Search This Blog

Tuesday, 28 February 2023

पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद

 


पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद

Ø नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : पोवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत पुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण न झाल्याने सदर मार्गावरील वाहतूक 31 मे 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंद करण्यात येत आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून राजुराकडून पडोलीकडे येणारी जड वाहतूक ही राजुरा-रामपूर-सास्ती-पोवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करावा. तसेच पडोली ते राजुराकडे जाणारी जड वाहतूक ही पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपूर-राजुरा या मार्गाचा वापर करावा व दिलेल्या निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

पौवनी-गौरी-रामपूर-राजुरा या 7 किलोमीटर रस्त्याचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी असल्याने रस्ता बांधकाम करतांना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अवजड वाहतूकदारांना राजुराकडून पडोलीकडे येण्यासाठी राजुरा-रामपूर-सास्ती-पौवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करता येईल. तसेच पडोलीकडून राजुराकडे जाण्यासाठी जड वाहतुकींना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपूर-राजुरा या मार्गाचा वापर करता येईल. पोवनी-गौरी ते राजुरा हा रस्ता जड वाहनाकरीता दि. 31 मे 2023 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-1 मार्फत विनंती करण्यात आली आहे.

00000

भाषेमुळेच व्यक्तिमत्व घडण्यास मदत – श्रीपाद जोशी



 

भाषेमुळेच व्यक्तिमत्व घडण्यास मदत – श्रीपाद जोशी

Ø जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन

चंद्रपूर, दि. 28 : माहिती आणि ज्ञानाचे विविध स्त्रोत अशा या श्रीमंतीच्या काळात आपली मानसिकता गरीब राहता कामा नये. उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर भाषेशिवाय पर्याय नाही. आज संधीचे प्रारुप तयार झाल्यामुळे स्वत:ला तयार करा. त्यासाठी आपल्या भाषेवर प्रेम करा, असे आवाहन कवी, लेखक, नाटककार श्रीपाद जोशी यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

आपल्या व्यक्तिमत्वातील तेज, सामर्थ्य हे बोलण्यातून प्रगट होते, असे सांगून श्री. जोशी म्हणाले, उर्जावान आणि उत्साहाने बोलण्यासाठी सर्वात महत्वाची भाषा असते. त्यासाठी शब्दाचे सामर्थ्य असावे लागते. भाषा ही कोणाच्याही मालकीची नाही. आपण मागास भागातील विद्यार्थी आहोत, असा न्युनगंड मनातून काढून टाका. प्रत्येक विषयावर बोलण्याचे कौशल्य विकसीत करा. त्यामुळे आपली भाषा समृध्द होईल आणि व्यक्तिमत्वात तेज झळकेल. विद्यार्थ्यांनो वाचन नियमित करा. आपल्या भाषेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

मराठी भाषेच्या उगस्थानाबद्दल बोलतांना श्री. जोशी म्हणाले, इ.स. 400 च्या सुमारास संस्कृत, महाराष्ट्रीय प्राकृत भाषा सुरू झाली. त्यात 18 देशी भाषांचा परिचय केला गेला. इ.स. 900 मध्ये श्रवणबेळगाव येथे शिलालेख सापडला. 1188 मध्ये मुकुंदराज यांनी वैनगंगेच्या तिरावार अंभोरा (जि. भंडारा) येथे विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिला. 12 व्या शतकाचा काळ हा महानुभावपंथीय काळ म्हणून ओळखला जातो. या काळात चक्रधरांचे शिष्य माइंनभट यांनी दृष्टांत हा ग्रंथ लिहिला. इ.स. 1275 ते 1296 हा ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे. संत ज्ञानेश्वरांनी 9 हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर संत नामेदवांनी नाममुद्रा, नामसंकिर्तन रुजविले. 15 व्या शतकात संत एकनाथ, संत रामदास होऊन गेले. त्यानंतर संत तुकारामांनी पाच हजारांच्या वर अंभग लिहिले. 300 – 350 वर्षानंतर आजही तुकारामांचे अभंग मानवी कल्याणासाठी मार्गदर्शनपर आहेत. शिवकालीन साम्राज्यात शाहीर, पोवाडा विकसीत झाला. ब्रिटीश राजवटीनंतर केशवसुत, कवी बी. बालकवी, कुसुमाग्रज, ग्रेस,नारायण सुर्वे आदी कवी, लेखक होऊन गेल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, आपल्या भाषेविषयी जोपर्यंत आपल्याला प्रेम आणि आपुलकी आहे, तोपर्यंत भाषा टिकणार आहे. पिढ्यानपिढ्या भाषा आपल्या सोबत असते. त्यामुळे भाषेवर प्रेम करणे शिका. अभ्यासाच्या रुपाने भाषेला प्रेम द्या, तेवढे तुम्हालाही भाषेचे प्रेम मिळणार आहे.

