांना 50 पैकी 26 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 13 पैकी 12 पात्र लाभार्थ्यांना लाभ, जमीन मालमत्ता 05 पैकी 04 प्रकरणात फेरफार, बालसंगोपण बाबत 35 पैकी 34 लाभार्थ्यांना लाभ, शैक्षणिक मदत 50 पैकी 50 लाभार्थ्यांना देण्यात आली.  नविन बँक खाती काढण्यात आली. आधार नुतनीकरण व आधार लिंक करण्यात आले. 20 पैकी 20 लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले. सदर महिला मेळाव्याला मार्गदर्शक शशीकांत मोकाशी यांनी उपस्थित महिलांना कौशल्य विकास योजनांची तसेच अर्थ सहाय्य विषयक माहिती देत मार्गदर्शन केले.         

यावेळी, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, सेतू सुविधा प्रमाणपत्र,शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच मनरेगा आदी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. बालविकास प्रकल्प अधिकारी ए.के. मरस्कोल्के यांनी सदर महिला मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. या महिला मेळाव्याला  तालुका गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, तालुका कृषी अधिकारी भोयर, कृषी मंडळ अधिकारी श्री.काळे, गटशिक्षणधिकारी श्री.चहारे तसेच तालुक्यातील विविध गावातील सुमारे 85 महिला लाभार्थी तसेच सर्व सबंधित शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबधित कंपनीच्या कीटकनाशकांमध्ये 74 टक्के क्रियाशील घटकांची कमतरता

 

संबधित कंपनीच्या कीटकनाशकांमध्ये 74 टक्के क्रियाशील घटकांची कमतरता

Ø शेतकऱ्यांनी विनापावती महागडी कीटकनाशके खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये पिकाच्या कीडरोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांची विक्री केली जाते. सदर निविष्ठाची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पूर्णवेळ व अर्धवेळ गुण नियंत्रण निरीक्षकाकडून वेगवेगळे कीटकनाशकांचे नमुने घेतले जातात. नमुने घेऊन विहित कार्यपद्धती अनुसरून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

महाराष्ट्र बायो फर्टीलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लातूर या कंपनीच्या अल्फा क्रॉप (ईमा बेंजोएट-5% एसजी) या कीटकनाशकामध्ये 74 टक्के क्रियाशील घटक कमी आढळून आले आहे. त्यामुळे अशा कीटकनाशकापासून शेतकऱ्यांना अपेक्षित कीड नियंत्रण होऊ शकत नाही. पर्यायाने अशा प्लॉटच्या शेतामध्ये किडीचे प्रमाण वाढून कीड नियंत्रित न झाल्यामुळे तसेच शेतीचे तसेच त्या परिसरात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने शेतकऱ्याने कीड नियंत्रणावर खर्च करूनही हातचे पीक जावू शकते. त्यामुळे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रति आठवडा कापूस, सोयाबीन, भात व तूर पिकाचे कर्मचारी अधिकारी यांचेकडून निरीक्षणे घेतले जातात.

जिल्ह्यातील 219 कृषी सहायकांनी 6965 कीड रोग निरीक्षणे, 50 कृषी पर्यवेक्षकांनी 1693, 26 मंडळ कृषी अधिकारी यांनी 505, 15 तालुका कृषी अधिकाऱ्यांनी 295, 4 उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी 66 कीडरोग निरीक्षणे घेतली आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभाग व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्यामार्फत तसेच एम-किसानच्या आधारे शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला जातो.  त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विनापावतीची महागडी कीटकनाशके खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी केले आहे.

00000

शेतकरी उत्पादक संघ/कंपनीकडून गोदाम बांधकामासाठी अर्ज आमंत्रित

 


शेतकरी उत्पादक संघ/कंपनीकडून गोदाम बांधकामासाठी अर्ज आमंत्रित

Ø 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन 2022-23 अंतर्गत गळीतधान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मुल्यवृध्दीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे.  ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात परंतू गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावे. या अभियानांतर्गत जिल्हयास 1 गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.  250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रू. 12.50 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. या योजनेकरीता सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ / कंपनी अर्ज करू शकतील.

तरी, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यानी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 12 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000