Search This Blog

Friday, 3 March 2023

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा बालविवाह होत असल्यास कळविण्याचे आवाहन


बालविवाह करणे कायद्याने गुन्हा

बालविवाह होत असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 03 : जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालकांशी संबंधित सर्व विभाग प्रमुख व धर्मप्रचारक यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार बालकाचे वय 21 आणि बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. लग्न जुळविणारे, लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहणारे, जसे वराती, फोटोग्राफर, वाजंत्री, भोजन व्यवस्था करणारे या सर्वावर कार्यवाही केली जाते. त्यामुळे अशा विवाहाला उपस्थित राहण्यापेक्षा त्याबाबतची तक्रार महिला व बालविकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन हेल्पलाइन नंबर 1098 तसेच पोलीस विभागातील विशेष बाल पोलीस पथक यांच्याकडे केल्यास बालविवाहाला आळा बसेल.

बालविवाह करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यावर कार्यवाही करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत, जिल्हास्तरावर पथक तयार करून नजर ठेवली जात आहे. अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. 2006 नुसार बालविवाह लावून दिल्यास, सहभागी लोकांवर कायद्यान्वये रु. 1 लाखाचा दंड व दोन वर्षापर्यंतचा कारावास किंवा दोन्ही बाबत तरतुद आहे. बालविवाहाला आळा घालण्यासाठी व ही प्रथा मोडून काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पाऊले उचलली जात आहे. आपल्या आजूबाजूला बालविवाह होत असल्यास नागरिकांनी आपले कर्तव्य समजून सदर माहिती महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन हेल्पलाइन नंबर 1098 तसेच पोलीस विभागातील विशेष बाल पोलीस पथक, ग्राम बाल रक्षण समिती यांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

            बालविवाह प्रतिबंध अधिनियम-2006 च्या कलम 16 च्या पोटकलम (1) ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तींचा वापर करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांना घोषित करण्यात आले आहे. तसेच पोट कलम(2)अन्वये, ग्रामपंचायत क्षेत्रात नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यास सहाय्यक करतील. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना आपल्या संबंधित प्रकल्प क्षेत्रात बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून नागरी प्रकल्पातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.

००००००


 

Thursday, 2 March 2023

4 ते 11 मार्च कालावधीत कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान

 


4 ते 11 मार्च कालावधीत कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान

            चंद्रपूर, दि. 2 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  व राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान दि. 4 ते 11 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

सदर अभियान जागतिक महिला दिनाच्या सप्ताहादरम्यान पोंभूर्णा, भद्रावती, मुल, राजुरा व सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन संबंधित तालुका विधी सेवा समितीमार्फत केले जाणार आहे. तरी नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

००००००

Wednesday, 1 March 2023

4 मार्च रोजी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन

4 मार्च रोजी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

Ø जिल्ह्यातील नागरीक, मत्स्यसंवर्धक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 1 : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी व विविध मत्सव्यवसाय विषयक शासकीय उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक क्षेत्रातील भागधारकांना मिळण्याकरीता 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मत्स्य महोत्सव व कार्यशाळा एन. के. अॅक्वाकल्चर, मत्स्यबीज केंद्र, पेढंरीमक्ता, ता.सावली येथे पार पडणार आहे. राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर महोत्सव होणार आहे.

या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धक, मत्स्यविक्रेता, मत्स्य बिजोत्पादक, मत्स्यखाद्य निर्मिती कंपनी, मत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित येणार आहेत. यावेळी नवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, तांत्रिक मार्गदर्शन, उपलब्ध संधीचा शोध, विविध शासकीय योजना, रोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता आदी उद्दिष्टे समायोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरीक, मत्स्यसंवर्धक व शेतकरी यांनी या महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मेळाव्यातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. बळकटे यांनी केले आहे.

०००००

27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू


27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू

Ø चंद्रपूर, राजुरा, चिमूर, गडचांदूर व वरोरा या पाच खरेदी केंद्रास मंजुरी

चंद्रपूर, दि.1 : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात हंगाम 2022-23 मध्ये चना खरेदीसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार 27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

चना खरेदी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी ई- 7/12, चालू खाते असलेले बँक पासबुक, आधार कार्ड, ऑनलाइन पिकपेरा व आठ-अ प्रमाणपत्र सोबत आणावे व ते स्कॅन करून शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये नोंदणी होणार असल्याने रोज घेतलेले अर्ज त्याचदिवशी भरणा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चना विकता येणार आहे.

यासाठी पाच खरेदी केंद्रास मंजुरी देऊन खरेदी केंद्र जोडण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर खरेदी केंद्रास-पोंभुर्णा व सावली तालुका,  राजुरा खरेदी केंद्रास-बल्लारपूर, गोंडपिपरी व मुल तालुका,  चिमूर खरेदी केंद्रास-ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुका,  गडचांदूर खरेदी केंद्रास-कोरपना व जिवती तालुका, वरोरा खरेदी केंद्रास- भद्रावती तालुका आदी तालुके शेतकरी चना खरेदी नोंदणीसाठी  केंद्रास जोडण्यात आले आहे. तरी, शेतकऱ्यांनी चना खरेदीकरीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

०००००

5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन


5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन

Ø 15 मार्च ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख

चंद्रपूर, दि.1 :  भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5  ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता अग्निवीर रॅली आयोजीत करण्यात आली आहे.

भरतीस इच्छुक उमेदवारांनी सैन्य भरतीच्या अटी, नियम, पात्रता व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच स्वतःचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नंतर मिळणाऱ्या हॉल तिकीट शिवाय कोणत्याही उमेदवारास सैन्य भरतीच्या मैदानात प्रवेश मिळणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2558020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी  सैन्य दलात भरती होण्यासाठी या संधीचा परिपूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.

००००००