यावेळी रोजगार मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे म्हणाल्या, स्पर्धा परिक्षेसोबतच भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आयुष्यात ‘लढ म्हणा’ अशी थाप असली तर पुन्हा आपण गतीने काम करतो. मराठी भाषेचे संवर्धन करायचे, असा सकंल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर संचालन सुशील सहारे यांनी केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

००००००

अपर जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

 



अपर जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि. 28 : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागामार्फत आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मरुगानंथम एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीवर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक छाया येलकेवाड, विधी अधिकारी अनिल तानले आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत 35 पैकी एकूण 34 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यात प्रथम हप्ता 16 प्रकरणे तर द्वितीय हप्तामधील 18 प्रकरणांचा समावेश आहे. तसेच तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करावा, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी पोलिस विभागाला दिल्या.

आतापर्यंत एकूण नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या 1626 आहे. यात पोलिस तपासावर 31 गुन्हे,पोलिस फायनल 129, न्यायप्रविष्ठ 1429, ॲट्रॉसिटी कलम कमी केलेले 35 आणि पोलिस ॲबेटेड समरीवरील 2 गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली 94 प्रकरणे, दोषमुक्त झालेले 916, केस मागे घेतलेले 92, विथड्राल ॲबेटेड समरी 11, न्यायालयातून कलम कमी 5 आणि न्यायालयात प्रलंबित 311 असे एकूण 1429 प्रकरणे असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त यांनी दिली.

००००००

Monday, 27 February 2023

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी

त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे

चंद्रपूर, दि. 27 : गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून सदर विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या स्वतः च्या इमारतींचे बांधकाम वेगाने होणे आवश्यक आहे. त्याकरीता बांधकाम निधीचे अंदाजपत्रक त्वरित मंजुर व्हावे यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुलपती व राज्यपाल रमेश बैंस यांना एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. या दोन जिल्ह्यात वनक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार क्षमता वाढविणारे शिक्षणक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करणे हे उद्दिष्ट गोंडवाना विद्यापीठाने समोर ठेवले आहे.

सध्या गडचिरोली येथील विद्यापीठ केंद्र भाड्याच्या इमारतीत आहे. या विद्यापीठावर दोन्ही जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यापीठ स्वतःच्या इमारतीत  लवकरात लवकर स्थलांतरित होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली केंद्राच्या बांधकामासाठी 884 कोटींचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर निधीविषयक प्रक्रिया पुढे सरकेल. त्यामुळे हे अंदाजपत्रक मंजूर करण्याकरीता राज्यपाल महोदयांनी कुलपती या नात्याने त्वरित लक्ष घालावे, अशी विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल श्री रमेश बैंस यांना केली आहे. या विषयात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

००००००

‘फळाहार सर्वोत्तम आहार’बाबत कृषी विभागातर्फे स्लोगन स्पर्धा


‘फळाहार सर्वोत्तम आहार’बाबत कृषी विभागातर्फे स्लोगन स्पर्धा

चंद्रपूर, दि. 27 : निरोगी आयुष्यासाठी, विविध जीवनसत्वाच्या आवश्यक पुर्तीसाठी आणि शरीराच्या बळकटीसाठी रोज एक तरी फळ खाणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वोत्तम स्लोगन स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत शेतकरी, नागरीक तसेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उत्कृष्ट स्लोगनकरीता प्रथम बक्षीस 3 हजार, द्वितीय बक्षीस 2 हजार तर तृतीय बक्षीस 1 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. स्लोगनची थीम ‘रोजच्या आहारात फळाचा वापर आवश्यक करणे व त्याचं महत्व पटविणे’ ही आहे. स्लोगन यापूर्वी प्रसारीत झालेले नसावे, स्लोगन संक्षिप्त व स्पष्ट असावे.

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2023 असून आपले स्लोगन कृषी भवन, चंद्रपूर अथवा dsaochandrapur@gmail.com वर पाठविता येतील. स्लोगन पाठविताना आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा. आपले स्लोगन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किंवा आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी येथे व्यक्तिशः सादर करता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००